ईव्हीएमवर खापर न फोडता पराभवाचे आत्मचिंतन करा

0
175

दिल्लीचे वार्तापत्र
नुकत्याच पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत पंजाब वगळता भाजपाला लक्षणीय यश मिळाले आहे. उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपाने तीनचतुर्थांश बहुमत मिळवले आहे. फक्त पंजाबमध्ये कॉंग्रेसची सत्ता आली. उत्तरप्रदेशमध्ये झालेला दारुण पराभव बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आणि पंजाबमध्ये झालेला पराभव आम आदमी पार्टीचे नेते, तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पचवता आला नाही. या दोघांनीही आपल्या पराभवाचे खापर ईलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (ईव्हीएम) फोडले आहे.
ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा आरोप मायावती यांनी पत्रपरिषदेत केला. केजरीवाल यांनीही पंजाबमधील आपच्या पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार धरले आहे. काही कारण नसताना या वादात दिल्ली प्रदेश कॉंग्रेसच्या नेत्यांनी उडी घेतली आहे. हा ‘नाचता येईना अंगण वाकडे’ असा प्रकार म्हणावा लागेल.
भारतीय राजकारणाची ही शोकांतिका म्हणावी लागेल, ज्यात पराभूत पक्ष आणि त्याचे नेते आपल्या पराभवाचे खापर कशावर तरी फोडत असतात. त्यांना कोणीतरी बळीचा बकरा लागत असतो. पराभव मान्य करण्याचा मोठेपणा कोणालाच दाखवता येत नाही. मतदारांनी आपल्याला नाकारले ही वस्तुस्थिती कोणताच नेता मान्य करत नाही. तसे करणे हा त्याला कमीपणा वाटतो. ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आल्यामुळे बसपाच्या उमेदवारांना मिळालेली मते भाजपा उमेदवाराच्या खात्यात जात होत होती, असा आरोप मायावती यांनी केला. भाजपेतर पक्षांच्या उमेदवारांना मिळालेली मते ईव्हीएम स्वीकारत नव्हती वा भाजपेतर पक्षाच्या उमेदवारांना देण्यात आलेली मते आपोआप भाजपा उमेदवाराच्या खात्यात जात होती, असा मायावती यांचा भलताच आरोप होता.
मायावती यांच्या या हास्यास्पद आरोपाचा रोख भाजपावर होता. भाजपाने ईव्हीएममध्ये गडबड करून उत्तरप्रदेशात विजय मिळवला, असा मायावती यांच्या आरोपाचा मथितार्थ आहे. ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आली, हा मायावती याचा आरोप खरा मानला, तर बसपाचे राज्यात १९ आमदार कसे निवडून आले. या १९ मतदारसंघात ईव्हीएममध्ये गडबड केल्यामुळे बसपाचे १९ आमदार विजयी झाले, असे मानायचे का? मायावती या चार वेळा उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या, ते त्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये गडबडी केल्यामुळे काय? पण या प्रश्‍नांची उत्तर मायावती देणार नाहीत.
मायावती यांनी बसपाच्या पराभवाचे आत्मचिंतन करायला पाहिजे. पण तसे न करता मायावती जिंकलेल्या भाजपावर आरोप करत आहे. मायावती यांचा हा आरोप म्हणजे रडीचा डाव म्हणावा लागेल. मायावती यांचा हा आरोप म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्याबद्दल माझे पेपर नीट तपासले नाही, माझे गुण दुसर्‍या विद्यार्थ्याला दिले, असे म्हणण्यासारखे आहे.
मायावती यांनी मनाचा मोठेपणा दाखवत बसपाचा पराभव मान्य करत दणदणीत विजयाबद्दल भाजपाचे अभिनंदन करायला पाहिजे होते. त्यामुळे पराभवानंतरही त्यांची उंची वाढली असती. राजकारणात जयपराजय चालणारच, हे त्यांनी मान्य करायला पाहिजे. राजकारणात जसे कोणी कायमस्वरूपी मित्र आणि कायमस्वरूपी शत्रू नसतो, त्याप्रमाणे निवडणुकीतील कोणताही जय आणि पराजय हा शेवटचा नसतो. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाने आणि त्याच्या नेत्याने पराभवामुळे निराश आणि गलितगात्र व्हायचे नसते. तर प्रत्येक पराभवानंतर आत्मपरीक्षण करत, आपल्या हातून झालेल्या चुका दुरुस्त करत पुढे जायचे असते.
