भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी आजपासून

0
160

कसोटी मालिकेची उत्कंठा शिगेला
– स्थळ ः जेएससीए स्टेडियम, रांची.
– सामन्याची वेळ ः सकाळी ९.३० वाजता
वृत्तसंस्था
रांची, १५ मार्च
भारत-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या कसोटी मालिकेची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया संघाने पुणे कसोटीत भारताला मोठ्या फरकाने हरविल्यामुळे सर्वजण चकित झाले होते, परंतु विराट कोहली व त्याच्या चमूने बंगळुरू कसोटीत जोरदार मुसंडी मारीत विजय मिळविला. मालिकेत बरोबरी मिळविल्यानंतर आता दोन्ही संघांचे लक्ष उर्वरित दोन सामन्यांत उत्कृष्ट प्रदर्शनावर केंद्रित झाले आहे. त्यातील तिसरा कसोटी क्रिकेट सामना गुरुवारपासून झारखंड राज्य क्रिकेट संघटनेच्या स्टेडियमवर खेळला जाणार आहे.
रांची येथे प्रथमच कसोटी क्रिकेट सामना खेळला जाणार असून, येथील खेळपट्टी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरणार आहे. या खेळपट्टीवर पहिल्याच षटकापासून चेंडूला वळण मिळेल, असा अंदाज क्रिकेट तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंनीही या खेळपट्टीचे निरीक्षण केले असता त्यांनीही खेळपट्टीचा धसका घेतला आहे. बंगळुरू येथे दुसर्‍या कसोटी सामन्यादरम्यान डीआरएस प्रकरणाचा सौहार्दपर्ण शेवट झाल्यानंतर आता पुन्हा एकदा रांचीच्या खेळपट्टीवर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
ऍलन बॉर्डर-सुनील गावस्कर ट्रॉफी आपल्याकडे कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलिया एक विजय दूर आहे. बंगळुरू कसोटीतील विजयाने भारतीय संघाचा आत्मविश्‍वास बळावला असून, मुख्य प्रशिक्षक कुंबळेंनीही भारतीय संघाला आपली आक्रमकता कायम राखण्याचा कानमंत्र दिला आहे. पुणे येथील पराभवापूर्वी भारतीय संघ सलग १९ सामन्यांत अपराजित राहिला होता.
तीन अर्धशतके झळकाविणारा सलामी फलंदाज लोकेश राहुल मालिकेत सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू आहे. कर्णधार कोहली गत चार डावात केवळ ४० धावा काढू शकला व तोही धावांचा दुष्काळ संपविण्यास उत्सुक आहे. खांद्याच्या दुखापतीतून बरा झालेला सलामी फलंदाज मुरली विजय तिसर्‍या कसोटीत अभिनव मुकुंदचे स्थान घेण्याचे जवळपास सुनिश्‍चित झाले आहे.
बंगळुरू कसोटीत चेतेश्‍वर पुजारा व अजिंक्य रहाणेने पाचव्या गड्यासाठी ११८ धावांची भागीदारी करून भारताचे सामन्यात आव्हान कायम राखले. ही मालिकेतील एकमेव शतकी भागीदारी आहे.
तिकडे ऑस्ट्रेलिया संघाची वेगवान गोलंदाजीची धार बोथट झाली आहे. मिशेल स्टार्क दुखापतीमुळे मालिकेबाहेर झाला आहे. स्टार्कच्या जागी पॅट कमिन्सचा समावेश करण्यात आला आहे. कमिन्सने २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पणात सात बळी टिपल्यानंतर तो एकही कसोटी सामना खेळला नाही. मिशेल मार्शही खांद्याच्या दुखापतीमुळे मायदेशी परतल्यामुळे संघाला अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. ग्लेन मॅक्सवेल या स्थानाचा प्रबळ दावेदार आहे, परंतु एश्टन एगर व मार्कस् स्टोइनिससुद्धा शर्यतीत आहे. दुसर्‍या कसोटीत ८ बळी टिपणारा ऑफ स्पिनर नॅथन लियोनच्या बोटाला दुखापत झाली आहे, परंतु सामन्यापर्यंत आपण तंदुरुस्त होऊ, असा त्याला विश्‍वास आहे. कसोटी पर्दापणाच्या प्रतीक्षेत असलेला लेग स्पिनर मिशेल स्वीपसनच्या रूपात ऑस्ट्रेलियाकडे पर्याय उपलब्ध आहे.
– प्रतिस्पर्धी संघ असे-
भारत ः विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, चेतेश्‍वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव, करुण नायर, जयंत यादव, कुलदीप यादव व अभिनव मुकुंद.
ऑस्ट्रेलिया ः स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ऍश्टन एगर, जॅक्सन बर्ड, पॅट कमिन्स, पीटर हॅण्डसकॉम्ब, जोश हेजलवूड, उस्मान ख्वाजा, नॅथन लियोन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्ह ओकीफी, मॅट रेनशॉ, मार्कस् स्टोइनिस, मिशेल स्वीपसन व मॅथ्यू वेड.