भारतात रंगणार पहिल्या बॉक्सिंग लीगचा थरार

0
73

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १७ मार्च
क्रिकेट, हॉकी, बॅडमिंटन लीग पाठोपाठ आता बॉक्सिंगचीही लीग स्वरुपातील स्पर्धा भारतात सुरू होणार आहेत. बॉक्सिंग क्रीडाप्रकार अधिक लोकप्रिय करण्यासाठी देशात पहिल्यांदाच प्रो बॉक्सिंग इंडिया चॅम्पियनशिप (पीबीआयसी) नावाची स्पर्धा सुरू होणार आहे. आशिया बॉक्सिंग परिषदेच्या मदतीने रॉयल स्पोर्ट्‌स प्रमोशनने देशात पहिल्या बॉक्सिंग लीगचे आयोजन करण्याचे ठरवले आहे. या स्पर्धेत जगभरातील व्यावसायिक बॉक्सर सहभागी होणार आहेत.
साधारणत: पाच आठवडे चालणार्‍या या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होतील. स्पर्धेच्या बक्षिसाची रक्कम सहा कोटी असणार आहे. पीबीसीआयच्या पहिल्या सत्रात एकूण ४८ बॉक्सर एकमेकांविरोधात लढताना दिसतील.
यात ३२ पुरुष आणि १६ महिला बॉक्सर सहभाग घेणार आहेत. प्रत्येक संघात भारत आणि विदेशी बॉक्सर एकत्र खेळताना दिसतील. पीबीसीआय स्पर्धेसाठी जागतिक बॉक्सिंग परिषदेचे नियम लागू केले जाणार आहेत. या स्पर्धेत जिंकणारा खेळाडू आशियन टायटल्स स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहे. आशियायी बॉक्सिंग परिषदेचे कार्यकारी सचिव कियोटे सिरगुल सांगतात की, भारतीय बॉक्सिंगला मोठा इतिहास आहे. देशात अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. जगभरातील खेळाडूंना आपली कामगिरी दाखवण्यासाठी व्यासपीठ निर्माण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.