हर्षल गायकवाड, स्वप्निल मेश्राम, रोशन पंडित अव्वल

0
158

एमपीएससी परीक्षेत नागपूरच्या मुलांची बाजी
तभा वृत्तसेवा
नागपूर, १६ मार्च
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०१६चा अंतिम निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत नागपूर जिल्ह्यातून हर्षल गायकवाड, रोशन पंडित आणि स्वप्निल मेश्राम या विद्यार्थ्यांनी यश संपादित केल्याची माहिती आहे.
हर्षल गायकवाडची मनपाचा मुख्याधिकारी म्हणून निवड झाली. मागील सात वर्षांपासून तो स्पर्धापरीक्षेची तयारी करत आहे. यापूर्वी भारतीय प्रशासकीय सेवेसाठी तीन वेळा मुलाखती दिल्या. पण यश मिळाले नाही. तो सोमलवार निकालसचा विद्यार्थी असून त्याने धरमपेठ विज्ञान महाविद्यालयातून बी. टेक केले आहे. त्यानंतर त्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले. सोबत स्पर्धापरीक्षेची तयारीही सुरू होती. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रथमच परीक्षा दिली. त्यामुळे हे यश विशेष असल्याचे त्याने तभाशी बोलताना सांगितले. हर्षलचे वडील शरद गायकवाड हे सहायक उपवन संरक्षक आहेत, तर आई नीलिमा गृहिणी आहे. या यशात आजोबा-आजी दत्तात्रय व चंद्रीका अतकर यांचाही वाटा असल्याचे तो म्हणाला. या सर्वांनी अपयशात पुन्हा उभे राहण्याचे बळ दिले. सातत्यपूर्ण परिश्रम आणि घरच्यांच्या प्रबळ पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. देशाची सेवा करण्याची संधी यारूपाने मिळणार आहे. आपल्याकडील शासनाद्वारे अनेक चांगल्या योजना आखण्यात येतात. पण त्यांची योग्य अंमलबजावणी होत नाही. याकडे सेवेत असताना अधिक लक्ष देणार आहे. तसेच मोदींचे स्वच्छ भारत अभियान ग्रामीण भागात पोहचविण्याचे स्वप्न असल्याचे हर्षल म्हणाला.
हर्षलबरोबरच नागपूरच्या स्वप्निल मेश्राम याची सहायक खंडविकास अधिकारी पदासाठी निवड झाली. तो सावंगी येथील दत्ता मेघे महाविद्यालयातील बीडीएसचा विद्यार्थी आहे. २०१४ पासून तो स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. स्वप्निलचे वडील डॉ. भीमराव हे जिल्हा आरोग्य अधिकारी होते, तर आई अंजना या महिला बालविकास अधिकारी होत्या. त्यामुळे घरातूनच प्रशासनिक सेवेत जाण्याची प्रेरणा मिळाल्याचे तो सांगतो. ही परीक्षा उत्तीर्ण झालो तरी मुख्य ध्येय भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षेत यश मिळविण्याचे आहे. स्पर्धा परीक्षेत नियोजन आणि सातत्यपूर्ण परिश्रम हेच मुख्य असल्याचेही तो म्हणाला. नागपुरातून रोशन पंडित या विद्यार्थ्यांची पोलिस उपअधीक्षक पदासाठी निवड झाल्याचे कळते.