क्षमता दाखविण्याची हीच योग्य वेळ : ऑल्टमन्स

0
102

भारतीय हॉकी संघाचे शिबिर सुरू
वृत्तसंस्था
बंगळुरू, १६ मार्च
गत काही वर्षांत भारतीय हॉकी संघाने आपल्या प्रदर्शनाने समस्त जगाचे लक्ष वेधले, परंतु आता आमच्यात काय क्षमता आहे, हे जगाला दाखविण्याची योग्य वेळ आली आहे, असे भारतीय पुरुष हॉकी संघाचे मुख्य प्रशिक्षक रोएलॅण्ट ऑल्टमन्स म्हणाले.
अलीकडेच हॉकी इंडिया लीगनंतर कलिंगा लान्सर्सचा कर्णधार मोर्तिझ फ्यूरस्टे म्हणाला होता की, भारतीय हॉकी संघ लवकरच जागतिक हॉकी क्रमवारीत अव्वल तीन क्रमांकात स्थान मिळवू शकतो. ऑल्टमन्स यांनीही त्याच्या मताशी सहमती दर्शविली. ऑल्टमन्स यांच्या मार्गदर्शनाखाली येथील साई केंद्रात वरिष्ठ हॉकीपटूंचे राष्ट्रीय शिबिर सुरू आहे.
तीन-चार वर्षांपूर्वी भारतीय संघाला एक स्पर्धक म्हणून गांभीर्याने घेत नव्हते, परंतु अलीकडे भारतीय संघाने अव्वल संघांना चिवट झुंज दिली आणि आता आम्ही त्यापेक्षाही वरची मजल गाठू शकतो, हे दाखविण्याची वेळ आली आहे, असे ऑल्टमन्स म्हणाले.
आशिया चषक (पुरुष) चॅम्पियनशिप व प्रतिष्ठेचा ज्युनिअर विश्‍वचषक जिंकून नवीन ऑलिम्पिक प्रक्रियेची चांगली सुरुवात केली आहे. ही प्रक्रिया भारतीय हॉकीला जगश्रेष्ठत्वाकडे नेईल, असेही ते म्हणाले.
भारतीय हॉकी संघ एप्रिल महिन्यात सुलतान अझलन शाह चषक, त्यानंतर जून महिन्यात जागतिक लीग उपांत्य फेरी, सप्टेंबर महिन्यात पुरुषांचे आशिया चषक व डिसेंबर महिन्यात जागतिक लीग अंतिम फेरीत भाग घेईल.
पुढील वर्षी होऊ घातलेल्या विश्‍वचषकासाठी मजबूत भारतीय संघबांधणीवर ऑल्टमन्स यांचे लक्ष केंद्रित झाले आहे. ते म्हणाले की, यापूर्वीची ऑलिम्पिक प्रक्रियेची सुरुवात २०१४ सालापासून केली होती आणि यात आम्ही बरीच प्रगती साधली होती. आता २०२० टोकिओ ऑलिम्पिक व २०१८ पुरुषाचे विश्‍वचषक हे आमचे पुढील लक्ष्य आहे, यात दुमत नाही. आगामी सर्व स्पर्धेतील भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी बजावून आत्मविश्‍वास प्राप्त करेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
प्रत्येक देशाचे संघ अशा संक्रमणावस्थेतून जात असतात. हॉलंडकडे ज्युनिअर संघात आधी १२ खेळाडू होते, तरीही त्यांनी ज्युनिअर विश्‍वचषकात सातवे स्थान मिळविले. अशा युवा खेळाडूंची क्षमता वाढविणे महत्त्वाचे असते, असेही ते म्हणाले.
सांघिक खेळात उत्कृष्ट निकालासाठी प्रत्येक खेळाडूंना जबाबदारी वाटून देणे महत्त्वाचे आहे. खेळाडूंनी आपल्या जबाबदारीवर कार्य केले पाहिजे. खेळाडूंनी वैयक्तिक कामगिरीसाठी नव्हे, तर संघाच्या यशासाठी खेळणे महत्त्वाचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.