काजव्यासारखा चमकणारा पहिला बेडूक आढळला

0
222

अंधारात निळा व हिरवा प्रकाश टाकतो बाहेर
वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, १५ मार्च
काळोखात काजव्यासारखा चमकणारा पहिला बेडूक अर्जेंटिनात आढळून आला असून दक्षिण अर्जेंटिनात या बेडकाची प्रजाती सापडली आहे. या बेडकावर हिरवा, पिवळा व तांबडा रंग असून, तो काळोखात रंग बदलत असल्याचे समोर आले आहे. तसेच अंधारात हा बेडूक निळा किंवा हिरव्या रंगाचा प्रकाश बाहेर टाकतो, असे संशोधकांना आढळून आले आहे. कमी तरंगलहरीचा प्रकाश शोषून घेऊन जास्त तरंगलहरींचा प्रकाश बाहेर फेकण्याचा गुणधर्म या बेडकामध्ये आहे. आतापर्यंत उभयचर प्राण्यांमध्ये असा गुणधर्म आढळून आला नव्हता, हे विशेष.
‘साऊथ अमेरिकन पोल्का डॉट ट्री’ या जातीचा बेडूक संशोधकांनी शोधला आहे. हा बेडूक लहरींचा वापर करत असतो, पण लहरी इतर प्राण्यांच्या लहरींपेक्षा वेगळे असतात. महासागरातील अनेक प्राण्यांकडे अशा प्रकारच्या लहरी असतात; त्यात प्रवाळ, मासे, शार्क व हॉकबील कासव (एरेटोमोचेलीस इंब्रिकाटा) यांचा समावेश आहे. प्राण्यांमध्ये हा गुणधर्म कोठून येतो, याचा अद्यापही शोध लागलेला नाही. संदेश पाठवणे, रंग बदलून स्वसंरक्षण करणे, जोडीदाराला आकर्षित करणे हे त्याचे हेतू असू शकतात. या प्रजातीच्या बेडकामध्ये लाल रंगाचा प्रकाश दिसू शकतो.
पोलका डॉट फ्री हा बेडूक वेगळा असून तो निळा-हिरवा प्रकाश बाहेर टाकतो. अर्जेंटिना येथे पोलका डॉट ट्री बेडूक सापडले असून, ते हिरवा व निळा प्रकाश बाहेर टाकतात. हायलॉइन एल- १ , हायलॉइन एल-२ , हायलाईन जी-१ रेणू त्यांच्या लसिका पेशी, त्वचा व इतर ठिकाणी असतात, त्यामुळे ते हिरवा प्रकाश बाहेर टाकतात. त्यांच्यात अगदी वेगळ्या प्रकारची हायड्रोकार्बन शृंखला असते आणि ती इतर कुठल्याही प्राण्यात आढळून येत नाही. चंद्राप्रमाणे १८ टक्के दृश्य प्रकाश लहरी हा बेडूक बाहेर टाकतो. या बेडकांच्या प्रजातीला त्यांचा स्वत:चा प्रकाश दिसतो की नाही याबाबतही अद्याप अस्पष्टता आहे, असे संशोधन जर्नल प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल ऍकडमी ऑफ सायन्सेस केले आहे.