मेक्सिकोत सापडल्या २४२ कवट्या असलेल्या कबरी

0
220

वृत्तसंस्था
मेक्सिको सिटी, १५ मार्च
मेक्सिकोतील विविध भागात अनेक छुप्या कबरी सापडल्या असून त्यांमध्ये शेकडो कवट्याही सापडल्या आहेत. अनेक वर्षांपूर्वी देशातील मादक द्रव्य व्यापारात बळी पडलेल्यांच्या या कवट्या असाव्यात, असे मानले जात आहे.
व्हेराक्रुझ या शहराच्या हद्दीजवळ एकूण १२४ कबरी आतापर्यंत सापडल्या असून त्यामध्ये २४२ कवट्या आहेत. अनेक वर्षांपूर्वी देशातील मादक द्रव्य व्यापारात मारल्या गेलेल्यांच्या या कवट्या असाव्यात, असे मेक्सिकोतील व्हेराक्रुझ राज्याचे ज्येष्ठ अभियोक्ता जोर्ग विंकलर यांनी सांगितले.
मादक द्रव्यांच्या टोळ्या अनेक वर्षे लोकांना ठार करीत होत्या आणि अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत होत्या. येथे किती जणांना बेकायदेशीर रीत्या पुरले गेले, याची मी कल्पनाही करू शकत नाही. सरकारकडे अजूनही २४०० जण हरवले असल्याच्या तक्रारी आहेत, असे विंकलर म्हणाले.
बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांनी एल सोलेसिटो ही संघटना स्थापन केली आहे. या संस्थेने गेल्या सहा महिन्यांपासून शोध मोहीम राबविली आहे. त्यात ऑगस्टमध्ये पहिल्यांदा कबर सापडली होती.
एका अंदाजानुसार, २००६ ते २०१५ या काळात मेक्सिकोतील मादक द्रव्यांच्या व्यापारात ८०,००० बळी गेले होते.