सर्व सार्वजनिक इस्पितळांमध्ये नि:शुल्क निदान व औषधे

0
223

राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर
सर्वांसाठी आश्‍वासक आरोग्यसेवा
शाळा, कार्यालयांमध्ये योगाचा व्यापक प्रसार
पुढील वर्षापर्यंत कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन
वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १६ मार्च
केंद्र सरकारने आज गुरुवारी राष्ट्रीय आरोग्य धोरण जाहीर केले. सर्वसामान्यांचे आरोग्यहित केंद्रस्थानी ठेवून जाहीर करण्यात आलेल्या या धोरणामध्ये सर्व सार्वजनिक इस्पितळांमध्ये नि:शुल्क निदान आणि औषधे उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. वंचित घटकांसाठी आरोग्य सेवा देणे हे राष्ट्रीय आरोग्य धोरणाचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज संसदेत व्यक्त केले.
बुधवारीच केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय आरोग्य धोरणास मंजुरी दिली होती. ‘सर्वांसाठी आश्‍वासक आरोग्यसेवा’, अशी या धोरणाची संकल्पना आहे. विशेषत: वंचित घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे.
शाळा आणि कार्यस्थळांमध्ये योगाचा व्यापक प्रसार करणे हे या धोरणाचे ठळक वैशिष्ट्य आहे. या धोरणामध्ये आयुमर्यादा वाढीचे उद्दिष्ट ६७.५ वर्षावरून ७० वर्षांपर्यंत नेण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, रुग्णाला मिळणार्‍या आरोग्य सेवेमध्ये कमतरता जाणवल्यास दाद मागण्यासाठी विशेष लवाद स्थापन करण्याची तरतूदही या धोरणामध्ये करण्यात आली आहे.
मागील दोन वर्षांपासून हे धोरण प्रलंबित होते. बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी आज संसदेत राष्ट्रीय आरोग्य धोरणाविषयी सविस्तर माहिती देत, या धोरणाला मंजुरी देत असल्याची घोषणा केली.
राष्ट्रीय आरोग्य धोरणामध्ये पाच वर्षांखालील बालके, गर्भवती स्त्रिया, नवजात अर्भके यांचा मृत्यूदर २०२५पर्यंत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याच प्रमाणे जन्मदर कमी करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे.
सर्व वयोगटासाठी आरोग्यकल्याण साधण्याचा हेतू असून आरोग्य सेवेचा दर्जा सुधारणे, उपचारांचा खर्च कमी करणे या बाबींना प्राधान्य देण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य सेवेवरील खर्च जीडीपीच्या २.५ टक्के करण्यात येणार आहे. सध्या हे प्रमाण १.५ टक्के आहे. चालू वर्षात काळ्या आजाराचे संपूर्ण निर्मूलन, सन २०१८पर्यंत कुष्ठरोगाचे समूळ उच्चाटन निर्धारित करण्यात आले आहे.