महिला खेळाडूंसाठी बनविले खास हिजाब

0
108

वृत्तसंस्था
वॉशिंग्टन, १७ मार्च
मुस्लिम महिला खेळाडूंच्या पोषाखावरून अनेकदा कट्टरपंथी त्यांना लक्ष्य करतात. मात्र, आता क्रीडा साहित्य बनवणार्‍या नाइकी या कंपनीने मुस्लिम महिला खेळाडूंसाठी खास हिजाब बाजारात दाखल केले आहे. मागील एक वर्षापासून कंपनी प्रो हिजाब तयार करण्याचे काम करत होती. हे हिजाब तयार करताना अनेक महिला खेळाडूंशी बोलून त्यांचे मत घेण्यात आले. याशिवाय जगातील अव्वल स्केटर जाहरा लारीने या हिजाबची चाचणी घेतली. महिला खेळाडूंसाठी हे हिजाब कमी वजनाचे आणि स्ट्रेचेबल फॅब्रिकने तयार करण्यात आले आहेत.
पुढच्या वर्षी दक्षिण कोरियाच्या प्योंगचांगमध्ये होणार्‍या हिवाळी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत विजयासाठी तयारी करणार्‍या लारीने या हिजाबसह आपला एक फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. जाहरा अबुधाबीची राहणारी असून, ती यूएईकडून खेळते.
गत वर्षी इब्तिहाज मोहंमद अमेरिकेकडून सहभागी होताना हिजाब घालून ऑलिम्पिक खेळणारी पहिली महिला खेळाडू ठरली. रिओ ऑलिम्पिकमध्ये इब्तिहाजने तलवारबाजीत अमेरिकेसाठी कांस्य जिंकले होते. गत वर्षी ऑक्टोबरमध्ये महिलांच्या विश्‍वचषकात हेडस्कार्फ घालून ती मैदानात सहभागी झाली.