अशीही सोय!

0
89

वेध
आपल्या देशात खेळ आणि खेळाडू यांच्याबाबत सर्वच पातळीवर खूप मोठ्या प्रमाणावर उदासीनता दिसून येते. त्यामुळेच की काय आज आपल्या देशात खेळ आणि खेळाडू पाहिजे तशी प्रगती करू शकत नाहीत. हे आपल्याला आशियाड आणि ऑलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने दिसून येते. मुळात आपल्याकडे खेळाडूंपेक्षा त्यांच्या पालकांनाच आपल्या पाल्याच्या भविष्याची जास्त चिंता वाटते. पालक सुरुवातीला मोठ्या उत्साहाने आपल्या पाल्याला खेळात टाकतात. नियमित नेणे-आणणेही करतात. आवश्यक त्या सोयी-सुविधा पुरवितात. मात्र, दहावी आणि बारावीची परीक्षा आली रे आली की, हेच पालक मग आपल्या पाल्याच्या अभ्यासासाठी मागे लागतात. मग खेळाचा खेळखंडोबा होतो. खेळ मागे पडतो आणि अभ्यासासाठी विद्यार्थी धडपड करतो… मग दहावी व बारावीची परीक्षा आटोपल्यावर अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय अशा व्यावसायिक स्वरूपाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतो आणि त्याच्या खेळाची वाट लागते. नागपूर शहराचेच उदाहरण द्यायचे झाल्यास अनेक चांगल्या खेळाडूंची कारकीर्द अशी अनपेक्षितरीत्या किंवा अभ्यासामुळे खुरटलेली आहे. या सार्‍या पार्श्‍वभूमीवर नुकतीच एक घटना राज्यात घडली आणि त्यामुळे खेळाडूंच्या पालकांनाही आता हुरूप आला आहे. नागपूरच्या सीडीएस शाळेची विद्यार्थिनी रितिका ठाकरे आणि मुंबईच्या रायन इंटरनॅशनल स्कूलची सिमरन सिंधी या दोघी जर्मनीच्या बर्लिन शहरात बॅडमिंटनची स्पर्धा खेळायला गेल्या असताना इकडे भारतात त्यांचा दहावीचा इंग्रजीचा पेपर होता. पेपरही द्यायचा आणि खेळही खेळायचा असा दोन्ही खेळाडूंचा निर्धार होता आणि त्यात त्या यशस्वी झाल्या. त्यासाठी त्यांना शासकीय पातळीवरील समन्वयाचाही चांगला अनुभव आला. सर्व पातळीवर सहकार्य मिळाल्यामुळे या दोघींना बर्लिनमध्ये बसून इंग्रजीचा पेपर सोडविण्याची संधी मिळाली. त्यांनी आधी पेपर सोडविला आणि नंतर त्यांनी खेळाकडे पूर्ण लक्ष दिले. त्यामुळे या दोघींचे शैक्षणिक सत्रही वाया गेले नाही. शिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केले म्हणूनही त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. डच आणि जर्मन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली होती. दोन्ही पातळीवर या विद्यार्थिनी यशस्वी ठरल्या, हेही नसे थोडके!

जनतेचे सहकार्य
एकीकडे शासकीय पातळीवरील सहकार्याचा अनुभव वरील दोन बॅडमिंटनपटूंना आला असताना दुसरीकडे शासकीय पातळीवर खेळ आणि खेळाडूंबाबत कशी अनास्था असते, हेही दिसून आले आहे. शासकीय आर्थिक मदतीविना देशाबाहेर खेळायला जाणे, हे तसे मोठे आव्हान असते. स्वखर्चाने जायचे असल्यास अनेक चांगल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांना मुकावे लागते. आर्थिक अडचणी असणार्‍या खेळाडूंबाबतीत हा प्रकार हमखास घडताना दिसतो. मात्र, कोणत्याही सरकारी आर्थिक अनुदानाविना एक संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला गेला. या संघातील खेळाडूंनाही आर्थिक चणचण जाणवली. अखेर त्यांनी लोकवर्गणीचा मार्ग स्वीकारला, लोकांकडून ५०, १०० रुपये गोळा केले आणि हा संघ आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला गेला. हा भारताचा राष्ट्रीय संघ होता महिला आईस हॉकीचा. थायलंड येथे चॅलेंज चषक आईस हॉकीची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारताच्या संघाने लोकांची मदत घेतली आणि इतिहास रचला. सरकारने नकारघंटा वाजविल्यानंतर न डगमगता या खेळाडूंनी हिमतीने लोकांकडून वर्गणी गोळा केली. लोकांच्या या सहकार्याबद्दल इंडियन आईस हॉकी संघटनेचे संचालक अक्षय कुमार यांनी त्यांचे आभार मानले. याबाबत आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून मोहीम राबविली. कोणी ५० रुपये दिले, तर कोणी १०० रुपये दिले. लोकांनीही समोर येऊन आम्हाला मदत केली. आम्ही ३२ लाख रुपये गोळा केले. त्यामुळेच आज महिलांच्या संघाला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होता आले, असेही त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होताना या महिलांच्या भारतीय आईस हॉकी संघाने फिलिपिन्सचाच ४-३ असा पराभव करून विजयी सलामीही दिली. भारतीय महिला आईस हॉकीचा राष्ट्रीय संघ दोन वर्षांपूर्वीपासूनच अस्तित्वात आला आहे, हेही येथे आवर्जून सांगावेसे वाटते. हा खेळ तसा आपल्या देशात लोकप्रिय नाही. दोन वर्षांचा कालावधी खेळाचा प्रचार-प्रसार आणि संघ बांधणीतच गेला. कदाचित हा खेळ नवीन असल्यामुळे आणि सरकारच्या अधिकृत यादीत त्याचा समावेश नसल्यामुळेही सरकारने या खेळाला आर्थिक मदत नाकारली असेल. या खेळासाठी तसे मैदानही उपलब्ध नाही. एक मैदान आहे तेही डेहरादूनला… तेही बंद पडले आहे. त्यामुळे या संघाने जास्तीत जास्त सराव लद्दाख येथे केला. विशेष म्हणजे या संघातील बहुतांश खेळाडू हे लद्दाखमधीलच आहेत.
– महेंद्र आकांत
९८८१७१७८०३