कर्जमाफीवरून शिवसेनाही आक्रमक

0
188

दोन्ही सभागृहांचे कामकाज तहकूब
तभा वृत्तसेवा
मुंबई, १५ मार्च
शेतकरी कर्जमाफीची पहिल्या आठवड्यात लावून धरलेली विरोधकांची मागणी दुसर्‍या आठवड्यातही कायम असल्याचे दिसून आले. दुसर्‍या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही दोन्ही सभागृहात कर्जमाफीच्या मुद्यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले. आज विरोधकांच्या कर्जमाफीच्या मागणीत सत्तारूढ शिवसेनाही सामील झाल्याचे चित्र होते.
विधानसभा
आज चार दिवसांच्या सलग सुटीनंतर विधानसभेचे कामकाज सुरू झाले. तेव्हा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी प्रश्नोत्तराचा तास पुकारला. दरम्यान, सर्व कामकाज बाजूला ठेवावे, असे सांगत राज्य सरकारने केवळ एक ओळीचा ठराव मांडावा, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सभागृहात केली. तो ठराव आल्याशिवाय अन्य कोणतेही कामकाज चालू देणार नाही, असा पवित्रा विखे-पाटील यांनी घेतला. त्यामुळे झालेल्या गदारोळात प्रथम अर्ध्या तासासाठी कामकाज स्थगित करण्यात आले.
कामकाज पुन्हा सुरू होताच विरोधी बाकांवरील सदस्य घोषणाबाजी करत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा झाले. त्यावर अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास संपेपर्यंत कामकाज स्थगित केले. त्यानंतर सभागृह पुन्हा सुरू होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी विधानसभा सदस्य चंद्रकांत देशमुख यांच्या निधनाबद्दलचा शोकप्रस्ताव मांडला. शोकप्रस्ताव मांडल्यानंतर विरोधक पुन्हा आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी करू लागले. या वेळी विरोधकांनी कर्जमुक्ती करण्याचे फलक सभागृहात फडकावले. या गदारोळामुळे कामकाज करणे शक्य नसल्याने अध्यक्षांनी कामकाज तहकूब केले.
दरम्यान, कर्जमुक्तीच्या मुद्यावर शिवसेनेचे काही आमदार तालिका अध्यक्ष योगेश सागर यांच्या आसनाजवळ जाऊन कामकाजात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यावर तालिका अध्यक्ष सागर यांनी वारंवार विनंती करूनही गदारोळ सुरूच होता. विरोधक शांत न झाल्याने विधानसभेचे कामकाज दुपारी एक वाजताच्या सुमारास दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. या गदारोळातच ११ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्यांसह नगरविकास व ग्रामविकास विभागांची दोन विधेयके मंजूर करण्यात आली.
विधान परिषद
शेतकर्‍यांच्या कर्जमाफीची मागणी करत सभागृहाच्या कामकाज रोखून धरणार्‍या विरोधकांनी बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वैधानिकतेवर आक्षेप घेत सरकारला बहुमत सिद्ध करण्याचे आव्हान केले. तसेच कर्जमाफीचा प्रस्ताव मतास टाकण्याची मागणी केली. भाजपाला एकटे पाडण्याची या खेळीत विधानपरिषदेचे कामकाज आजही दिवसभरासाठी बंद पडले.
सभागृहात एक आणि बाहेर वेगळी अशी विसंगत भूमिका सरकार मांडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी केला. सरकारची केंद्रात एवढी पत वाढली आहे तर कर्जमाफी करावी असा टोला त्यांनी हाणला. तसेच शेतकर्‍यांच्या कर्जमाफीचा प्रस्ताव मतदानाला टाकण्याचे आव्हानही त्यांनी यावेळी दिले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी, पहिल्या वर्षी १५ हजार कोटीची कर्जमाफी करावी लागणार होती, ती आता ३० हजार कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे आता कर्जमाफी जाहीर झाल्याशिवाय सभागृह चालू देणार नसल्याचा इशारा दिला.
