वर्‍हाडात गारपीट व वादळाचा तडाखा

सर्वत्र गहू व तुरीचे तसेच फळबागांचे नुकसान

0
93

तभा वृत्तसेवा
अकोला, १६ मार्च
अकोला जिल्ह्यातील पातूर, बार्शिटाकळी, मूर्तिजापूर, बाळापूर व अकोला या पाच तालुक्यात १५ व १६ मार्च अशा दोन दिवशी वादळ आणि गारपिटीचा जोरदार तडाखा बसला असून अनेक ठिकाणच्या गहू आणि तूर पिकाचे पूर्णत: नुकसान, तर फळबागांचीसुद्धा हानी झाली आहे.
जिल्ह्यातील बार्शिटाकळी तालुक्यात पावसाच्या तडाख्याने घरे कोसळून चार जण जखमी झाले. तर या पावसामुळे शेतकर्‍यांची तारांबळ उडाली.
पातूर तालुक्यात वादळ व गारपीट
संपूर्ण पातूर तालुक्यात गुरुवार, १६ मार्च रोजी दुपारी ३ वाजताचे दरम्यान आलेल्या अवकाळी व वादळी वार्‍यासह प्रचंड गारपीट झाल्यानेे जनजीवन विस्कळीत झाले. आज ३ वाजेच्या दरम्यान आगीखेड, कोठारी खु., कोठारी बु|, खामखेड, पार्डी, चेलका, तांदळी या भागात प्रचंड वादळी वार्‍यासह गारपीट झाल्यानेे जवळपास ५० टक्के पिकांचे त्यामध्ये गहू, हरभरा, कांदा, भुईमूग, टरबूज, काकडीसह फळबागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
याशिवाय तालुक्यातील बाभुळगाव, देऊळगाव, चान्नी, मळसूर, उमरा परिसरात वादळी वार्‍यामुळे घरावरील टीनपत्रेसुद्धा उडाली आहेत. पातूरसह तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळून पडली आहेत. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पातूर शहरात झाडे पडल्यामुळे विद्युत तारा तुटल्या असून विद्युतपुरवठा बंद आहे. तसेच तांदळी तथा हिंगणा येथे घरावरील टीनपत्रे उडाल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या गारपीट तथा वादळी वार्‍यासह प्रचंड नुकसान झालेल्यांचे तत्काळ सर्वेक्षण करून अनुदान मिळण्याची अपेक्षा शेतकरीवर्गाकडून होत आहे.
बार्शीटाकळी तालुक्यात रिमझिम
बार्शीटाकळी तालुक्यात रिमझिम पाऊस झाल्यामुळे नाफेडच्या खरेदी केंद्रावर शेतकर्‍यांनी आणलेली तूर परत नेली.
बार्शिटाकळी तालुक्यातील धाबा, लोहगड, निंबी, चेलका, सेवानगर, बेलखेड, शेलगांव, जनुना, बोरमळी, जांभ वसु, मुंगसाजी नगर, धामणदरी, खडकी, कोथळी बु., हलदोली, किनखेड, साखरविरा, लोहगडतांडा, येथे खूपच नुकसान झाले आहे. लोहगड तांडा येथील शेतकरी मधुकर दलपत जाधव यांच्या शेतातील कच्चे टिनपत्र्याचे घर हवेमुळे पडून घरात आश्रयास असलेले मंगेश हिम्मत जाधव, राजेश मनिराम चव्हाण, ऋषिकेश मधुकर राठोड, तुळशीराम मंजू पवार जखमी झाले आहेत. बाळापूर तालुक्यात शहरासह हातरुण व परिसरात जोरदार पाऊस झाला.
मूर्तिजापूर शहर, कुरूम व इतर ठिकाणी वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाल्याचे आमच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. अकोला शहरासह काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.तर काही ठिकाणी तुरळक सरी कोसळल्या. या पावसामुळे जिल्ह्यातच थंडी पुन्हा आली आहे.
मंगरुळनाथ शहरात गारा
वाशीम जिल्ह्यातील मंगरुळनाथ शहरातील काही भागात व तालुक्यात काही ठिकाणी हरभराच्या आकाराच्या गारासह अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने गहू व हरभरा पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या गारांसह पावसामुळे एकच धांदल उडाली.
वाशीममध्ये तुरळक पाऊस
दुपारी ४.३० वाजताचे दरम्यान वाशीम शहरातही तुरळक पाऊस पडला. ५ ते १० मिनिटे पडलेल्या या पावसामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला होता.
बुलढाणा व परिसरात अवकाळी पाऊस
सकाळपासून ढगाळी वातावरण होते. त्यामुळे वातावरणात झालेल्या बदलाने १६ रोजी दुपारी २ ते २.३० च्या दरम्यान वादळी वार्‍यासह अवकाळी पाऊस बुलढाणा व परिसरात झाला. त्यामुळे गहुू हरभरा, आंबा, रब्बी ज्वारी यासह फळबागचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
खामगावात तुरळक
गुरुवारी दुपारी मेघगर्जनेसह शहर व परिसरात काही ठिकाणी तुरळक अवकाळी पाऊस झाला. १० ते १५ मिनिटे झालेल्या या पावसाने सर्वांचीच तारांबळ उडाली. मात्र, कुठेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.