हिंदुस्थान तोडणार्‍यांना धडा शिकवा : आचार्य कृष्णन्

0
141

तभा वृत्तसेवा
नागपूर, १६ मार्च
कुणी जातीच्या नावावर, तर कुणी धर्माच्या नावावर हिंदुस्थानला तोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. आज बळजबरीने ताबा मिळविण्याची प्रवृत्ती बळावली आहे. प्रेमाच्या गोष्टी करणे आणि प्रेम करणे यात बरेच अंतर आहे. जाती, धर्मामध्ये द्वेष पसरविणारे प्रेमाची भाषा करीत आहेत. त्यामुळे हिंदुस्थानचे तुकडे पाडणार्‍यांना धडा शिकविणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन संबल, मुरादाबाद येथील आचार्य प्रमोद कृष्णन् यांनी केले.
जमियत उलमा हिंदच्या वतीने कस्तुरचंद पार्क येथे आयोजित राष्ट्रीय एकता संमेलनात आचार्य कृष्णन् बोलत होते. आपल्या भाषणात आचार्य कृष्णन् म्हणाले, जाती व धर्मात द्वेष पसरविणारे प्रेमाची भाषा बोलतात. आम्हीही प्रेमाची भाषा बोलतो. प्रेम दोघेही करतात. मग त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय? प्रेमाच्या गोष्टी करणारे संपूर्ण देशाला आपले कुटुंब मानतात. परंतु, त्यांचा स्वीकार करायला तयार नाही. ज्या देशात शांती, प्रेमाचे दिवे लावण्यात येत होतेे त्याच देशात जाती, धर्माची वाटणी होत आहे.
२३ वर्षांच्या भगतसिंगांना फाशी देण्यात आली. चंद्रशेखर आझाद यांना स्वत:वर गोळी मारावी लागली. सुभाषचंद्र बोस यांना ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा’ अशी म्हणण्याची वेळ आली होती. स्वातंत्र्याच्या लढ्यात काही मूठभर लोक, आमचे योगदान आहे, अशी अफवा पसरवीत आहेत. वास्तविक पाहता हे लोक इंग्रजांची गुलामगिरी करीत होते असे दिसून येत आहे. मुसलमान या देशातील नाहीत असा प्रचार करण्यात येत आहे. त्यांना पुरावा मागण्यात येत आहे. स्वातंत्र्यापूर्वीही मुसलमान होते आणि नंतरही आहेत. महात्मा गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी, बेअंतसिंग यांची कुण्या मुसलमानाने हत्या केली नाही. दया, क्षमा, त्याग, तपस्या, साधना यांचे नाव हिंदुत्व आहेत. मात्र, पाठीमागून वार करणारे कधीच हिंदू होऊ शकत नाही. महात्मा गांधींची हत्या केली, नंतर त्यांचा चष्मा चोरीला गेला. यालाच ताबा म्हणतात. पाकिस्तान हा हिंदुस्थानचा शत्रू आहे. पूर्वी काश्मीर खोर्‍यात पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकायला येत होते. आज तेच नारे दिल्लीत ऐकू येत आहेत. हिंदू, मुस्लिम एका झेंड्याखाली असल्याने हिंदुस्थान आपलं वाकडं करू शकत नाही हे पाकिस्तानला माहीत आहे. जे काम पाकिस्तान करीत आहे तेच काम येथील नेते करीत आहेत, असाही टोला आचार्य कृष्णन् यांनी यावेळी लगावला. त्यामुळे हिंदुस्थान तोडणार्‍यांना धडा शिकविण्याची वेळ आल्याचेही ते पुढे म्हणाले.

२०१९ ची निवडणूक लक्षात घ्या : ऍड. आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळे आज प्रत्येक जाती व धर्मातील लोकांना संरक्षण मिळाले आहे. परंतु, काही लोक संविधान बदलविण्याची भाषा करीत आहेत. इकडे देशाला भडकवायचे आणि तिकडे संविधान बदलवायचे असा डाव आहे. परंतु, कुणीही न भडकता शांती, प्रेम, बंधुभाव कायम ठेवावा. आज उत्तर प्रदेशचा निकाल पाहता मुस्लिमांची मते विखुरल्याने सपा, कॉंग्रेस आणि बसपाला पराभवाचे तोंड पाहावे लागले. संविधानाला मानणारे खरे नेते होते. आम्ही कसे जगलो हे सांगण्याची गरज नाही. सत्तेत असलेल्यांना संविधान मान्य नाही. त्यांना खुल्या चर्चेचे निमंत्रण दिले. परंतु, ते चर्चेला आले नाहीत. या देशातील आदिवासींसाठी कायदाच नाही. डॉ. आंबेडकरांनी संविधान लिहिल्यानंतर स्थापन होणार्‍या सरकारने आदिवासींना संरक्षण देण्यासाठी कायदा करावा, असे म्हटले होते. तसे झाले नाही. त्यामुळे आदिवासींची काय स्थिती आहे हे सर्वांना माहीत आहे. तीच स्थिती ओबीसींची आहे. अपमान सहन करीत ओबीसी जगत आहेत. ही स्थिती टाळायची असेल, तर सर्वांनी एक होणे आवश्यक आहे.
आतापासून राजकारणाला सुरुवात करायला हवी. निवडणूक जाहीर झाली की राजकारण करू नये. २०१९ ची लोकसभेची निवडणूक आपण गमावली की, पुढील निवडणूक आपल्याला पाहता येणार नाही. कारण कॉंग्रेस आपल्या पायावर उभी राहील अशी स्थिती नाही. त्यामुळे आपण सर्वांना एक होणे आवश्यक आहे, असेही ऍड. आंबेडकर म्हणाले.

कॉंग्रेसने काहीच दिले नाही : गुलजार आझमी
इतर पक्षांना सत्तेवर येऊ न देण्यासाठी षडयंत्र रचण्यात येत आहे. आम्ही आमच्याच लोकांना ओळखले नाही. काही लोक कॉंंग्रेससोबत गेले. परंतु, कॉंग्रेसने मुस्लिमांना काहीच दिले नाही, असे गुलजार अहमद आझमी म्हणाले.

स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिमांचे योगदान : मदनी
या देशातील लोक एक आहेत. त्यांचा व्यवसाय, वेषभूषा एक आहे. एवढेच नव्हे तर शाळांमध्ये सुद्धा एकत्र बसतात. तरीही मुस्लिमांना वेगळी वागणूक देण्यात येत आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात हिंदूंसोबतच मुस्लिम, शीख, ख्रिश्‍चन यांनी आपले बलिदान दिले. हिंदूंमधील ठाकूर, राजपूत, बनिया मुसलमानांमध्ये आहेत. तरीही त्यांना वेगळे समजले जाते. आज शांती, प्रेम आणि एकोप्याला आग लावण्याचा प्रयत्न होत आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक असताना ईदच्या वेळी मुस्लिमांना वीज मिळते, मग हिंदूंना दिवाळीत का नाही, असा प्रचार करण्यात येतो. त्यातूनच जाती, धर्मामध्ये द्वेष पसरविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. उत्तर प्रदेशसारख्या घोषणा देऊन निवडणूक जिंकता येते. परंतु प्रेम आणि शांती स्थापन करू शकत नाही. त्यामुळे देश कमकुवत होण्याची शक्यता आहे, असे जमियत उलमा हिंदचे अध्यक्ष मौलाना सय्यद अर्शद मदनी आपल्या भाषणात म्हणाले. याप्रसंगी बाबा सत्यनामदास, मो. समी, प्रकाश सिंह यांचीही भाषणे झालीत.