मणिपुरात प्रथमच कमलोदय

0
96

एन. बीरेन सिंहांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
वृत्तसंस्था
इम्फाळ, १५ मार्च
मणिपुरात आज बुधवारी इतिहास घडला. या राज्यात प्रथमच भाजपाचे सरकार सत्तारूढ झाले. भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झालेले एन. बीरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यासोबतच, या राज्यात भाजपापर्व प्रारंभ झाले आहे.
राजभवनात आयोजित समारंभात राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी बीरेन सिंह व त्यांच्या मंत्रिमंडळातील अन्य आठ सदस्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यात भाजपा आणि मित्र पक्षांसोबतच समर्थक पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे. नागा पीपल्स पार्टीचे वाय. जॉयकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद सोपविले जाणार आहे. कॉंगे्रसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर भाजपात प्रवेश घेणारे टी. श्यामकुमार यांनाही मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
या शपथविधी सोहळ्यात भाजपाचे सरचिटणीस राम माधव, आसामचे मंत्री हेमंत विश्‍व शर्मा आणि भाजपाचे अन्य वरिष्ठ नेते तसेच मणिपूरचे मावळते मुख्यमंत्री इबोबी सिंग उपस्थित होते.
नागा पीपल्स पार्टीसोबतच नागा पीपल्स फ्रंटच्या चार आमदारांनीही भाजपाला पाठिंबा दिला. या सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंब्याचे पत्र सोपविल्यानंतर राज्यपाल हेपतुल्ला यांनी मंगळवारी भाजपाला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. ६० सदस्यीय मणिपूर विधानसभेत ३२ सदस्यांचा पाठिंबा असल्याचा दावा भाजपाने केला.
मंगळवारी गोव्यातही भाजपाने सरकार स्थापन केले. त्यानंतर आज मणिपूरमध्येही सत्तेची गुढी रोवली. विशेष म्हणजे, या दोन्ही राज्यांमध्ये कॉंग्रेस सर्वात मोठा राजकीय पक्ष असतानाही बहुमताचा आकडा प्राप्त करण्यात अपयशी ठरल्याने कॉंगे्रसला विरोधी बाकावरच बसावे लागले आहे.
अमित शाहंच्या विमानात बिघाड
दरम्यान, मणिपुरात प्रथमच भाजपा सत्तेत येत असल्याने या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेले भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांच्या विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाल्याने त्यांना पुन्हा दिल्लीत परतावे लागले. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर इंजिनमध्ये बिघाड झाला असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांना मणिपूरला जाण्याची योजना रद्द करावी लागली, अशी माहिती सूत्रांनी दिली.
पंतप्रधानांकडून अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बीरेन सिंह यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. मणिपूरच्या विकासासाठी आपले सरकार निरंतर प्रयत्न करेल आणि या राज्याला नव्या उंचीवर नेईल, असा विश्‍वास पंतप्रधानांनी ट्विटरवर व्यक्त केला.