तीन महिन्यात सूतगिरणीचे उत्पादन सुरू करा!

0
94

उच्च न्यायालयाचे आदेश
तभा वृत्तसेवा
दर्यापूर, १७ मार्च
संत गाडगेबाबा सूतगिरणी उत्पादन तीन महिन्यात सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने १५ मार्चला दिलेल्या निकालात दिले आहे.
संत गाडगेबाबा सहकारी सूतगिरणीला महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने २४ जून १९९१ रोजी १० कोटी १५ लाख ५० हजार व ११ जून १९९२ रोजी १ कोटी ३७ लाख ३५ हजार रुपये कर्ज दिले होते. सदर कर्जाची रक्कम व्याजासहीत मोठ्या प्रमाणात झाली असताना तत्कालीन संचालक मंडळाने कर्ज रक्कम न भरल्यामुळे राज्य सहकारी बँकेने आधी सहकार न्यायालय मुंबई येथे व नंतर उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रकरण चालविले. या याचिकेचा निकाल ११ एप्रिल २०१६ रोजी लागला. त्यानुसार अवसायकांनी गिरणीची विक्री प्रक्रिया सुरु केली. त्याविरुद्ध कामगार कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रवी कोरडे यांनी सदर गिरणी विक्री करण्याऐवजी सुरू करून कामगारांना काम उपलब्ध करता येईल, याबाबत उच्च न्यायालयात महाराष्ट्र शासन व राज्य सहकारी बँक मुंबईविरुद्ध २६ सप्टेंबर २०१६ रोजी याचिका दाखल केली होती. त्या अनुषंगाने सदर गिरणीची विक्री प्रक्रिया थांबली होती. तसेच मध्यंतरी सहकार व वस्त्रोद्योग मंत्री यांनी रवी कोरडे तथा राज्य सहकारी बँकेच्या अधिकार्‍यांसोबत मंत्रालयात बैठक घेऊन गिरणी पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली होती. कामगार कर्मचारी संघटनेने गिरणी आजमितीस भाडेतत्वावर देऊन सुरू करता येऊ शकते, असा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावावर विचार करून वस्त्रोद्योग महामंडळाच्या संचालकांनी सूतगिरणी भाडे तत्वावर सुरू करण्याबाबत कृती आराखडा तयार करण्याचेही सूचित केलेले आहे. राज्य सरकारकडून ही गिरणी सुरू करण्याचे प्रयत्न सुरू असतानाच रवी कोरडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेचा निकालही १५ मार्चला लागला असून तो कामगारांच्या बाजूने लागला. ही गिरणी ताबडतोब सुरू करून तीन महिन्यांच्या आत उत्पादन प्रक्रिया सुरू करावी व कामगारांना त्यांच्या वयाचा विचार करून प्राध्यान्य देण्यात यावे, असे निकालात स्पष्ट नमूद आहे. राज्य शासनाची सकारात्मक हालचाल आणि उच्च न्यायालयाचे आदेश यामुळे आता ही गिरणी लवकरच सुरू होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.