मृत्यू हेच जगातील शाश्‍वत सत्य : हरिभाऊ निटुरकर

0
142

तभा वृत्तसेवा
नागपूर, १५ मार्च
माणसामध्ये भक्ती जागृत ठेवण्यासाठीच भागवत कथा आहे. भगवंताच्या नामाने मुुक्ती मिळते, हे खरे असले तरी शेवटच्या क्षणीदेखील मानवी मुखात भगवंताचे नाव येईलच, याची खात्री नसते. अनेकांचा मृत्यू आपण जवळून बघतो. मात्र, स्वत:च्या मरणाचा विचार कुणीही करीत नाही. कसे जगावे, हे अन्य अनेक ग्रंथांनी सांगितले. परंतु, मरण कसे असले पाहिजे याची शिकवण केवळ भगवद् गीतेनेच दिली. एकूणच मृत्यू हेच जगातील शाश्‍वत सत्य होय, असे प्रतिपादन भागवताचार्य हरिभाऊ निटुरकर महाराज यांनी केले.
संत ज्ञानेश्‍वर-तुकाराम विश्‍व प्रतिष्ठानतर्फे १४ ते २० मार्च या कालावधीत देवी अहल्या मंदिर, धंतोली येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या ज्ञानयज्ञाचे १५ मार्च रोजी दुसरे पुष्प गुंफताना निटुरकर महाराजांनी श्रोत्यांना श्रीकृष्ण लीला व अन्य अनेक प्रसंगाचे रसपान केले.
महाराज म्हणाले, कर्मानुसार मनुष्याला सुख आणि दु:ख मिळते. ज्ञानी लोक अशांतीचे कारण स्वत:त शोधतात आणि सत्‌कर्माचे श्रेय भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारतात. सामान्य माणसे मात्र याचे श्रेय मी केले म्हणून लोकांना सांगतात. अहंकार व ममत्व हेच खरे दु:खाचे कारण आहे. भारतीय संस्कृती त्यागाची शिकवण देणारी संस्कृती आहे. आपल्याला पापकर्म आठवते. पण, त्याची वाच्यता होत नाही. पुण्यकर्माची वाच्यता सर्वत्र केली जाते. स्वत:ला निर्दोष मानणे हाच माणसाचा सर्वात मोठा दोष आहे. महर्षी व्यास व देवर्षी नारद यांच्यातील संवादातून निटुरकर महाराजांनी, भगवंताला सर्वार्थाने बघण्याची व ऐकण्याची लालसा असणारी भक्ती रोमरोमात असायला हवी, असे सांगितले. भगवंताचे विस्मरण ही विपत्ती तर स्मरण म्हणजे संपत्ती होय. आज संध्या कुणी करीत नाही. पण, किमान सायंकाळी भगवंताचे नामस्मरण जरूर करावे, असे त्यांनी आवर्जून सांगितले. संस्काराने मानवी देहात दिव्यत्व येते. त्यामुळे संस्कार महत्त्वाचे आहे. शस्त्र म्हणजे शक्ती व शास्त्र म्हणजे युक्ती. शिवाजी महाराज शस्त्र, तर रामदास स्वामी शास्त्री होते. त्यामुळेच तेव्हा रामराज्य अस्तित्वात होते, असेही त्यांनी सांगितले. मृत्यू कधीही कुणाची वाट बघत नाही. त्यामुळे भगवंत स्मरणातच मानवी आयुष्याचे सार्थक आहे, असे महाराजांनी पटवून दिले. या भागवत कथेला श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.