पर्रीकरांच्या नेतृत्वात गोव्याला मिळाले स्थिर सरकार : गडकरी

0
98

तभा वृत्तसेवा
मुंबई, १६ मार्च
गोव्यात बहुमतासाठी आवश्यक इतर पक्षांचा पाठिंबा आम्हाला मिळाला. आम्ही वेगाने हालचाली करत राज्यपालांकडे दावा सादर केला आणि सरकार स्थापन केले. हे देशातील काही पहिलेच उदाहरण नाही. यात भाजपाने चुकीचे व घटनाबाह्य काहीही केलेले नसून, उलट मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्याला एक स्थिर व प्रामाणिक सरकार मिळाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय वाहतूक मंत्री व गोव्याचे निवडणूक प्रभारी नितीन गडकरी यांनी केले.
मुंबई येथील शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. गोवा विधानसभेचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपाने सत्तास्थापनेसाठी केलेल्या हालचालींमध्ये गडकरींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी घडलेल्या घडमोडींची त्यांनी सविस्तर माहिती दिली.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, मनोहर पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली भाजपाने बहुमत सिद्ध केल्याने आता ‘दूध का दूध, पानी का पानी’ स्पष्ट झाले आहे. गोव्याच्या विकासासाठी स्थिर व केंद्र सरकारशी चांगले संबंध असणारे सरकार आवश्यक आहे. भाजपाने राज्यात पर्रीकरांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार देत गोव्यातील जनतेची गरज पूर्ण केली आहे, असे ते म्हणाले.
कॉंग्रेसची बस चुकली!
आम्ही निकालानंतर अतिशय वेगाने हालचाली केल्या. मात्र, सर्वाधिक जागा मिळवणार्‍या कॉंग्रेसला आपला नेताही निवडता आला नाही. त्यामुळे त्यांना आलेल्या संधीचा फायदा घेता आला नाही. असा उशीर केल्यानेच कॉंग्रेसची बस चुकली, असा टोला गडकरी यांनी यावेळी लगावला. ते म्हणाले की, ज्यावेळी आम्ही सत्तास्थापनेसाठी हालचाली करीत होतो तेव्हा कॉंग्रेसचे प्रभारी काय करीत होते? इतर पक्षांचा पाठिंबा मिळवण्यापासून त्यांना कोणी रोखले होते? कॉंग्रेसमध्ये अंतर्गत फूट असल्यानेच त्यांच्यावर ही वेळ आली असल्याचे गडकरी म्हणाले. गोव्यात सर्वाधिक जागा जरी कॉंग्रेसला मिळाल्या असल्या तरी सर्वाधिक ३४ टक्के मते आम्हाला मिळाली असल्याने गोव्यातील जनमत अद्याप आमच्याच बाजूने असल्याचे ते म्हणाले. आम्ही गोव्यात कोणतीही चुकीची गोष्ट केली नसून, आपला नेताही निवडू न शकणारी कॉंग्रेस आमच्यावर आरोप करत असल्याची टीका त्यांनी केली. कॉंग्रेसच्या एका सदस्याने आताच राजीनामा दिला असून ही तर फक्त सुरुवात असल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.