सांगा कसं जगायचं?

0
183

तीन हसणार्‍या संन्याशांची ही कथा चीनमध्ये फार प्रसिद्ध आहे. हे तीन संन्यासी कायम हसायचे. ‘लाफिंग बुद्धा’चे ते अनुयायी होते. ते गावोगाव फिरायचे. एखाद्या प्रमुख स्थळी उभे राहून जोरजोरात हसायचे. पाहता पाहता गर्दी जमायची आणि सर्वच लोक हसायचे. एक शब्दही ते कधी बोलले नाहीत, प्रवचन नाही, उपदेश नाही. फक्त हसायचे आणि हसवायचे ते. लोकांचा मूडच बदलून जात असे. ते आनंदाने हसत, एकमेकांची थट्‌टा करत. संन्याशांनी काहीतरी बोलावे म्हणून वेगवेगळ्या हरकती करत. एक दिवस त्यांच्यापैकी एका संन्याशाचा मृत्यू झाला. आजतरी ते दुःखी असतील, हसणार नाहीत, असे सर्वांना वाटले. पण, ते तर अधिक जोराने हसत होते. लोकांनी त्यांना कारण विचारले. आज पहिल्यांदा ते बोलले. ते म्हणाले, ‘‘आम्ही त्याच्यासोबत, कोण आधी जाणार याची पैज लावली होती. तो जिंकला. त्याचा विजय आम्ही साजरा करीत आहोत आणि हसणे हीच त्याला खरी श्रद्धांजली ठरेल.’’ लोकांनी त्याच्या अन्त्यसंस्काराची तयारी सुरू केली. या संन्याशांनी त्याला स्नान घालू दिले नाही. नवीन वस्त्रही चढवू दिले नाही. कारण त्याने तसे मृत्यूपूर्वी त्यांना सांगून ठेवले होते. त्याला चितेवर ठेवण्यात आले. प्रचंड गर्दी जमली होती. त्याच्या सहकार्‍यांनी त्याला अग्नी दिला आणि ते एकदम चितेपासून दूर पळाले. कारण, अचानक फटाके फुटायला सुरुवात झाली. भुईनळे उडायला लागले. चितेवर फटाका शो सुरू झाला. त्या विचित्र प्रकारामुळे लोकही हसायला लागले. ते संन्यासी म्हणाले, ‘‘आत्ता कळले कपडे न बदलण्याचे कारण. मृत्यूनंतरही तू आम्हाला हरविलेस आणि लोकांना हसविलेस.’’
जगण्याकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन हा संन्यासी आपल्याला देतो. हसणे आणि रडणे या मूलभूत मानवी भावना आहेत. लहान मुलाच्या चेहर्‍यावर सुंदर हास्य सहजच विलसत असते. ते त्याला कुणी शिकवत नाही. भूक लागली, त्रास झाला, वेदना असली की मूल रडते. याचा अर्थ रडणे एखाद्या समस्येतून निर्माण होते. त्याचे समाधान झाले की ते पुन्हा हसायला लागते. पण, माणूस मोठा झाला म्हणजे गरजा आणि भुका वाढतात. त्यामुळे समस्याही वाढतात. सकाळी आईने दूध दिल्यानंतर मूल पुन्हा खेळायला लागते. दुपारी भूक लागली तर आई दूध देईल का, या चिंतेने ते पुन्हा रडत नाही. पण, माणूस मोठा झाला की त्याला तीन-चार पिढ्यांची चिंता सतावते. जीवनातला संघर्ष वाढतो, संबंधातले ताणतणाव वाढतात. परिस्थितीला तोंड देता देता माणूस मेटाकुटीला येतो. आपल्या अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही. अनेक वास्तव, अवास्तव काळज्या बेचैन करतात. समाजातील आपले स्थान टिकवण्याचा दबाव असतो. या सर्वांचा परिणाम म्हणजे माणूस जीवनातले हास्य गमावतो. राग, द्वेष, कुरकुर, तक्रार, कटुता हे त्याचे साथी बनतात. शरीरावर, मनावर त्याचे हानिकारक परिणाम होतात. मग हास्य क्लब काढावे लागतात. कृत्रिमपणे हासण्याचा कार्यक्रम करावा लागतो. आपली घरे, कार्यालये, शेजार ही निरागस हास्याची केंद्रे का बनत नाहीत? या सर्व ठिकाणी मनमोकळे हास्य परत आले पाहिजे. हास्य म्हणजे आनंद, प्रसन्नता, समाधान. हासण्याचे अनेक फायदे आज तज्ज्ञमंडळी सांगतात. मेंदूवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. हास्य उत्प्रेरकाचे काम करते. कोणत्याही कामाला त्यामुळे गती मिळते, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. ‘मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण|’ असे आपले तुकोबाराय सांगूनच गेले आहेत. अहंकारी माणूस दुसर्‍यावर हसू शकतो. उथळ माणूस उगाच हसतो. बळे बळे हसणारा स्वतःची आत्मवंचना करून घेतो. पण, निरामय हास्य आत्मिक आनंद देते. हे हास्य संक्रामक असते. याकरिता स्वतःकडे अलिप्तपणे व विनोदबुद्धीने पाहण्याचा स्वभाव विकसित करावा लागतो. समस्यांचा बाऊ न करता वस्तुनिष्ठ विचार करून मार्ग शोधावा लागतो. जेथे मार्गच नाही तेथे चिंता करूनही उपयोगच नसतो. ‘लिव्ह लाईफ सिन्सिअर्ली ऍण्ड नॉट सिरीयसली’ असे म्हणतात. त्यामुळे हलक्याफुलक्या क्षणांचा आनंद घेत समोर जायचे असते. ही एक आध्यात्मिक साधनाच असते. पाडगावकर म्हणतात,
‘पायात काटे रुतून बसतात,
हे अगदी खरं असतं
आणि फुलं फुलून येतात,
हे काय खरं नसतं?
काट्यासारखं सलायचं की
फुलासारखं फुलायचं
तुम्हीच ठरवा
सांगा कसं जगायचं
कण्हत कण्हत की गाणं म्हणत
तुम्हीच ठरवा…’
रवींद्र देशपांडे,८८८८८०३४११