भाजपाने तर याआधी असे किती पराभव पचवले आहेत. मात्र, अशा पराभवाने भाजपा आणि आणि त्याचे नेते कधीच निराश झाले नाही. १९८४ मध्ये तर भाजपाचे फक्त दोन खासदार लोकसभेत निवडून आले होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारख्या लोकप्रिय भाजपा नेत्यालाही त्यावेळी पराभवाचा फटका बसला होता. त्यावेळीच जर भाजपा निराश झाली असती, तर आज भाजपाला २ वरून २८२ पर्यंतची झेप घेता आली नसती.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल बोलावे तेवढे कमी आहे. उचलली जीभ लावली टाळूला, यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. पंजाबमध्ये केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला मोठी अपेक्षा होती. पंजाबमध्ये सत्तेवर येण्याचे स्वप्न केजरीवाल पाहात होते. मात्र, त्या ठिकाणी त्यांना मोठा फटका बसला. त्यामुळे त्यांनी आपच्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले आहे. केजरीवाल यांचे दु:ख हे आहे की पंजाबमध्ये त्यांच्या पक्षापेक्षा अकाली दल-भाजपा युतीला जास्त मते मिळाली.
आपची मते ईव्हीएमच्या माध्यमातून अकाली दल-भाजपा युतीकडे वळवल्याचा केजरीवाल यांचा आरोप आहे. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर न करता मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणीही केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाकडे केली होती. याचा अर्थ ईव्हीएमवरून केजरीवाल यांचा विश्‍वास उडाला आहे. मात्र, निवडणूक आयोगाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली आहे. २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीत केजरीवाल यांच्या आपला ७० पैकी ६७ जागांवर दणदणीत विजय मिळाला होता. त्यावेळची निवडणूकही ईव्हीएममार्फतच झाली होती, मग त्यावेळी केजरीवाल यांनी ईव्हीएममध्ये गडबड केली, असा अर्थ काढायचा का. खरे तर ७० पैकी ६७ जागा म्हणजे संशय येण्यासारखेच बहुमत होते. पण त्यावेळी भाजपा वा कॉंग्रेस यांनी ईव्हीएममध्ये गडबड झाल्याचा आरोप केला नव्हता.
विशेष म्हणजे केजरीवाल यांच्या मागणीचीच री ओढत दिल्ली प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांनी दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांचा वापर करण्याची मागणी केली आहे. आपण काय बोलतो, याचे भान तरी अजय माकन यांनी ठेवायला हवे होते. पंजाबमध्ये त्यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. म्हणजे ईव्हीएममध्ये गडबडी करून कॉंग्रेसने पंजाब विधानसभेची निवडणूक जिंकली, असे तर माकन यांना अप्रत्यक्षपणे म्हणायचे नाही? मायावती आणि केजरीवाल यांच्याप्रमाणे माकन यांनी ईव्हीएमवर संशय घेण्याचे काहीच कारण नाही. पण मोर नाचला की लांडोरही नाचते, त्याप्रमाणे केजरीवाल यांच्या मागणीची काही गरज नसताना माकन यांनी री ओढत आपल्या बुद्धीच्या मर्यादा दाखवून दिल्या.
ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आल्याचे मायावती आणि केजरीवाल यांनी केलेले आरोप निवडणूक आयोगाने स्पष्टपणे फेटाळून लावले आहे. निवडणुकीच्या काळात आयोगाने उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचा अनेक वेळा दौरा करत राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठकी घेतल्या होत्या, त्यावेळी बसपा वा अन्य कोणत्याही पक्षाने ईव्हीएमबाबत कोणत्याही शंका घेतल्या नव्हत्या वा ईव्हीएमच्या कार्यपद्धतीबाबत कोणतेही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले नव्हते, याकडे निवडणूक आयोगाने लक्ष वेधले आहे.
ईव्हीएममध्ये गडबड करण्यात आल्याच्या आरोपांचा ठामपणे इन्कार करताना ज्यांना ईव्हीएमध्ये गडबड करण्यात आली असे वाटते, त्यांनी न्यायालयात जावे, या शब्दात आयोगाने खडसावले आहे. त्यामुळे आपल्या पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडण्यापेक्षा मायावती आणि अरविंद केजरीवाल यांनी आत्मपरीक्षण करावे, त्यातच त्यांचे भले आहे. कॉंग्रेसने जे मिळाले त्यात समाधान मानावे, उगीच मायावती आणि केजरीवाल यांच्यामागे फरफटत जाऊ नये. देशातील जनतेने मायावती आणि अरविंद केजरीवाल यांना ओळखले आहे, त्यांना त्यांची जागा दाखवली आहे, अजूनही त्यांचे डोळे उघडत नसतील तर आज जी स्थिती झाली त्यापेक्षा आणखी वाईट स्थिती देशातील जनता त्यांची केल्याशिवाय राहाणार नाही.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७