पराभवाचा धडा

0
144

विजयाचे भागीदार अनेक असतात आणि पराभव हा पोरका करून जातो किंवा त्याला कोणी वाली नसतो, या आशयाची आपल्याकडे म्हण आहे. याची प्रचीती अगदी गल्लीतल्या निवडणुकीपासून ते दिल्लीपर्यंत आणि सोसायट्यांच्या निवडणुकांपासून कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांपर्यंत सगळीकडे येते. आता पाच राज्यांतील निवडणुकांमध्येही तेच झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या कामामुळे आणि मोदी लाटेमुळे उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडची वाटचाल कॉंग्रेसमुक्तीच्या दिशेने सुरू झाली असून, मणिपूर आणि गोव्यात भाजपाची सत्ता स्थापन झाली आहे. फक्त पंजाबमध्ये कॉंग्रेसचा मुख्यमंत्री पदारूढ झाल्याने कॉंग्रेसची लाज राखली गेली. कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि आम आदमी पार्टीची देखील चांगलीच खोड मोडली गेली आहे. मोदी लाटेत आपचा धुव्वा उडाला आहे. त्यांचा झाडू ना गोव्यात दिसला ना उत्तरेत. पंजाबमध्येही सत्ता स्थापनेची त्यांची स्वप्ने हवेत विरली. जग डिजिटायझेशनवर स्वार झाले असताना या पक्षाचे नेते पराभवासाठी ईव्हीएम मशीनला दोष देत आहेत. दिल्ली महापालिकेच्या निवडणुकीत ईव्हीएम नको, बॅलेट पेपरचा वापर करावा, ही त्यांची मानसिकता पराभव डोळ्यापुढे दिसत असल्याचेच दर्शवत आहे. समाजवादी पार्टीचा पराभव कौटुंबिक कलहामुळे झाला हे उघड आहे. पण मायावतींनी त्यांच्या पराभवासाठी ईव्हीएमवर खापर फोडले आहे. कॉंग्रेस पक्षाला म्हणजे राहुल बाबांना हे अपयश थोडे कमी वाटत आहे. पण पराभवाची कारणे शोधावी, असे त्यांच्या ध्यानीमनीही नाही. पक्षनेतृत्वात मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पण त्याने फार काही फरक पडेल, अशी स्थिती नाही. राहुल गांधी यांची जेव्हापासून पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे, तेव्हापासून देशाच्या भिन्न भागांत झालेल्या २४ मोठ्या निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागल्याचा एक निष्कर्ष नुकताच जाहीर झाला आहे. ही आकडेवारी त्यांच्या नेतृत्वक्षमतेचे आकलन करण्यासाठी पुरेशी ठरावी. दरम्यानच्या काळात राहुलच्या नेतृत्वाविरोधात कॉंग्रेसमध्ये आवाज उठले नाहीत असे नाही, पण ते पद्धतशीरपणे दाबण्यात आले. जाब विचारणार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला किंवा त्यांची संघटनेत कोंडी केली गेली. आता मात्र राहुलच्या नेतृत्वाची खरोखरीच पडताळणी करण्याची पाळी आली आहे. ना राहुल गांधींचा प्रभाव पडत आहे, ना प्रियंका गांधी राजकारणात येण्यास तयार आहेत. सोनिया गांधी तर प्रकृतीमुळेच हतबलच झाल्या आहेत. गांधी घराण्यातील कोणतीही व्यक्ती आज तरी मोदींच्या विकासाच्या राजकारणाला पर्याय देतील आणि त्यांचा करिष्मा विसरण्यास जनतेला बाध्य करतील, अशी परिस्थिती नाही. आजची पिढी केवळ बोलण्यावर विश्‍वास ठेवणारी नाही, तिला काही तरी करून दाखवणारे नेतृत्व हवे आहे. कॉंग्रेस पक्ष गांधी घराण्याच्या त्यागाची उदाहरणे किती दिवस देणार आणि देशाची जनता त्याला कितीदा भुलणार हा देखील प्रश्‍न आहेच. कॉंग्रेसने आता नव्या नेतृत्वाचा शोध घ्यायला हवा. मणिपुरात सत्तेवर आलेले बीरेन सिंग हे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसी आहेत. ते कॉंग्रेस सोडून भाजपात सामील झाले. कॉंग्रेसने सातत्याने दुर्लक्ष केल्याने त्यांनी पक्षबदल केला आणि आज कॉंग्रेसला आव्हान देण्यात त्यांच्याच सिंहाचा वाटा आहे. अरुणाचलमध्येही भाजपाला गतवेळी एकही जागा मिळाली नव्हती, पण तेथेही बंडाखोर कॉंग्रेस नेत्यांना जवळ करण्याचा मोठेपणा भाजपाने