पुलगावनजीक मालगाडीतील कोळशाला आग

0
66

तभा वृत्तसेवा
वर्धा, १७ मार्च
उमरेड येथून कोळसा भरून गांधीग्रामकडे जाणार्‍या मालगाडीच्या दोन डब्यांना आग लागल्याचे लक्षात येताच सहायक स्टेशन मास्तरांनी स्थानिक स्टेशन मास्तर चोपडा व गाडीच्या गार्डला सूचना देऊन गाडी थांबविली. पुलगाव स्थानकावर या गाडीला फलाट क्र. १ वर उभे करण्यात आले. कोळसा भरलेल्या २० डब्यांना गाडीपासून वेगळे करण्यात आले व सैनिकी विभागाच्या अग्निशमन दलाच्या साहाय्याने आग आटोक्यात आणण्यात आली. ही घटना शुक्रवार, १७ मार्चला सकाळी ६ वाजता घडली. आग लागलेले डबे सोडून ही मालगाडी सकाळी १० वाजता पुढच्या प्रवासाला रवाना झाली.
स्टेशन मास्तर एल. के. चोपडा यांनी संबंधित वरिष्ठ अधिकारी व स्थानिक केंद्रीय दारूगोळा भांडारच्या अग्निशमन दलाला पाचारण केले.
आग लागलेल्या डब्यांवर पाणी मारण्यापूर्वी विद्युत लाईन बंद करण्यात आली. अग्निशमन दलाने प्रयत्नांची पराकाष्ठा करीत दोन्ही आगीवर दीड तासांत नियंत्रण मिळविले.
सकाळी ६ वाजता स्थानकावर पोहोचलेली ५९ डब्यांची कोळशाची मालगाडी आग लागलेले डबे वेगळे करून सकाळी १० वाजता गांधीग्रामकडे रवाना झाली. स्टेशन अधीक्षक सवाई, सहायक चोपडा, गाडीचे गार्ड यांच्या मार्गदर्शनात अग्निशमक दलाचे प्रमुख सी. एस. थूल, आर. आर. खरडो, सुशील राऊत, सी. व्ही. खरगे, पी. एम. कुथे, डी. एम. शिंदे, प्रशांत दांडेकर, रूपेश दिघेकर, रूपेश कुमारे, राजेंद्रसिंह जोडापे, टेंभुर्णे यांनी आग विझविण्याकरिता प्रयत्न केले.