गोल करणारा काजूयोशी सर्वात वयस्क फूटबॉलपटू

0
150

४७ वर्षे जुना विक्रम मोडीत
वृत्तसंस्था
टोकियो, १७ मार्च
जपानचा काजूयोशी मियुरा व्यावसायिक फुटबॉलमध्ये गोल करणारा सर्वांत वयस्क खेळाडू बनला आहे. योकोहामा एफसीकडून खेळताना काजूयोशीने गेल्या रविवारी ५० वर्षे सात दिवसांच्या वयाला जपानमधील दुसर्‍या टीअरची लीग (जे२) मध्ये थेस्पा कुसात्सूविरुद्ध गोल केला.
आधी हा विक्रम इंग्लंडच्या स्टेनली मॅथ्यूजच्या नावे होता. मॅथ्यूजने १९६५ मध्ये ५० वर्षे पाच दिवसाच्या वयाला स्टोक्स सिटीकडून खेळताना फुल्हमविरुद्ध गोल केला होता. मॅथ्यूजने त्या आधी इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय सामने सुद्धा खेळले आहेत. काजूयोशी मागच्या ३२ वर्षांपासून व्यावसायिक फुटबॉल खेळत आहे.
योकोहामा संघासोबत तो २००५ पासून कायम आहे. सामन्याच्या ४० व्या मिनिटाला काजूयोशीने केलेला गोल मॅच विनिंग गोल ठरला. त्याच्या संघाने हा सामना १-० ने जिंकला. त्याचा हा या सत्रातील पहिला गोल ठरला. काजूयोशी याआधी ब्राझीलचे क्लब सांतोस आणि इटलीच्या क्लब गेनोआकडून खेळला आहे. काजूयोशीने जपानकडून ८९ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. यात त्याने ५५ गोल सुद्धा केले आहेत. मात्र, विश्‍वचषक खेळण्याचे त्याचे स्वप्न कधीच पूर्ण होऊ शकले नाही.
२४ वर्षांपूर्वी एशियन फुटबॉलर ऑफ द इयर
काजू या टोपणनावाने सुप्रसिद्ध असलेला काजूयोशी मियुरा २४ वर्षांआधी १९९३ मध्ये एशियन फुटबॉलर ऑफ द इयर बनला होता. हा पुरस्कार जिंकणारा तो जपानचा पहिला खेळाडू ठरला. त्याला जपानचा पहिला सुपरस्टार फुटबॉलर सुद्धा म्हटले जाते. या यशामुळेच त्याला आजही अनेक संघ करारबद्ध करण्यास आतूर असतात. तो आजघडीला प्रोफेशनल फुटबॉलमध्ये जगातला सर्वांत वयस्क खेळाडू आहे. त्याने जपानकडून १९९८ ते २००० पर्यंत आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामने खेळले आहेत.