दाखवला आणि आपला सत्तेचा सोपान सुकर केला. उत्तराखंडमध्ये कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय बहुगुणा भाजपवासी झाले आणि त्यांनी कॉंग्रेस पक्षाचा एक मोठा वर्ग भाजपाकडे वळवला. तिकडे उत्तर प्रदेशात रिटा बहुगुणा यांनी कॉंग्रेसशी नाते तोडून भाजपात प्रवेश घेतला. कॉंग्रेसची ज्येष्ठ मंडळी पक्षत्याग करीत असताना त्या-त्या राज्यांचे प्रभारी काय करीत होते, हा प्रश्‍नच आहे. त्यांना रोखण्याचे प्रयत्न झाले का आणि झाले नसतील तर प्रभारींना जाब विचारण्यात आला का? यासारखे अनेक प्रश्‍न कॉंग्रेसच्या पराभवासाठी कारणीभूत आहेत, याकडे डोळेझाक करता यायची नाही. पक्षातील कोंडाळ्याची नस पक्की ओळखून संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारमधील दोन मंत्र्यांनी राहुलभोवतालच्या चौकडीवर टीका केली आहे. पक्षाचे नवनेतृत्व खुशामतखोरीच्या राजकारणाला बळी पडत आहे, असे मत माजी आदिवासी विकास आणि पंचायत राज मंत्री किशोरचंद्र देव आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री अश्‍विनी कुमार यांनी व्यक्त केले आहे. राहुल गांधींभोवती कोंडाळे आहे, हे मान्य करणारीच त्यांची विधाने आहेत. हे कोंडाळे हटविण्याची आणि जनतेला, कार्यकर्त्यांना नेत्यांपर्यंत पोहोचू देण्याची मानसिकता जोवर विकसित होत नाही, तोवर पक्षाचे काही खरे नाही. दिग्विजयसिंग हे त्यातील एक आहेत. गोव्यात यांनी पक्षाचे जास्त आमदार येऊनही काहीच हालचाल न केल्याने हाता-तोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला गेला. नितीन गडकरी तत्परतेने दिल्लीहून आले. त्यांनी पर्रीकरांच्या साथीने गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीसह अपक्ष आमदारांचे समर्थन मिळविले आणि बहुमताचा आकडा गाठत कॉंग्रेसला धोबीपछाड दिला. हीच परिस्थिती मणिपूरमध्येही बघायला मिळाली. प्रिया दत्त यांना वाटते की पक्षाला स्वयं प्रतिकारक्षमता घटण्याचा रोग जडला आहे. प्रत्येक कॉंग्रेस कार्यकर्त्याने हृदयातून प्रयत्न केल्यास संघटना पुन्हा बांधली जाऊ शकेल. काही लोक पक्षाची पदे वर्षानुवर्षांपासून भोगत आहेत, पण त्यांच्याविरुद्ध काहीच कारवाई होत नाही, हा या पक्षाचाच दोष म्हणावा लागेल. कोणी राष्ट्रीय नेता शहरात आला की त्यांचे आगत-स्वागत करायला विमातळावर धाव घेणारी एक वेगळीच जमात राजकीय पक्षांमध्ये जन्माला घातली आहे. पुण्या-मुंबईत अथवा महानगरांमध्ये या मंडळींचा आपला वेगळा ऋतबा आहे. अशा मंडळींना कॉंग्रेसमध्ये मुळीच तोटा नाही. उलट अशांचेच पक्षात पीक आलेले आहे. हे पीक पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांचा घात करीत आहे, त्यांच्या प्रगतीत बाधा उत्पन्न करीत आहे. देशाच्या ग्रामीण भागात जेथे जास्तीत जास्त लोकसंख्या वास करते तेथील जनतेचा मूड यांच्या कधी ध्यानात आला नाही. त्यामुळेही कॉंग्रेसच्या विजयाच्या मांडणीची गणितं चुकत आहेत. हा पक्ष अजूनही स्वातंत्र्य आम्ही मिळविले, आम्ही त्याग केला, आम्ही संघर्ष केला यातच समाधान मानत आहे. येणार्‍या पिढीने पुढच्या पिढीसाठी पायवा रचावा, असे वाटूनही आता फारसे काही होईल, असे नाही. कारण वर्षानुवर्षे नवनेतृत्व घडवण्याची परंपराच या पक्षाच खंडित झाली आहे. म्हणूनच उत्तरप्रदेशसह पाच राज्यांमध्ये भाजपाच्या झालेल्या विजयावर प्रतिक्रिया व्यक्त करातना नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले, आता विरोधकांनी २०१९ च्या नव्हे, तर २०२४ च्या लोकसभेच्या तयारीला लागावे. इतका या पराभवाचा झटका जबरदस्त आहे. कॉंग्रेसमधील दोषारोपणाला आता कोणी अडवू शकणार नाही. पराभवातून पक्षाने धडा घेण्याची गरज आहे.