मोदी कुशाग्र!

0
141

वृत्तसंस्था
मुंबई, १७ मार्च
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गोष्टी चटकन आत्मसात करतात. अर्थशास्त्रापासून परराष्ट्र संबंध आदी विषयांवर पंतप्रधान मोदींची पकड आहे, या शब्दात आज शुक्रवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली. ‘इंडिया टुडे कॉन्क्लेव’मध्ये ते आज बोलत होते.
यावेळी राष्ट्रपती म्हणाले, पंतप्रधान मोदींनी सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यांच्या नेतृत्त्वातील सरकार धाडसी पावले उचलणारे सरकार आहे. पंतप्रधान मोदी हे जोखीम पत्करतात. मला त्यांच्यावर पूर्ण विश्‍वास असून, मी त्यांच्याबाबत सकारात्मक आहे.
आपल्या आजच्या भाषणामध्ये राष्ट्रपतींनी भारतीय लोकशाही, राज्यकारभार, लोकप्रतिनिधींचे वर्तन या मुद्यांवर मते मांडली.
यावेळी राष्ट्रपती म्हणाले, सत्तेमध्ये येण्यासाठी बहुमत आवश्यक असते. मात्र, राज्य कारभारासाठी सार्वमताचे तत्त्व गरजेचे असते. ही भारतीय परंपरा असून, लोकशाहीचा स्तंभ खिळखिळा होताना मी बघू शकत नाही. संसदेत सातत्याने होणार्‍या गोंधळाबाबत यावेळी त्यांनी चिंता व्यक्त केली.
राष्ट्रपती मुखर्जी म्हणाले, मागील काही दिवसांपासून संसदेतील सत्रांमध्ये खंड पडतो आहे. ही बाब लोकशाहीच्या दृष्टीने अयोग्य असून, संसदेच्या सत्रांमध्ये व्यत्यय आल्यामुळे जनतेचेच नुकसान होते. लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने कामकाज केले पाहिजे.