ट्रम्प यांच्या नव्या आदेशाला न्यायालयाची स्थगिती

0
210

वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, १६ मार्च
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या नवीन सुधारित बंदी आदेशाला हवाई न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सहा मुस्लिमबहुल देशातील नागरिकांना अमेरिकेत प्रवासबंदी करण्यासाठी, ट्रम्प यांनी हा आदेश जारी केला होता.
यापूर्वीही ट्रम्प यांचा मुस्लिम प्रवेशबंदी आदेश अमेरिकेतील बहुतेक न्यायालयाने फेटाळून लावले होते. त्यामुळे त्यांनी या आदेशामध्ये सुधारणा केली आणि नवे आदेश जारी केले. परंत, या आदेशावरही न्यायालयाने स्थगिती आणून ट्रम्प यांची कोंडी केली आहे.
दरम्यान, नवीन बंदी आदेशाचा अनेक संघटनांनी निषेध केला असून, राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली मुस्लिम व स्थलांतरितांवर केलेले हे आक्रमण असल्याचे या संघटनांनी म्हटले आहे. नव्या आदेशामध्ये सीरिया, सुदान, इराण, लिबीया, सोमालिया व येमेन या देशातील लोकांना अमेरिकेत येण्यावर बंदी घालण्यात आली होती. इराकला नव्या आदेशामधून वगळण्यात आले होते. साऊथ आशियन अमेरिकन लिडिंग टुगेदर, साऊथ आशियन बार असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका, नॅशनल आशियन पॅसिफिक अमेरिकन बार असोसिएशन यांनी ट्रम्प यांच्या नव्या आदेशाचा निषेध केला आहे. ट्रम्प यांचा नवा सुधारित कार्यादेश १५ मार्चपासून अंमलात येणार होता. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा आदेश मूलभूतरीत्या चुकीचा असल्याचे हवाई न्यायालयाचे न्या. डेरीक वॉटसन यांनी आपल्या ४३ पानी निकालपत्रात म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार : ट्रम्प
न्यायालयाने आपली कक्षा ओलांडली असून आपण या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहोत, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली. अमेरिकेच्या घटनेने राष्ट्राध्यक्षांना स्थलांतरांबाबतचे हक्क स्थगित करण्याचे अधिकार दिलेले आहेत. देशाच्या सुरक्षाबाबत हे अधिकार देण्यात आले असून, आपण त्याचे पालन केले आहे, असे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. आपण सर्वोच्च न्यायालयात विजयी होऊ, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.