विजयाचा मूलमंत्र

0
136

कल्पवृक्ष
राम आणि रावण दोघेही युद्धाकरिता सज्ज आहेत. रावण दिव्य रथावर आरूढ झाला आहे. तो बलदंड आहे. शस्त्रास्त्रांसह सर्व साधनांनी तो संपन्न आहे. दुसरीकडे रामाजवळ रथ नाही. कोणतीही साधने नाहीत. अनवाणी पायाने तो उभा आहे. शरीरावर कवच नाही. हे पाहून विभीषणाच्या मनात संशय निर्माण झाला. ही विषम लढाई पाहून त्याच्या हृदयात भीती व चिंता निर्माण झाली. अशा स्थितीत आपण कसे विजयी होणार, असा प्रश्‍न त्याने रामाला विचारला. रामाने त्याला दिलेले उत्तर म्हणजे एक विजयसूत्रच आहे. संत तुलसीदासांनी ते सर्वांसमोर ठेवले आहे. व्यक्ती, नेतृत्व किंवा संस्था संघटनांकरिता ते कायम मार्गदर्शक आहे.
युद्ध सुरू झाल्यानंतर रामाला इंद्राकडून रथ मिळतो. अन्य देवतांनी सुरवातीलाच इंद्राला रथ देण्याविषयी सुचविले होते. पण इंद्र म्हणतो, ‘‘रामाने माझ्याकडे रथाची मागणी करावी. तो सामान्य केवटाकडे गंगा पार करण्याकरिता नावेची मागणी करू शकतो. युद्धाकरिता तो रथ का मागत नाही?’’ पदावर असलेले नेहमी असाच विचार करतात. आपल्याकडे लोकांनी यावे, यात त्यांचा अहंकार सुखावत असतो. पण साधनविहीन राम त्यांच्यावर अवलंबून नसतो.
केवटाला रामाविषयी प्रेम आहे. विभीषणाचा संशयही अतीव प्रेमातून उत्पन्न झाला आहे. त्याला राम म्हणतो, ‘‘मित्रा, ज्या रथामुळे विजय प्राप्त होतो तो रथ हा नाही, जो तू रावणाजवळ पाहतोस. तो तर धर्मरथ असतो. असा धर्मरथ माझ्याजवळ आहे, म्हणून मला विजयाची खात्री आहे.’’ या धर्मरथाचे अप्रतिम वर्णन तुलसीदासांनी केले आहे. शौर्य आणि धैर्य या रथाची दोन चाके आहेत. या रथावर सत्य आणि शील यांच्या ध्वज व पताका आहेत. या रथाला बल, विवेक, इंद्रियनिग्रह व परोपकार असे चार घोडे आहेत. क्षमा, प्रेम व समता यांचे लगाम आहेत. ईश्‍वरभक्ती सारथी आहे. वैराग्याची ढाल, समाधानाची तलवार व दानाचा परशू आहे. बुद्धीची शक्ती व विज्ञानाचा धनुष्य आहे. निर्मळ मनाचा भाता आहे व त्यात सत्कर्मांचे बाण आहेत. गुरुजनांच्या पूजेचे अभेद्य कवच आहे. अशा रथावर जो आरूढ होऊन युद्ध करतो, त्याला पराजित करण्याची क्षमता कोणामध्येही नाही. हे ऐकून विभीषण रामासमोर नतमस्तक होतो.
जीवन गतिमान असेल तरच पुढे जाईल. ही गती चाकांवरच अवलंबून असते. पुढे जाण्याकरिता शौर्य, साहस, पराक्रम यांची गरज असतेच. भीती हा सर्वात मोठा अडथळा असतो. पण शौर्याला धैर्याची जोड हवी. धीर नसेल तर शूरता नुकसानही करू शकते. शिवाजी महाराज शौर्य आणि धैर्याचे अद्वितीय उदाहरण आहे. त्यांच्या धैर्याची परीक्षा पाहणारे कितीतरी प्रसंग आले. पण त्यांचा रथ भरकटला नाही. पताका आणि ध्वज सर्वांना दूरवरूनही दिसत असत. सत्य आणि शील ही या रथाची ओळख आहे. सत्य हे तत्त्व आहे, तर शील हे आचरण आहे. आपण ‘सत्यमेव जयते’ म्हणतो पण मनात कुठेतरी ‘खर्‍याचा जमाना राहिला नाही’ असे मानून खोटेपणा करतो. त्या क्षणी शील संपलेले असते. आजकाल तर उत्कृष्ट खोटे कसे बोलायचे हे शिकवले जाते. माणसे मधाळ बोलतात, खोटी स्तुती करतात, आपण किती आज्ञेत आहोत, असे भासवतात. सत्य प्रिय शब्दात सांगावे, पण भीष्म, द्रोणासारखे मौन बाळगू नये. शील म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपल्या तत्त्वापासून, ध्येयापासून न ढळणे. याचाही अर्थ आपण फार संकुचित करतो. सत्य आणि शीलामुळेच विश्‍वसनीयता निर्माण होते. बळ, विवेक, इंद्रियनिग्रह व परोपकार हे चार घोडे आहेत, त्यांच्या आधारेच हा रथ धावणार आहे. शक्ती हवीच पण योग्यायोग्यतेचा निर्णय करणारा विवेकही हवाच. इंद्रियनिग्रह असेल तरच योग्य निर्णय अमलात येतात. संवेदनशीलता असेल, तर परोपकारी वृत्ती बनते. या वृत्तीमुळेच आपल्यासोबत काम करणारी टीम तयार होते. पण क्षमा, प्रेम व समता हे या घोड्यांचे लगाम आहेत. या तीन गोष्टींनीच त्यांना नियंत्रणात ठेवावे लागते. तुलसीदासांनी समतेचा आवर्जून उल्लेख केला आहे. भेदभाव करणे हा माणसाचा स्वभाव आहे. आपण एखाद्याला डोक्यावर घेतो, तर दुसर्‍याला पायदळी तुडवतो. व्यवहारात समभाव हवा. ईश्‍वरभक्ती या रथाचे सारथ्य करते. याचा अर्थ एक उदात्त ध्येय समोर आहे. त्यामुळे तो योग्य दिशेलाच जाणार आहे. गुरुजनांचे संस्कार हेच खरे कवच असते. वैराग्य, समाधान, बुद्धी, विज्ञान, निर्मळ मन, सत्कर्म हीच जीवनातल्या खर्‍या लढाईची शस्त्रे असतात. अशा धर्मरथावर आरूढ होऊन जीवनाचा संघर्ष करण्याचा मूलमंत्र तुलसीदास देतात. विजय यापेक्षा वेगळा काय असतो?
– रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११