बॅडमिंटन कोर्टवर हॅपी बर्थ डे साजरा

फुलराणी झाली २७ वर्षांची

0
127

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, १७ मार्च
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिने शुक्रवार, १७ मार्च रोजी आपला २७ वा वाढदिवस साजरा केला. भारताची ‘फुलराणी’ म्हणून ओळख निर्माण केलेल्या सायनाचा वाढदिवस बॅडमिंटन कोर्टवरच साजरा करण्यात आला. तिने केक कापतानाचे आणि वाढदिवस साजरा करतानाचे फोटो आपल्या ट्विटर हॅण्डलवर अपलोड केले आहेत. याशिवाय, केक कापतानाचा व्हिडिओ देखील ट्विट केला आहे.
सायनासोबत तिची आई आणि प्रशिक्षक विमल कुमार उपस्थित होते. सायनाच्या आईने तिला केक देऊन वाढदिवसाचे सेलिब्रेशन केले, तर सायनानेही सर्वांचे आभार मानले. तिच्यावर आज संपूर्ण जगातून वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॅडमिंटनमध्ये सायनाने भारताची मान उंचावली. बॅडमिंटनला देशात लोकप्रियता मिळवून देण्यात तिचा खूप मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे बॅटमिंटनमध्ये करीअर करण्याआधी सायना कराटे चॅम्पियन होती. तिच्याकडे कराटेचा ब्राऊनबेल्ट आहे. आशियाई बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद दोनवेळा जिंकणारी ती पहिली महिला बॅडमिंटनपटू आहे. वयाच्या १६ व्या वर्षी तिने जागतिक क्रमवारीतील चौथ्या मानांकित खेळाडूचा पराभव केला होता. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. लंडन ऑलिम्पिकमध्ये देशाला कांस्य पदकाची कमाई करून देत सायनाने सर्वांची वाहवा मिळवली. तर सुपर सिरिजचे जेतेपद, कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक अशी दमदार कामगिरीची नोंद सायनाच्या नावावर केली गेली.
२००९ सालापासून ती बॅडमिंटनच्या आंतरराष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये कायम होती.
त्यानंतर २०१५ साली तिने क्रमवारीत अव्वल स्थान देखील गाठले होते. क्रमवारीत नंबर एकचे स्थान प्राप्त करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. सायनाने नुकताच ऑल इंग्लंड चॅम्पियनशीपमध्येही भाग घेतला होता. स्पर्धेत सायना उपांत्यपूर्व फेरीतच बाद झाली.
सीआरपीएफ जवानांना सहा लाख देणार
छत्तीसगड येथील नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या १२ जवानांना एकूण सहा लाख रुपये (प्रत्येकी ५० हजार) देण्याचा निर्णयही सायनाने वाढदिवसानिमित्त घेतला. गेल्या आठवड्यात जे काही झाले ते अतिशय दु:खदायक होते. माझी मदत म्हणजे शहीद वीर जवानांच्या कुटुंबीयांप्रती अल्पसे योगदान आहे, असेही सायनाने नम्रपणे सांगितले.