स्मिथ, मॅक्सवेलने डाव सावरला

0
146

ऑस्ट्रेलिया ४ बाद २९९, स्मिथचे नाबाद शतक, मॅक्सवेलचे नाबाद अर्धशतक
वृत्तसंस्था
रांची, १६ मार्च
पहिल्या सत्रात तीन मोहरे गमावल्यानंतर कर्णधार स्टिव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेलने दमदार खेळी करीत भारताविरुद्धच्या तिसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियाचा डाव खंबीरपणे सावरला. पहिल्या दिवसअखेरीस ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ९० षटकांत ४ बाद २९९ धावा उभारल्या. खेळ थांबला तेव्हा स्मिथ ११७ धावांवर, तर मॅक्सवेल ८२ धावांवर खेळत होते. स्मिथचे हे १९ वे कसोटी शतक ठरले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मॅट रेनशॉ (४४) व डेव्हिड वॉर्नरने ५० धावांची सलामी भागीदारी करून डावाची सुरुवात चांगली केली, परंतु नंतर घसरगुंडी उडाली. उपाहारापर्यंतच्या खेळात ऑस्ट्रेलियाच्या ३० षटकांत ३ बाद १०९ धावा झाल्या होत्या. स्मिथने एक बाजू सांभाळीत स्वतःचे शतक साजरे केले व संघाचा डाव सांभाळला. स्मिथने आधी हॅण्ड्‌सकॉम्बसोबत चौथ्या गड्यासाठी ५१ धावांची व नंतर ग्लेन मॅक्सवेलसोबत नाबाद पाचव्या गड्यासाठी १५९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. स्मिथने २४४ चेंडूत शतकी खेळी करताना १३ चौकार हाणले, तर मॅक्सवेलने १४७ चेंडूत नाबाद ८२ धावांची खेळी करताना ५ चौकार व २ षटकार हाणले.
भारताकडून वेगवान गोलंदाज उमेश यादवला ६३ धावात २ बळी टिपण्यात यश मिळाले, तर फिरकी गोलंदाज आर. अश्‍विन व रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक बळी टिपला.
धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : मॅट रेनशॉ झे. कोहली गो. यादव ४४, डेव्हिड वॉर्नर झे. व गो. जडेजा १९, स्टीव्ह स्मिथ खेळत आहे ११७, शॉन मार्श झे. पुजारा गो. अश्‍विन ०२, पीटर हॅण्ड्‌सकॉम्ब पायचीत गो. यादव १९, ग्लेन मॅक्सवेल खेळत आहे ८२, अवांतर १६, एकूण ९० षटकांत ४ बाद २९९.
गडी बाद होण्याचा क्रम : १-५०, २-८०, ३-८९, ४-१४०.
गोलंदाजी : ईशांत शर्मा १५-२-४६-०, उमेश यादव १९-३-६३-२, आर. अश्‍विन २३-२-७८-१, रवींद्र जडेजा ३०-३-८०-१, मुरली विजय ३-०-१७-०.
झेप मारीत चेतेश्‍वरने टिपला झेल
चेंडू मार्शच्या बॅटवर व्यवस्थित आला नाही आणि बॅटच्या जवळून निघून पॅडला लागून चेंडू शॉर्ट लेगच्या दिशेने उसळला. शॉर्ट लेगवर उभा असलेल्या चेतेश्‍वर पुजाराने आपल्या डाव्या बाजूने झेप मारीत शानदार झेल पकडला. तत्पूर्वी, शॉन मार्शला विराटने उमेश यादवच्या चेंडूवर एक जीवदानसुद्धा दिले होते. त्याने स्लीपमध्ये मार्शचा झेल सोडला, परंतु मार्श त्याचा फायदा उचलू शकला नाही व ऑस्ट्रेलियाचा तिसरा फलंदाज बाद झाला.
विराटच्या उजव्या खांद्याला दुखापत
३९.१ षटकात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला मैदान सोडावे लागले. या वेळी फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा गोलंदाजी करीत होता. जडेजाच्या चेंडूवर पीटर हॅण्डसकॉम्बने मिडऑनवर फटका मारला, तो रोखण्यासाठी विराटने झेप मारली व यात त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. त्याच्या जागी अभिनव मुकुंद बदली खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षण करण्यास मैदानावर आला.