एनबीसीसीसोबतच्या कराराने गोसीखुर्दला मिळणार गती

0
76

तभा वृत्तसेवा
मुंबई, १६ मार्च
गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामाला गती देण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारच्या अखत्यारीतील नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन (छइउउ) या कंपनीशी सामंजस्य करार करण्यात आला असून, याद्वारे पहिल्या टप्प्यात १ हजार ७० कोटी रुपयांची कामे कंपनीकडून केली जातील. ही कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण होतील, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
गोसीखुर्द प्रकल्पाच्या कामास गती देण्याच्या दृष्टीने एनबीसीसीकडे प्रकल्पातील काही घटकांची जबाबदारी सोपविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे १ हजार ७० कोटी रूपये किंमतीची कामे कंपनीकडे सोपविण्यात येत असून, त्यामुळे प्रकल्पाच्या कामाचे नियंत्रण व अंमलबजावणी होऊ शकेल. जलसंपदा विभागाकडील प्रकल्पांबाबत अशा प्रकारे प्रथमत:च बाह्य संस्थेमार्फत काम करण्यात येत आहे. ही संस्था प्रकल्प सल्लागार व अंमलबजावणी अशी दोन्ही कामे करेल.
मुंबईत झालेल्या सामंजस्य करारप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस. चहल, प्रकल्प समन्वयक (गोसीखुर्द) व्ही. एस. कुलकर्णी, कंपनीचे कार्यकारी संचालक डॉ. अनुपकुमार मित्तल, योगेश शर्मा आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे आदी उपस्थित होते.