राहुल, तुम्हाला केजरीवाल आठवतात का?

0
173

मागोवा

उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये भुईसपाट झालेल्या कॉंग्रेसला गोवा आणि मणिपूरमध्येही भाजपाने धोबीपछाड दिला आहे. स्वाभाविकच दिग्विजयसिंह, पी. चिदंबरम् आदी निर्लज्ज नेत्यांना ‘नैतिकता’ सारखे शब्द आठवू लागले आहेत. भाजपा निवडणुकीची चोरी करतो आहे, इतकी खालच्या दर्जाची टीका हे नेते करू लागले आहेत.
२०१३ साली राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि दिल्ली या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. ज्यात भाजपाचे प्रचारप्रमुख म्हणून गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि आगामी लोकसभा निवडणुकीत पक्षाचे पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार ठरू पाहणारे नरेंद्र मोदी काम पाहात होते. रमणसिंह, शिवराजसिंह चौहान आणि वसुंधरा राजे यांचे त्यांच्या राज्यातील संघटनकौशल्य आणि मोदींच्या करिष्म्याच्या जोरावर भाजपाने छत्तीसगढ, मध्यप्रदेशमध्ये आपली सत्ता कायम राखली, तर राजस्थान कॉंग्रेसकडून जिंकून घेतले. मात्र, दिल्लीत भाजपाने (अकाली दल सहित) ३२, पहिल्यांदाच निवडणूक लढविणार्‍या आपने २८, तर कॉंग्रेसने ८ जागा जिंकल्या होत्या. खरेतर हा कॉंग्रेसचा सपाटून पराभव होता आणि आपने कॉंग्रेस आपला शत्रू असल्याचे सांगतच ही निवडणूक लढविली होती. तरीही केवळ भाजपाला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आणि विशेषतः नरेंद्र मोदींना अपशकुन करण्यासाठी कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देऊन दिल्लीचे मुख्यमंत्री होऊ दिले होते.
पुढे केजरीवाल यांनी आपले खरे दात दाखवून अवघ्या दोन महिन्यांतच राजीनामा दिला आणि स्वतःच्या पक्षासाठी पुढील विजयाची सोय करवून घेतली. २०१४ साली झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि भाजपा दोघांचा धुव्वा उडवून आप दिल्लीच्या सत्तेत आली. तथापि, भाजपाला निदान तोंडदेखल्या ३ जागा तरी मिळाल्या होत्या. मात्र, सलग १० वर्षे दिल्लीच्या सत्तेत असणार्‍या कॉंग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. पण सवती विधवा झाली, या आनंदात मश्गूल कॉंग्रेसला आपकडून झालेल्या या लाजिरवाण्या पराभवाचा फारसा खेद नव्हता. किंबहुना आता पंतप्रधान झालेल्या नरेंद्र मोदींना दिल्लीत पराभूत करण्यासाठी कॉंग्रेसने तेव्हा आपली मते देखील आपला फिरवल्याचे राजकीय विश्‍लेषकांनी हेरले होते.
थोडक्यात राजकारणातील नक्षलवादी समजले जाणारे अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री होण्यास सर्वस्वी कारणीभूत होणारे कॉंग्रेस नेते आज भाजपाला नैतिकता शिकवत आहेत आणि त्यांची दलाली करणार्‍या काही पत्रकारांना आज भाजपा सत्ताकांक्षी वाटत आहे. किती गंमत आहे ना?
गेल्या तीन वर्षांत भाजपा व विशेषतः पंतप्रधान मोदींनी जाहीरपणे ‘कॉंग्रेसमुक्त भारता’ची घोषणा केली आहे. त्यानुसार शक्य ती सगळी अस्त्रे भाजपा वापरणार, यात शंकाच नाही. पण हे राजकारण करीत असताना सत्ता तिसर्‍याच पक्षाला मिळणार नाही, याची किमान दक्षता भाजपाने घेतल्याचे आपल्याला मान्य करावेच लागेल. कॉंग्रेसने निदान अशी थेट आघाडी उघडून दाखवावी, पण अशी पोपटपंची नको!!
महाभारत युद्धात विविध शापांनी जर्जर महारथी कर्णाच्या रथाचे चाक जमिनीत रुतले. तेव्हा अर्जुनाला धर्माची आठवण करून देणार्‍या कर्णाला श्रीकृष्णाने तेव्हा कोठे गेला होता राधासुता तुझा धर्म? असा तिखट प्रश्‍न विचारल्यावर कर्णाने देखील लाजेने मान खाली घातली आणि मृत्यूचा स्वीकार केला होता. ज्या कॉंग्रेसने राजकारणात इतके निर्लज्ज प्रयोग केले त्यांनीच आता भाजपाला नैतिकता शिकवणे, म्हणजे खरोखरीच ‘रेनकोट’ घालून अंघोळ करणे आहे!!

प्रणव भोंदे