गोव्यात कॉंगे्रसमध्ये पडझड सुरूच

0
51

आणखी एका आमदाराचा रामराम
राहुल गांधींना नेता मानण्यास नकार
वृत्तसंस्था
पणजी, १७ मार्च
सर्वाधिक जागा जिंकल्यानंतरही सत्ता स्थापन करण्यात अपयशी ठरलेल्या कॉंगे्रसमध्ये पडझड सुरू झाली आहे. गुरुवारी आ. विश्‍वजित राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर आज शुक्रवारी पक्षाचे आमदार सॅविओ रॉड्रिक्स यांनीही कॉंगे्रसला रामराम ठोकला आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधींना मी आपला नेता म्हणून स्वीकारू शकत नाही, अशी तोफ त्यांनी डागली आहे.
गोवा कॉंग्रेसच्या अल्पसंख्यक सेलचे उपाध्यक्ष असलेले सॅविओ रॉड्रिक्स यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवरील एका मुलाखतीत सांगितले की, राहुल गांधी कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. गोव्यात कॉंगे्रसच्या दयनीय स्थितीसाठी पक्षाचे सरचिटणीस दिग्विजयसिंह हे देखील जबाबदार आहेत.
गोवा विधानसभेत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी भाजपा सरकारचे बहुमत सिद्ध केल्यानंतर लगेच कॉंग्रेसला मोठा धक्का बसला. आ. विश्‍वजित राणे यांनी पक्षाचा राजीनामा दिला. गोव्यातील जनतेने जो कौल दिला, त्याचा पक्षाने विश्‍वासघात केला, असा आरोप राणे यांनी केला. त्यानंतर आज रॉड्रिक्स यांनी राजीनामा देत दुसरा धक्का दिला.
दिग्विजयसिंहांनी
निवृत्त व्हावे : राणे
दरम्यान, गोवा कॉंगे्रसचे प्रभारी असलेले दिग्विजय सिंह यांनी आता निवृत्त होण्याची वेळ आली आहे. त्यांनी आता राजकारणात राहायलाच नको, अशी तोफ राणे यांनी डागली आहे.
सहज शक्य असतानाही दिग्विजयसिंह आणि पक्षाच्या अन्य नेत्यांनी जी घोडचूक केली, त्यामुळेच कॉंगे्रसला गोव्यातील सत्तेपासून दूर राहावे लागले. दिग्विजय ज्या पद्धतीने वागत होते, त्यावरून गोव्यात कॉंगे्रसचे सरकार यायलाच नको, असेच त्यांच्या मनात असल्याचे दिसून येत होते, असा आरोपही त्यांनी केला.