आयएनएस विराटचे फडणवीस ठरणार तारणहार

समुद्राखाली संग्रहालयात रूपांतर करण्याची योजना

0
95

वृत्तसंस्था
मुंबई, १७ मार्च
भारतीय नौदलाने ऐतिहासिक कामगिरी बजावलेली आयएनएस विराट ही युद्धनौका चार महिन्यात विक्रीसाठी काढली जाणार असल्याचे जाहीर केले असून ही नौका तोडली जाणार आहे. मात्र, महाराष्ट्र शासनाने या ऐतिहासिक नौकेसाठी वेगळी योजना आखली असून त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या नौकेचे तारणहार ठरतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाने ही नौका पाण्यात बुडवून तिचे अंडरवॉटर संग्रहालयात रूपांतर करण्याची योजना सरकारकडे सादर केली आहे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यासाठीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठविणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
नौदलाचे ऍडमिरल सुनील लांबा यांनी सहा दशके सेवा दिलेल्या आयएनएस विराटला ६ मार्च रोजी निवृत्त केल्याचे सांगून राज्य सरकारे या नौकेच्या खरेदीसाठी प्रस्ताव देतील यासाठी वाट पाहिली जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. महाराष्ट्र शासन मात्र विराटसाठी प्रस्ताव देण्याच्या तयारीत आहे. सिंधुदुर्ग परिसरात ही नौका पाण्यात बुडवून कृत्रिम खडक तयार केला जाईल व तेथे स्कूबा डायव्हिंगसाठीची सुविधा दिली जाणार आहे. यामुळे सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील पर्यटनालाही प्रोत्साहन मिळणार आहे. जगातील हे दुसरे मोठे अंडरवॉटर मेमोरियल ठरू शकते.
तज्ज्ञांंच्या मते विजयदुर्गपासून २४ किमीवर अरबी समुद्रात ही नौका पाण्यात बुडविणे योग्य ठरेल. कारण येथे पाणी अतिशय नितळ आहे. ही नौका ५० मीटर खोल पाण्यात बुडविली जाईल व तिचे संग्रहालयात रूपांतर केले जाईल. यामुळे ५०० जणांना प्रत्यक्ष तर चार हजार जणांना अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होऊ शकणार आहे. नौकेतील विषारी ऍसबेस्टॉस वायरिंग काढून टाकण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागेल व त्यानंतर हे संग्रहालय उभारले जाईल, अशीही माहिती आहे.