इरोम शर्मिलांचा दुर्दैवी पराभव!

0
147

चौफेर

मणिपुरात पार पडलेल्या परवाच्या निवडणुकीत इरोम शर्मिला हरल्या! अपेक्षित आणि स्वाभाविक असूनही शर्मिलांच्या वाट्याला आलेला पराभव दुर्दैवीच. भारतीय जनमानसाच्या सदसद्विवेकबुद्धीवर प्रश्‍नचिन्ह उमटविणारा. स्वच्छ चारित्र्याची शिदोरी गाठीशी बांधून राजकारणात उतरण्याची मनीषा कुणी बाळगलीच, तशी हिंमत कुणी केलीच तर त्याचे काय हाल होतात, याचे हे एक ‘उत्तम’ उदाहरण ठरावे. अर्थात या पठडीत मोडलेले हे काही पहिलेवहिले उदाहरण नाही! राजकारणाचा गंध नसलेले लोक चारित्र्य आणि केलेल्या सामाजिक कार्याच्या भरवशावर निवडणूक लढवायला सिद्ध होतात, तेव्हा तेव्हा पराभवच त्यांच्या पदरी पडतो. कालपर्यंतच्या असंख्य उदाहरणांतून हेच स्पष्ट झाले आहे. शर्मिलाच्या दुर्दैवी पराभवाची त्यात नव्याने भर पडलीय्, इतकेच!
मुळात माणूस चांगला असणं आणि तो राजकारणी असणं यात बरेच अंतर आहे. असं म्हणतात की, पॉलिटिक्स इज नाट अ गेम ऑफ जेण्टलमन. याचा अर्थ तिथं सारे गुंडेच असतात असं नाही, पण तरीही, राजकारणाची एक स्वतंत्र तर्‍हा असते. त्याच्या काही विशिष्ट गरजा असतात. राजकारणात वावरायचे आणि टिकून राहायचे असेल, तर वादाला प्रतिवादाने, चालीला तसल्याच प्रतिचालीने, शहाला काटशहाने, दुसर्‍यांच्या षडयंत्राला आपल्या षडयंत्राने उत्तर देण्याची एक पद्धत अवगत असावी लागते. नाईलाजाने असली तरी ती शिकून घ्यावी लागते. कार्यकर्ते आणि मतदारांची गटातटात, जातिपातीत, धर्माधर्मात झालेली विभागणी समजून घ्यावी लागते. निवडणुकीच्या निकालाचे तंत्र सकारात्मकरीत्या साकारायचे, तर अनेकदा पैशाचे गणित जुळवून आणावे लागते. बरं यातील एक अवाक्षरही नवीन नाही. पूर्वापार परंपरेने राजकारण हे असेच चालले आहे. सामाजिक क्षेत्रात राहून काम करणे वेगळे अन् राजकारणात वावरणे वेगळे. बरं, केवळ राजकारणात वावरले म्हणून निवडणुकी जिंकता येतातच असं नाही. कारण निवडणूक लढण्याचे, लढण्यापेक्षाही ती जिंकण्याचे तंत्र आणखीच वेगळे. पाच पाच वर्षे मतदारसंघात राबायचे. मतदारसंघ आपल्याला हवा तसा बांधायचा. कार्यकर्त्यांची फळी उभारायची. पैशाची तजवीज करायची. लोकप्रियता, वैयक्तिक आणि पक्षाची प्रतिमा, केलेली कामे, भविष्यातील कामांचा अजेंडा सोबतीला असावा लागतो तो वेगळाच. विरोधकांची चाल ओळखायची, त्यांची ताकद ध्यानात घ्यायची, हे तर आलेच. इतक्या गोष्टींच्या भरवशावर निवडणूक लढवायची अन् मग विरोधकांना चारी मुंड्या चीत करून विजयश्री काबीज करायची…
अलीकडच्या काळात राजकारण हे करीअर अन् निवडणूक हा एक इव्हेंट झाला आहे. ज्यांना त्या क्षेत्रात करीअर करायचे आहे त्यांना हा इव्हेंट ‘साजरा करणे’ जमलेच पाहिजे. केवळ माणूस सज्जन असला, त्याच्याजवळ अजेंडा असला, त्यानं सामाजिक क्षेत्रात भरपूर कामं केली असली, त्यातून नावही कमावले असले, कदाचित त्या क्षेत्रातली लोकप्रियताही त्याच्याकडे असली तरीही, केवळ त्याच्या जोरावर निवडणूक जिंकता येतेच असे नाही. किंबहुना नाहीच जिंकता येत. शरद जोशींपासून तर अरुण भाटीयांपर्यंत आणि अविनाश धर्माधिकारींपासून तर नंदन निलेकणींपर्यंतची झाडून सारी उदाहरणे हेच सांगतात. म्हणूनच इरोम शर्मिलांचा परवाच्या विधानसभा निवडणुकीतला पराभव अगदीच धक्कादायक वगैरे म्हणता येणार नाहीच. पण हा! तो वर्मी लागणारा मात्र नक्कीच होता. तब्बल सोळा वर्षे लोकांच्या हक्कांसाठी लढणार्‍या एका सामाजिक कार्यकर्तीच्या झोळीत या राज्यातल्या केवळ नव्वद लोकांच्या मतांचे दान पडावे, ही बाब लाजिरवाणीच आहे. मनाला सलणारी आहे. लोकांच्या मानसिकतेबाबत शंका उपस्थित करणारी आहे. चांगले लोक राजकारणात का येत नाहीत, याचे विवेचन करणारी आहे.
