भाजपा सुसाट, कॉंग्रेस पिसाट

0
148

राजकारण
सध्या उत्तरप्रदेश, उत्तराखंड ते कलंगुट बिच (गोवा) व्हाया कानपूर लोटस् एक्सप्रेस सुसाट धावत असून प्रत्येक स्थानकावर कमळ फुलवत जात आहे. गोव्यात भाजपाला अपेक्षित यश मिळाले नाही. पण, कॉंग्रेसच्या नेहमीच्या गलथानपणाचा फायदा भाजपाने उठवला नसता तरच नवल.
अवघ्या तेरा जागा मिळवूनही भाजपाने सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या कॉंग्रेसचे तीनतेरा वाजवले आहेत. कॉंग्रेसवाले चार माजी मुख्यमंत्र्यांच्या ‘मलाच मुख्यमंत्रिपद हवे’ या अट्टहासामुळे हैराण झाले होते. कुणाला मुख्यमंत्री करावे, असा गहन प्रश्‍न त्यांच्यासमोर पडला होता. घटिका निघून जात होती. अखेर भाजपाने सर्व लहान पक्षांना सोबत घेतले आणि गोव्यात मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्रिपदी विराजमान केले. कॉंग्रेसने सर्वोच्च न्यायालयात जाऊन आपले हसे करून घेतले. प्रचंड बहुमत मिळूनही युपी, उत्तराखंडात अजून मुख्यमंत्री कोण हे ठरायचे आहे…पण, हा मुद्दा फार मोठा नाही. भाजपाजवळ नेतृत्वाची कोणतीही कमतरता नाही. पण, उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्याबाबत निर्णय घेताना खूपच काळजी घ्यावी लागणार आहे.
उत्तरप्रदेशातील दिग्विजयानंतर मोदीजींनी म्हटले होते की फळे लागल्यावर झाड नम्रतेने झुकते…गोव्यात मुख्यमंत्री विराजमानही झाले आणि उद्या त्यांना बहुमत दाखवायचे आहे. त्यात कोणताही अडथळा येणार नाही. उलट, यावेळी आणखी काही कॉंग्रेस सदस्य पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. गतवेळी मणिपूरमध्ये एकही जागा नसताना, जे यश भाजपाने मिळविले आहे, त्याला तोड नाही. तेथेही भाजपाचा मुख्यमंत्री विराजमान झाला आहे.
या सर्व भानगडीत खरी गोची झाली ती कॉंग्रेसची. ‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ याचा प्रत्यय एव्हाना कॉंग्रेसला आला असावा. गोवा असो की मणिपूर… मोठा पक्ष असूनसुद्धा हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास भाजपाने हिसकावून घेतला. शेवटी केवळ जास्त जागा जिंकणे कामाचे नाही तर योग्य स्थितीचा अचूक लाभ घेण्यात पण एक्स्पर्ट असावे लागते, याचा धडा या घटनेतून दिसून येतो. कॉंग्रेससुद्धा हीच कामे गेली कित्येक वर्षे लीलया करत होती. भाजपा आता त्याची सव्याज परतफेड करत आहे… एवढीच त्यात नवलाई.
चला जाऊ द्या. राजकारण म्हटले की हे सर्व आलेच. जनादेश, जनमत, लोकभावना याची प्रतारणा करणे हे राजकारण्यांच्या ‘बाए हातका’ खेळ झाला आहे. पहिल्या नंबरच्या पक्षाला दूर सारून दुसर्‍या नंबरचा पक्ष लहान पक्षांना सोबत घेऊन सत्ता काबीज करतानाचे चित्र गोव्यात पहायला मिळाले आहे.
आम आदमी पक्षाने दिल्ली सोडून इतरत्र धुमाकूळ घालणे चालूच ठेवले आहे. पंजाब आणि गोव्यात त्यांनी मतांची पॉकेटमारी करून पाहिली. परंतु दोन्ही जागी सुज्ञ आणि चाणाक्ष मतदारांनी आपची भामटेगिरी वेळीच ओळखली आणि त्यांना दूर सारले… अन्यथा दिल्लीपाठोपाठ जनतेला त्यांचे लोकशाहीच्या नावावर विचित्र माकडचाळे पहायला मिळाले असते.
नमोने सध्या पॉवरप्ले घेतला असल्याने गल्ली ते दिल्ली कोणतीही निवडणूक असो, विरोधकांच्या हाती काही विशेष पडणार याची चिन्हे दिसत नाहीत. आप्पलपोटे, मत्सरी, अतिमहत्त्वाकांक्षी आणि संकुचित मानसिकतेत असलेले विरोधी पक्ष भाजपाला टक्कर देण्यात कमी पडत आहेत. लोकशाहीत दमदार, मजबूत विपक्षी असणे महत्त्वाचे असते. नेमके इथेच सर्व विरोधी पक्ष कमी पडत आहेत आणि पडलेही आहेत.
‘जाऊ तिथे सत्ता घेऊ’ ही प्रवृत्ती वाढण्यामागे हे सुद्धा एक कारण असू शकते. चला यानिमित्ताने का होईना ‘बळी तो कान पिळी’ ही म्हण सार्थ होते.
– डॉ. अनिल पावशेकर
९८२२९३९२८७