व्हिएन्ना सर्वात सुखकारक तर बगदाद सर्वात वाईट

0
239

– भारतातील हैदराबाद सर्वात चांगले
– दिल्लीचा १६१ वा क्रमांक
– मर्साची विश्‍वव्यापी पाहणी
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, १५ मार्च
ऑस्ट्रियाची राजधानी व्हिएन्ना हे जगातील सर्वात सुखकारक शहर ठरले आहे; तर बगदाद हे सर्वात वाईट शहर असल्याचे मानवी संसाधन सल्लागार संस्था, मर्साने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे.
भारतीय शहरांमध्ये हैदराबाद सर्वात चांगले; तर राजधानी दिल्ली हे सर्वात वाईट शहर ठरले आहे. जगभरातील शहरांमधील राहणीमान व मूलभूत सुविधांचे सर्वेक्षण करून मर्साने आपला अहवाल तयार केला आहे. आरोग्य सुविधा, शिक्षण, कायदा व सुव्यवस्था, शिक्षण, सार्वजनिक वाहतूक सुविधा, मनोरंजन, राजकीय स्थैर्य अशा अनेक निकषांवर संस्थेने शहरांचा दर्जा निश्‍चित केला आहे.
आशियात सिंगापूर; तर अमेरिकेमध्ये सॅन फ्रान्सिस्को अव्वल शहर ठरले आहे. जगातील पहिल्या पाच सर्वोत्तम शहरांमध्ये व्हिएन्ना पाठोपाठ झुरीच, ऑकलंड, म्युनिच आणि व्हॅनक्युअर या शहरांचा क्रमांक लागतो.
भारताची राजधानी असलेले दिल्ली शहर जीवनमानाच्या दर्जाबाबत देशातील सर्वाधिक वाईट शहर ठरले आहे. जागतिक पातळीवर दिल्लीला १६१ वा क्रमांक देण्यात आला आहे. मूलभूत सुविधांचा बंगळुरूमध्ये सर्वाधिक अभाव आहे. हैदराबादला भारतातील सर्वोत्तम शहराचा दर्जा देण्यात आला असून जागतिक स्तरावर मात्र हैदराबादचा क्रमांक १४४ वा आहे. राहणीमानाबाबत पुणे १४५ व्या, तर बंगळुरू १४६ व्या स्थानावर आहे. सार्वजनिक वाहतूक, बसगाड्यांची सुविधा आणि नव्याने सुरू झालेली मेट्रो यामुळे चेन्नईतील जीवनमानाचा दर्जा उंचावला आहे. राहणीमानच्या दर्जाच्या बाबतीत मुंबई जागतिक स्तरावर १५४ व्या क्रमांकावर आहे.