‘ऑयर्न लेडी ऑफ मणिपूर’चा खिताब लाभलेल्या इरोम शर्मिला, या राज्यात शांतता नांदावी म्हणून तत्कालीन सत्ताधार्‍यांशी संघर्ष करतात. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी एक आंदोलन उभे करतात. नागरिकांचा हक्क नाकारणार्‍या एका जुलमी कायद्याविरुद्ध तब्बल सोळा वर्षे उपोषण करतात. इस्पितळातल्या एका बंद खोलीत आयुष्यातला उमेदीचा काळ घालवतात. मानवी हक्कांसाठी चाललेल्या या उपोषणामुळेच राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे नाव होते. लोैकिक होतो. उपोषणाच्या काळात त्यांना पाठिंबा व्यक्त करणार्‍या लोकांच्या पत्रांचा अक्षरश: ढीग साचतो. ‘बर्निंग ब्राईट’ नावाचे त्यांच्यावर लिहिले गेलेले पुस्तक असो की, मग त्यांनी स्वत: रचलेल्या कवितांचे, त्यावर पडणार्‍या वाचकांच्या उड्या, कौतुकानं डोळे भरून यावेत अशाच असतात. उपोषणाच्या दरम्यान चाललेले त्यांचे हाल बघून जीव तुटतो लोकांचा. त्यांच्याशी चार शब्द बोलता यावेत म्हणून धडपडायचे लोक. अन् निवडणुकीच्या मैदानात उरतल्यावर मात्र त्याच इरोम शर्मिलांची दाणादाण उडते! कल्पनेपलीकडचा दारुण पराभव त्यांच्या वाट्याला येतो. काय अर्थ काढायचा लोकांच्या असल्या वागण्याचा?
मणिपूरच्या निवडणुकीत झालेल्या शर्मिलांच्या या पराभवाची आता सर्वदूर चर्चा होते आहे. त्यांनी निवडणूक लढवायलाच नको होती असं म्हणणार्‍यांची उणीव नाही अन् त्यांना पराभूत करणार्‍यांच्या वागणुकीवर तोंडसुख घेणार्‍यांचीही वानवा नाही. साठ सदस्यांच्या या विधानसभेसाठी मोजके वीस सदस्य मैदानात उतरवून राज्याचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न बघणार्‍या शर्मिलांचे राजकीय ज्ञान जेमतेम असल्याबद्दल शंका व्यक्त करण्याचे कारणच नाही! राजकारणातील, ‘निवडणूक जिंकण्याच्या’ क्लृप्त्या त्यांना अवगत असण्याची शक्यता जराशीही नसताना त्यांच्या विजयाची अपेक्षा बाळगणेही मूर्खपणाचेच ठरले असते. तरीही त्यांचा पराभव जिव्हारी लागणारा ठरतो. कारण अशी माणसं पराभूत होणे हा शेवटी समाजाचाही पराभव असतो. जात, धर्म, पैसा, राजकारणातली चलाखी हाच जर निवडणुकी जिंकण्याचा एकमेव निकष असेल आणि लोकांनीही तो सरसकट मान्य करून टाकला असेल, तर मग इरोम शर्मिलांसारख्यांनी या फंदात पडायचेच नाही का? की स्वच्छ राजकारणाची त्यांची अपेक्षा दुराग्रही ठरवून लोकांनी पाऽऽर दूर उचलून फेकायचे त्यांना? सद्भावना आणि भाबडेपणाचा इतका तिरस्कार करावा समाजाने?
हे खरं आहे की आताशा समाजमन बदलले आहे. विचार करण्याची मतदारांची पद्धतही एव्हाना बदलली आहे. मध्यमवर्गीय समूह मतदानाच्या प्रक्रियेपासूनच दूर चालला आहे. कालौघात कामगारांच्या समस्यांचे स्वरूप बदलल्याने तोही पांढरपेशा झाला आहे. त्यामुळे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज त्याच्या लेखी उरलेली नाही. आश्‍चर्याची बाब ही की या सर्वच घटकांना राजकारणावर चर्चेच्या फेर्‍या रंगवण्यात कमालीचे स्वारस्य आहे. तरीही, राजकारणाला सर्वाधिक घाणेरडे क्षेत्र ठरवून त्यापासून दूर राहाण्याचा नव्हे, नामानिराळे राहाण्याचा मार्ग तो स्वीकारतो. आणि दुर्दैवाने तमाम सज्जनांच्या पराभवासाठीही तोच घटक कारणीभूत असतो. अरुण भाटीया असोत की इरोम शर्मिला, त्यांचे मानसिक खच्चीकरण होण्यासाठी हा समाजच दोषी असतो. बिहारात कारागृहातून निवडणूक लढवणारे गुंड प्रचंड बहुमताने निवडून येतात अन् इकडे महाराष्ट्रातल्या तत्कालीन सरकारविरुद्धच्या जनजागृतीची प्रचंड मोहीम फत्ते करूनही गो. रा. खैरनारांना मैदानात उतरून निवडणूक लढविण्याची मात्र हिंमत होत नाही, हे कशाचे द्योतक मानायचे? समाजालाच चांगली माणसं राजकारणात आलेली नको असतील, तर मग राजकारणाला घाणेरडे क्षेत्र ठरविण्याचा तरी अधिकार कुठे उरतो त्यांना?

सुनील कुहीकर, ९८८१७१७८३३