विश्‍वचषक जिंकल्यास हॉकीपटूंना एक लाख रुपये : अशोक ध्यानचंद

0
150

वृत्तसंस्था
भोपाळ, १६ मार्च
जर २०१८ मध्ये भारतीय हॉकी संघाने विश्‍वचषक जिंकल्यास आपण प्रत्येक खेळाडूला १-१ लाख रुपये रोख पारितोषिक देऊ, अशी घोषणा १९७५ साली विश्‍वचषक विजेत्या भारतीय हॉकी संघातील स्टार खेळाडू अशोक ध्यानचंद यांनी केली आहे.
विश्‍वचषक जिंकण्याला ४२ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम येथे समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारंभात त्यांनी ही घोषणा केली. आपल्या आठवणींना उजाळा देताना अशोक ध्यानचंद म्हणाले की, जेव्हा विश्‍वचषक जिंकून घरी परतलो, तेव्हा वडिलांनी (मेजर ध्यानचंद) माझी पाठ थोपटली होती. ती शाबासकीची थाप मला आजही जाणवते व रोमांचित करते.
एकेकाळी भारतीय हॉकीचा सुुवर्णकाळ होता, परंतु आज पिछाडीवर आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
या प्रसंगी १९८०च्या ऑलिम्पिकचे सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघातील खेळाडू एम.के. कौशिक हेसुद्धा उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्व खेळाडू व क्रीडा रसिकांना मिठाई वाटण्यात आली.