निद्रानाश हेच मानसिक रोगाचे कारण

0
165

– आज जागतिक निद्रा दिवस
तभा वृत्तसेवा
नागपूर, १६ मार्च
आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक रोगांनी आपल्याला ग्रासले आहे. यातील प्रत्यक्ष शरीरावर परिणाम करणारे आजार त्वरित लक्षात येतात. पण, मनाशी संबंधित आजार गंभीर रूप धारण केल्याशिवाय जाणवत नाही. अशाच आजारांपैकी एक म्हणजे निद्रानाश होय. मुख्य म्हणजे जागरूकतेच्या अभावामुळे आज समाजातील ५० टक्के लोकांना झोपेशी संबंधित आजार आहेत.
मेंदू शरीराचे महत्त्वपूर्ण अंग आहे. मनुष्याला अन्न, पाणी व शुद्ध हवेसोबतच झोपेची गरज असते. झोप आणि मेंदूचा जवळचा संबंध असतो. झोपेचा प्रवास चार चक्रातून जातो. प्रत्येक चक्राचे महत्त्व वेगळे आहे. यासाठी शरीरातील प्रतिकार शक्ती मजबूत करणे आवश्यक ठरते. शरीरात विविध आवश्यक हार्मोन्स तयार होत राहतात. यात ग्रोथ आणि सेक्स हार्मोन्सचाही समावेश असतो. या प्रक्रियेसाठी पहाटे ४ ते ६ या वेळेतील झोप अत्यंत महत्त्वाची असते. या साखरझोपेमुळे मेंदू रेमस्थितीत मेंदूतील पेशी मजबूत व दुरुस्तीचे कार्य करतो. त्यामुळे सर्व चक्र योग्यप्रकारे पूर्ण झाल्यास व्यक्ती शांत राहतो. तसेच मानसिक आणि शारीरिक अशा दोन्ही प्रकारातील आजारांपासून तो मुक्त राहतो. पण, ही साखरझोप पूर्ण होत नसेल, तर वाढत्या वयासोबत गंभीर रोग संभवतात. काही वेळा तर सिझोफेनिया आणि स्मृतिभ्रंशदेखील होऊ शकतो. तसेच मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार जडण्याची शक्यता बळावते.
जगभरातील ३५ टक्के लोक निद्रानाश विकाराने ग्रस्त आहे. १७ टक्के स्लिप ऍपनियाने, तर १० टक्के नागरिक रेस्टलेस लेग सिंड्रोमने ग्रस्त आहे. रेस्टलेस लेग सिंड्रोममध्ये झोपताना पाय दुखणे, पाय दाबण्याची इच्छा होणे तसेच पायांमध्ये अस्वस्थपणा वाटणे सुद्धा झोपेशी संबंधित आजाराचाच प्रकार आहे. केवळ झोप न येणेच नव्हे, तर खूप झोपे येणे, झोपेत घोरणे, झोप पूर्ण झाली तरी दिवसभर झोपावेसे वाटणेही झोपेशी संबंधित आजारच होय.

झोपेशी संबंधित आजारांवर आज बरेच उपचार उपलब्ध असले, तरी खात्रीलायक उपाय म्हणजे निसर्गाच्या घड्याळ्याप्रमाणे जीवन जगणे होय. हे शक्य नसल्यास योग्य आहार आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला घेणे महत्त्वाचे ठरते. पण, आपल्याला अशाप्रकारचा आजार आहे, हे अनेकांना माहीतच नसते. शिवाय त्याकडे बरेचदा दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे सुरुवातीची साधारण अवस्था पुढे गंभीर रूप धारण करते. त्यामुळे सुदृढ आरोग्याबाबत जागरूक असणे गरजेचे आहे.
डॉ. सुशांत मेश्राम,निद्रारोग तज्ज्ञ
वयानुसार झोपेची गरज
वय तास
०-१ २२
१-५ १२
५-१२ १०
१२-१८ ९
१८-४५ ८
४५-६० ७