आदत बदलेगी, तो जीवन बदलेगा

0
90

कल्पवृक्ष

एका गावात एक पहिलवान राहात होता. त्याच्या ताकदीची त्या परिसरात चांगलीच चर्चा होती. त्याची विशेषता म्हणजे, मोठा सांड तो आपल्या खांद्यावर उचलत असे! त्याच्या या अचाट कृत्याने लोक अचंबित होत. एकदा त्याला यामागचे रहस्य विचारले तर तो म्हणाला, ‘‘यात काय विशेष? मी लहानपणी आमच्या घरी असलेल्या गाईचे वासरू खांद्यावर घेऊन शेतात जात असे. पुढे माझे आजोबा मला रोजच हा व्यायाम करायला लावत. मी मोठा होत होत पहिलवान झालो. त्या वासराचा सांड झाला, पण रोजच्या सवयीमुळे मला तो उचलणे सहज शक्य होते.
सवयीमुळे माणूस काय करू शकतो, याचे हे उदाहरण आहे. आपण आपल्या जीवनाकडे, दिनचर्येकडे पाहिले तर सहजच आपल्या लक्षात येईल की, सवयींचा प्रभाव फार मोठा आहे. काही गोष्टी सतत करून करून आपण सवयींचा एकेक धागा बनवत असतो. केव्हातरी आपल्याला कळते की, या धाग्यांचे जाळे तयार झाले असून त्यात आपण पूर्णपणे अडकले आहोत. आपले वागणे, बोलणे, विशिष्ट पद्धतीने विचार करणे, आवडनावड, इतकेच नव्हे, तर आपले व्यक्तिमत्त्व यावर सवयींचा जबरदस्त प्रभाव असतो. माणूस सवयींचा गुलाम बनतो. म्हणून याविषयी खरेतर लहानपणापासूनच खूप जागरूक राहण्याची गरज आहे. हत्तीचा पाय एका जाड साखळीने बांधलेला असतो. ती साखळी तोडण्याची ताकद त्याच्यात असते. पण तो तोडत नाही, याचे कारण त्याला लावलेल्या सवयीत असते. हत्ती लहान असताना हीच साखळी त्याच्या दृष्टीने मजबूत असते. तो तोडण्याकरिता खूप ओढतो, प्रयत्न करतो, पण त्याला शक्य होत नाही. शेवटी साखळी तोडण्याचा प्रयत्न तो सोडून देतो. हत्ती मोठा होतो. ताकद वाढते. पण, साखळी न तोडण्याची सवय कायम राहते. म्हणूनच सवय हे दुधारी शस्त्र आहे. योग्य सवयींची जोड मिळाली तर क्षमता परिणामकारक होतात. अयोग्य सवयी असल्या तर प्रचंड क्षमताही निरर्थक ठरतात. चांगल्या सवयी असल्या तर जगणे सोपे होते. वाईट सवयींमुळे अवघड होते. त्यामुळे सवयींचे ज्ञान आणि विज्ञान शिकणे आवश्यक ठरते. त्या लावता येतात व सोडताही येतात. त्याकरिता जागरूकता, आत्मविश्‍वास व प्रयत्नांची गरज असते.
अवकाशयानाला गुरुत्वाकर्षणाची कक्षा ओलांडताना सर्वाधिक ऊर्जा लागते. विमानाला टेक ऑफ करताना नेहमीच जास्त शक्ती लागते. तसेच सवयींचे असते. त्या लावताना किंवा सोडताना अधिक शक्ती लावावी लागते. पण, एकदा सवय लागली की, कमीतकमी शक्ती खर्च करावी लागते. सुरुवातीला सायकल शिकणे किती कठीण वाटते. तोल सांभाळणे, पायडल मारणे, हॅण्डल पकडणे, ब्रेकचा उपयोग करणे, समोर लक्ष ठेवणे, पाठीमागून येणार्‍याकडेही लक्ष ठेवणे, अशी कितीतरी कामे करावी लागतात. पण, आपला अनुभव आहे की, सायकल आल्यानंतर इतक्या कामाची आपल्याला जाणीवही नसते. सहजपणे आपण हे करत असतो. म्हणूनच कौशल्ये सवयींनीच प्राप्त होतात. योग्य सराव केला तर योग्यता प्राप्त होते.
काही लोकांना सतत रागवायची सवय असते. थोडेही काही मनाविरुद्ध झाले की, ते कुत्र्यांसारखे सतत भुंकत असतात. काही माणसं सतत कुरकुरत असतात. पाऊस आला तरी, नाही आला तरी, ते तक्रारीचा सूर लावणार. कोणत्याही गोष्टींचा नीट विचार करणे, हीपण एक सवयच आहे. काही लोक तत्काळ रिऍक्ट होतात, टीका करतात. काही माणसे सारासार विचार करतात. दुसरी बाजू काय आहे, पर्याय काय आहेत, कशाचा काय परिणाम होईल, प्राथमिकता कशाला आहे, भावनिक बाजू काय आहे, असा विचार करण्याची, विवेकाने काम करण्याची त्यांना सवयच असते. काहींना भावनेच्या भरात निर्णय घेण्याची सवय असते. काही लोकांना समोरच्याचे ऐकून घेण्याचीच सवय नसते. खरे म्हणजे मानवी संबंधात सहानुभूतिपूर्वक नीट ऐकून घेणे, ही फार महत्त्वाची सवय आहे. उत्तम कार, अगदी बीएमडब्ल्यू असेल तरी ड्रायव्हर खराब असेल तर वाईटच चालवेल. चांगला ड्रायव्हर खराब कारही उत्तम चालवेल. सवयी म्हणजे आपला ड्रायव्हर. दोन्ही उत्तम असेल तरच जीवन यशस्वी होते. आपल्या सार्वजनिक सवयींवर तर काही बोलायलाच नको. म्हणूनच असे म्हणतात,
आदत बदलेगी, तो जीवन बदलेगा
जीवन बदलेगा, तो देश बदलेगा…
खरे तर शेवटी सवयींच्या बंधनातून, मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणे, हेच जीवनध्येय असले पाहिजे. स्वतःचे खरे स्वरूप त्याशिवाय समजूच शकत नाही. स्व-शोधाचा तो प्रारंभबिंदू आहे.
रवींद्र देशपांडे,८८८८८०३४११