या गोंधळात सभागृह नेते चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेतकर्‍यांची कर्जमाफी व्हावी अशी मागणी भाजपाबरोबर शिवसेनेचीही आहे. इतका मोठा निर्णय तडकाफडकी घेता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करून ही कोंडी फोडण्याची तयारी दाखवली आहे. मात्र, विरोधक काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. चर्चा कसली करता कर्जमाफी करा, अशा घोषणा विरोधी सदस्यांनी चालूच ठेवल्या. शेवटी सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले.
अभिभाषण घटनाबाह्य?
दरम्यान, सकाळच्या विशेष बैठकीत राज्यपालांच्या अभिभाषणाच्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेच्या वेळी विरोधक आक्रमक झाले. भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी अभिभाषणाच्या आभाराचा प्रस्ताव मांडला. मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आक्षेप घेत सरकारला बहुमत आहे की नाही, हे स्पष्ट नाही. त्यामुळे राज्यपालांचे भाषण घटनाबाह्य आहे असा दावा केला.
कर्जमाफीच्या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक आहे. त्यामुळे फडणवीस सरकार अल्पमतात आहे, त्यामुळे सरकारने बहुमत सिद्ध करावे अशी मागणी कॉंग्रेसच्या नारायण राणे यांनी केली. त्याचवेळी शिवसेनेचे आमदार रवींद्र फाटक यांनी शेतकर्‍यांच्या कर्जमाफीला सेनेचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले त्यामुळे विरोधक अधिक आक्रमक झाले. विरोधकांनी सभापतींच्या आसनासमोरील वेलमध्ये उतरून घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी पहिल्यांदा अर्धा तास आणि त्यानंतर १२ वाजेपर्यंत तहकूब केले.
दुपारी १२ वाजता सभागृहाचे नियमित कामकाज सुरू झाले, मात्र कर्जमाफी जाहीर होत नाही तोपर्यंत सभागृहाचे कामकाज चालू देणार नसल्याची भूमिका विरोधकांनी कायम ठेवत, गदारोळ केल्याने अखेर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
आर्थिक शिस्त बिघडेल : अरुंधती भट्टाचार्य
सरकारकडून शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या कर्जमाफीसंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी आज बुधवारी येथे तीव्र नाराजी व्यक्त केली. कर्जमाफीसारख्या सवलतींमुळे कर्जदारांची आर्थिक शिस्त बिघडते, असे मत त्यांनी व्यक्त केले. मुंबईत आयोजित भारतीय उद्योगसंघाच्या कार्यक्रमात भट्टाचार्य यांनी भाग घेतला. या कार्यक्रमानंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
नुकत्याच पार पडलेल्या उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपाकडून, राज्यातील शेतकर्‍यांना कर्जमाफीचे आश्‍वासन देण्यात आले होते. याबाबत विचारले असता, आपल्याला उत्तरप्रदेशमधील शेतकर्‍यांच्या कर्जमाफीबाबत कुठलाही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भट्टाचार्य म्हणाल्या, एकदा कर्जमाफी मिळाल्यानंतर शेतकरी भविष्यातदेखील याच प्रकारे कर्जमाफीची अपेक्षा ठेवतात. त्यामुळे भविष्यात या कर्जांची परतफेड होत नाही. शेतकर्‍यांना मदत करणे गरजेचे असलेश तरी त्यामुळे त्यांच्यामधील आर्थिक शिस्त बिघडता कामा नये. ज्यावेळी आपण शेतकर्‍यांचे भले व्हावे, अशी अपेक्षा करतो, त्याचवेळी बँकांकडून त्यांना कर्जपुरवठा होणेही महत्त्वाचे असते. त्यांची पत वाढावी, हा उद्देश त्या मागे असतो. मात्र, या सगळ्यांसाठी आर्थिक शिस्त गरजेची आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.