झाले गेले विसरून पुढे जाणेच योग्य ः कोहली

0
151

वृत्तसंस्था
रांची, १५ मार्च
डीआरएस प्रणालीवरून ऑस्ट्रेलियासोबत झालेल्या शाब्दिक चकमकीबद्दल आपल्याला कसलीही खंत वाटत नाही. झाले गेले विसरून पुढे जाणेच योग्य आहे, असे भारताचा कर्णधार विराट कोहली म्हणाला.
येथे गुरुवारपासून होणार्‍या तिसर्‍या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी कोहली बोलत होता. तो म्हणाला की, मी जे काही बोललो त्याची मला अजिबात खंत वाटत नाही. पण एकच गोष्टी सारखी गिरवत बसण्यात काहीच अर्थ नाही. आम्हाला आता पुढे जायला हवे. याआधीही अनेक गोष्टी उगाच ताणून धरण्यात आल्या, पण त्याचे पुढे काहीच झाले नाही.
बंगळुरू कसोटीतदेखील डीआरएस प्रणालीवरून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ आणि भारताचा कर्णधार विराट कोहली यांचा वाद पुढे आला. डीआरएसच्या निर्णयासाठी स्मिथने ड्रेसिंग रूमकडे मदतीसाठीचा केलेला प्रयत्न आणि कोहलीने भरमैदानात स्मिथला सुनावलेले खडेबोल यावरून बंगळुरू कसोटी चांगली गाजली.
पुण्यातील कसोटी गमावल्यानंतर बंगळुरू कसोटीत पुनरागमन करत भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. त्यामुळे मालिकेत आघाडी घेण्यासाठी रांची कसोटी दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची असणार आहे.
प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंच्या कामगिरीवर आम्ही लक्ष केंद्रित करीत नाही. आपल्या संघातील प्रत्येक खेळाडूची कामगिरी कशी सर्वोत्तम राहील यासाठीच्या प्रयत्नांवर आमचा भर राहील, असेही तो म्हणाला.