१३ ड्रायव्हिंग स्कूलची मान्यता रद्द

0
185

तभा वृत्तसेवा
नागपूर, १६ मार्च
प्रादेशिक परिवहन कार्यालय नागपूर शहरतर्फे मोटार ड्रायव्हिंग स्कूल तपासणीचे विशेष अभियान नुकतेच राबविण्यात आले. यात त्रुटी आढळून आलेल्या १३ ड्रायव्हिंग स्कूलची मान्यता रद्द करण्यात आली. ही माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी (नागपूर शहर) शरद जिचकार यांनी दिली.
विशेष कार्य अधिकारी, ऊर्जा, नवीन व नविनीकरणीय ऊर्जामंत्र्यांच्या दिशानिर्देशावरून ही विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. तपासणीदरम्यान आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता न केल्याने या ड्रायव्हिंग स्कूलची मान्यता केंद्रीय मोटारवाहन नियम १९८९ च्या कलम २८ अंतर्गत तरतुदींच्या आधारे रद्द करण्यात आली.
रद्द करण्यात आलेल्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये सेफवे ड्रायव्हिंग स्कूल- नागभवन सिव्हिल लाईन्स, तांबे ड्रायव्हिंग स्कूल- हनुमान मंदिर, अजयनगर, भीम चौक, अंबाझरी, एम. वझलवार ड्रायव्हिंग स्कूल- गोकुळपेठ, ज्ञानप्रभा ड्रायव्हिंग स्कूल- जी. गायत्रीनगर, व्ही. सी. आर. नगर, विशाल ड्रायव्हिंग स्कूल- २७४ लोकसेवानगर, आशी ड्रायव्हिंग स्कूल- ९६, जाफरनगर, जामा मशिदीजवळ, एम. वझलवार ड्रायव्हिंग स्कूल- २६५, मिलेनियम शॉपिंग कॉम्प्लेक्स, बजाजनगर, अक्षय ड्रायव्हिंग स्कूल- १४०, विवेकानंदनगर, वर्धा रोड, विदर्भ ड्रायव्हिंग स्कूल- बरडे ले-आऊट, बोरगाव, गोरेवाडा, वालदे ड्रायव्हिंग स्कूल- खलासी लाईन मोहननगर, झंझाड ड्रायव्हिंग स्कूल- क्वॉर्टर नं. ४ सी-६, पोस्टल कॉलनी, मां संतोषी ड्रायव्हिंग स्कूल- ११/बी, संतोषीनगर, पिपळा रोड आणि भूमी ड्रायव्हिंग स्कूल- धरमपेठ, गाडगा यांचा समावेश आहे.
नागरिकांनी उपरोक्त ड्रायव्हिंग स्कूलमध्ये वाहन शिकण्यासाठी प्रवेश घेऊ नये. तसेच अनुज्ञप्तीसंदर्भात देखील कोणत्याही प्रकारे संपर्क साधू नये, असे आवाहन जिचकार यांनी केले आहे.