भारताचे चोख प्रत्युत्तर

टीम इंडियाच्या एक बाद १२० धावा

0
157

वृत्तसंस्था
रांची, १७ मार्च
लोकेश राहुल आणि मुरली विजय यांनी दिलेल्या ९१ धावांच्या सलामीच्या जोरावर टीम इंडियाने रांची येथील तिसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसर्‍या दिवसअखेर एक बाद १२० धावांपर्यंत मजल मारली आहे. दुसर्‍या दिवसाचा खेळ थांबला त्या वेळी मुरली विजय ४२, तर चेतेश्‍वर पुजारा १० धावांवर खेळत होता. भारत अद्यापही ३३१ धावांनी पिछाडीवर आहे. मात्र, त्याचे अद्याप नऊ गडी बाकी आहेत.
लोकेश राहुलने या मालिकेतील सलग चौथे अर्धशतक साजरे केले. त्याने १०२ चेंडूत नऊ चौकारांसह ६७ धावांची खेळी उभारली. पॅट कमिन्सच्या एका उसळत्या चेंडूवर त्याने यष्टिरक्षक मॅथ्यू वेडच्या हाती झेल दिला. राहुलने मुरली विजयच्या सोबतीने भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र, तो बाद झाल्यानंतर विजय व पुजाराने सहजगत्या खेळत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना बाद करण्याची कुठलीही संधी मिळू दिली नाही.
तत्पूर्वी, सकाळी ऑस्ट्रेलियाने ४ बाद २९९ वरून आपला डाव पुढे सुरू केला. स्मिथ व मॅक्सवेलने वेगाने धावा गोळा करण्यास प्रारंभ केला. कर्णधार स्टीव्ह स्मिथने ग्लेन मॅक्सवेलच्या साथीने पाचव्या विकेटसाठी रचलेल्या १९१ धावांच्या भागीदारीने ऑस्ट्रेलियाला ४५१ धावांची मजल मारून दिली. ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार स्टीव्ह स्मिथने नाबाद १७८ धावांचे योगदान दिले. ग्लेन मॅक्सवेलनं १०४ धावांची खेळी उभारली. त्याने उमेश यादवच्या चेंडूवर चौकार ठोकून कसोटी क्रिकेटमधील आपले पहिले शतक पूर्ण केले. त्याने १८० चेंडूचा सामना करीत ९ चौकार व २ षटकार हाणले. यापूर्वी त्याची ३७ ही सर्वाधिक धावसंख्या होती.
स्मिथ आणि मॅक्सवेलच्या जात्यात टीम इंडियाचे आक्रमण अक्षरश: भरडून निघाले. अखेर रवींद्र जाडेजाने मॅक्सवेलचा काटा काढून ही जोडी फोडली. जाडेजाने १२४ धावांत पाच फलंदाजांना तंबूत पाठविले. त्याने सलग दुसर्‍या सामन्यात पाच गडी बाद करण्याची किमया केली आहे. प
स्मिथची सर्वाधिक धावांची खेळी
रांची कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात नाबाद १७८ धावांची खेळी उभारुन स्टीव्ह स्मिथने आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा खोवला. भारत दौर्‍यातल्या कसोटी सामन्यात सर्वाधिक धावांची खेळी करणारा तो ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ठरला. हा विक्रम आधी मायकल क्लार्कच्या नावावर होता. त्याने २०१२-१३ सालच्या चेन्नई कसोटीत १३० धावांची खेळी केली होती. स्टीव्ह स्मिथने क्लार्कचा हा विक्रम ४८ धावांनी मागे टाकला.