ग्राहक राजा सजग राहा

0
77

प्रबोधन
१५ मार्च हा दिवस ‘जागतिक ग्राहक दिन’ म्हणून भारतात व जगातील अनेक देशांत साजरा केला गेला. हातात रकम घेऊन खरेदीला गेलेला ग्राहक व्यापारी सांगेल तेच जिन्नस व व्यापारी मागेल त्याच किमतीला खरेदी करीत असे. दसरा, दिवाळी या दरम्यान बाजारातून तूप (वनस्पती/डालडा), रवा, साखर इत्यादी जिन्नस गायब होणे ही बाब तर आम होती. दुर्दैव असे की याच वस्तू काळ्या बाजारात चढे दर दिल्यावर मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असत. पुणे येथील निवडक संघ स्वयंसेवकांनी यावर ‘ग्राहक संघटन’चा तोडगा काढीत काळ्या बाजारावर मात केली. भारतातील ग्राहक कल्याणाचा पाया पुण्यात रचला गेला, असे म्हटले तर वावगे ठरू नये. यातूनच पुढे ग्राहकांच्या हिताचा कायदा असण्याची आवश्यकता निर्माण झाली. तत्कालीन खासदार (कै.) रामभाऊ म्हाळगी यांनी ग्राहक संरक्षण कायद्याचे एक अशासकीय विधेयक लोकसभेसमोर सादर करण्याचे ठरविले. या विधेयकाला अनुमोदन दिले ते केरळचे तत्कालीन खासदार ऍड. बनातवाला यांनी! शेवटी अशासकीय विधेयकाचे जे व्हायचे तेच झाले. मात्र, रामभाऊंनी विषय ऐरणीवर आणला. यातूनच पुढे भारतीय संसदेने ग्राहक संरक्षण कायदा मंजूर केला.
या कायद्यात ग्राहक कल्याणाकरिता त्रिस्तरीय उपाय योजले आहेत. त्यातील एक म्हणजे ग्राहक तक्रार निवारण मंच. असे मंच जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर कार्यरत आहेत. दुसरा उपाय म्हणजे कार्यपालिका किंवा प्रशासकीय पातळीवर काही योजना करण्यात आल्या आहेत. ज्या सरकारी खात्यांचा संबंध सामान्य ग्राहकांशी येतो त्या ठिकाणी ग्राहकांच्या प्रतिनिधींशी नित्य संवाद करण्याची प्रक्रिया सुरू झाली.
तिसरा महत्त्वाचा उपाय आहे तो ग्राहक संघटन! जोपर्यंत ग्राहक जागृत होत नाहीत, एकत्र येत नाहीत तोपर्यंत ग्राहकांच्या समस्यांचे निराकरण होणे शक्य नाही, ही बाब कायदा करतानाही मान्य करण्यात आली आहे.
ग्राहक म्हणजे जो पैसे मोजून वस्तू खरेदी करतो किंवा सेवा विकत घेतो तो! अशी सुटसुटीत व्याख्या कायद्यात मान्य आहे. कालमानागणिक काही नवीन क्षेत्रे (जसे ऑनलाईन खरेदी) विकसित होतात व अशा नव्या क्षेत्रात ग्राहकाच्या हिताचा बळी सहज दिल्या जातो.
ग्राहकांची फसवणूक झाली की बहुतांश ग्राहकांचे म्हणणे असे असते की मग सरकार काय करते?
सरकार काय करते? हा प्रश्‍न विचारण्यापूर्वी ग्राहक आपल्या ठिकाणी जागृत आहे का? असा प्रतिप्रश्‍न विचारला तर दुर्दैवाने याचे उत्तर नाही असे आहे. आजचे व्यापारक्षेत्र हे मायाबाजारासारखे असल्याने प्रत्येक ग्राहकाने दक्ष असण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचवेळी मोफत म्हणजे ‘फ्री’ चे आकर्षण एकदिवस घात करू शकते, याची मनोमन जाणीव ठेवायची आहे.
ग्राहकाची आचारसंहिता
ग्राहकाने स्वत:करिता आचारसंहिता निश्‍चित केली तर अनेक समस्या उद्भवणारच नाही, हे नक्की आहे.
दरमहा आपले उत्पन्न किती व खर्च किती याची नोंद ठेवणे ही जागृत ग्राहक असल्याची पावती आहे. रोजचा जमाखर्च लिहिला तर वायफळ खर्चाला कात्री कुठे लावायची ते ठरविणे सोपे जाते.
स्वदेशी : खरेदी करीत असताना स्वस्त हा दृष्टिकोन असू नये. आपल्या राष्ट्रात तयार झालेली वस्तूच खरेदी करा. याला अपवाद असू शकतो तो जीवरक्षक औषधांचा! स्वदेशी वस्तू खरेदी केली तर त्यातील नफा आपल्याच देशात राहील व पर्यायाने देशाची अर्थव्यवस्था बळकट होईल, याची ग्राहकाला जाणीव असावी. विदेशी वस्तू खरेदी करीत असताना आपण आपल्याच देशबांधवाच्या रोजगारावर गंडांतर आणतो, हा विचार आपण कधी करणार आहोत?
अवधान : ग्राहकांनी अनेक अवधाने बाळगणे आवश्यक आहे. खरेदी करीत असलेल्या वस्तूची उत्पादन दिनांक, उत्पादनाची सत्त्वसमाप्ती दिनांक, महत्तम विक्री किंमत इत्यादी तपासूनच खरेदी करावी. काही बाबतीत ठाम असणे आवश्यक असते. चिटफंडमध्ये आकर्षक व्याज मिळत असले तरी मुद्दल सुरक्षित राहाण्याची शक्यता धूसर असते. सोन्याचा हंडा सापडला तरी स्वस्तात सोने कुणीच विकत नसतो. विज्ञानाच्या नियमाप्रमाणे चलनी नोटा दुप्पट होऊच शकत नाहीत. जन्मत: आपला वर्ण काळा किंवा सावळा असेल तर कोणतीही क्रीम आपल्याला गौरवर्ण देऊ शकत नाही, उलट आहे त्यात समाधान मानले तर आत्मविश्‍वास दुणावत असतो. सुगंधांचे फव्वारे अंगावर उडविल्याने पौरुषत्व सिद्ध होत नाही, तर पौरुषत्वाकरिता पराक्रम, परिश्रमच आवश्यक असतात. जाहिराती आकर्षक पद्धतीने दाखविल्या जात असल्या तरी जाहिरातींच्या भुलभुलैयात आपण किती अडकून पडायचे याची जाणीव स्वत:लाच पाहिजे. ग्राहकाने खरेदी करीत असताना स्वत:ची गरज, स्वत:ची ऐपत, समाजबांधव व देश याचा विचार करून खरेदी केल्यास खरी ग्राहकजागृती झाली असे म्हणता येईल. जागतिक ग्राहक दिनानिमित्त केवळ ग्राहकहिताचे नाही, तर हिंदुस्थानला परम् वैभवाकडे नेणारे चिंतन आवश्यक आहे, असे वाटते.
– हेमंत पुरुषोत्तम कद्रे
९४२२२१५३४३