शिवसेनेला खरंच कर्जमाफी हवी आहे का?

0
128

चर्चा

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना, सध्या सत्तेतील सहभागी शिवसेना जो काही तमाशा घालत आहे, त्यावरून प्रश्‍न निर्माण होतो, की शिवसेनेला खरोखरच शेतकर्‍यांची कर्जमाफी हवी आहे का? शिवसेनेला अचानक हा शेतकर्‍यांबाबत पूतना मावशीचा पान्हा का फुटला आहे? शिवसेनेचा यामागचा हेतू फार चांगला आहे असे मानण्याचे कारण नाही. सामान्य माणसांना शिवसेनेचा हा कावा समजणार नाही, इतके सामान्य माणसांना शिवसेना मूर्ख समजते का?
शिवसेनेला शेतकर्‍यांशी काही देणेघेणे नाही. शेतकर्‍यांबद्दल शिवसेनेला कसलंही प्रेम नाही. शिवसेनेला फक्त भारतीय जनता पक्षाला अडचणीत आणायचे आहे. मागच्या महिन्यात झालेल्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेला अपयश आले आणि भाजपाला यश मिळाले ते सेनेला सलते आहे. त्याचा सूड उगवण्यासाठी हा पूतना मावशीचा पान्हा फुटला आहे.
शिवसेनेला खरोखरच अधिवेशन चालू द्यायचे नाही, शेतकर्‍यांबद्दल प्रेम आहे, तर शिवसेनेच्या मंत्र्यांनी शेतकर्‍यांसाठी आपले राजीनामे का दिले नाहीत? शिवसेनेने ही नाटकं करण्यापूर्वी आपल्या मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याकडे सोपवावेत. ते शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्याकडे न सोपवता सरकारकडे सोपवावेत आणि मग ही नाटकं करावीत. आपण जोपर्यंत या सरकारच्या मंत्रिमंडळात आहोत, मंत्रिपदावर आहोत तोपर्यंत ही असली नाटके करण्यात काहीही अर्थ नाही. कुणीही फसणार नाही. पण, शिवसेनेची अवस्था ‘धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय’ अशी झाली आहे. या नाटकीपणाला कुणीही फसत नाही.
मुंबई महापालिकेत सत्तेपर्यंत जाण्याचा शिवसेनेचा मार्ग भाजपाने रोखला. आज मुंबई महापालिकेत भाजपाच्या मेहरबानीमुळे शिवसेनेला महापौर, सगळी अध्यक्षपदं मिळत आहेत. त्यामुळे भाजपाची ही मेहरबानी म्हणजे आपल्यावर उपकार नाहीत हे दर्शवण्यासाठी, आमच्या पाठिंब्यावर तुमचे सरकार आहे, हे बिंवण्यासाठी शिवसेनेची ही धडपड सुरू आहे. शिवसेनेला कधीही शेतकर्‍यांबद्दल प्रेम नव्हते. हा शिवसेनेचा रडीचा डाव आहे.
शेतकर्‍यांची कर्जे माफ करावी, असे जर शिवसेनेला वाटते आहे, तर ती कशी करावी? त्यासाठी कुठून पैसा आणावा? ती वित्तीय तूट कशी भरून काढावी, याबाबत मार्गदर्शन करावे. हे केले तर शिवसेनेकडे काही दृष्टी आहे हे मानता येईल. परंतु, कसलाही अभ्यास नाही, फक्त हुल्लडबाजी करायची, या हेतूने अधिवेशनाचा वेळ वाया घालवण्यासाठी जे चालले आहे त्यामुळे भाजपाची नाही, तर शिवसेनेची बेइज्जती होत आहे. विरोधी पक्ष त्याचा फायदा उठवत आहेत. ‘माकडाच्या हातात कोलीत’ म्हणतात त्याप्रमाणे शिवसेनेच्या हातात कोलीत देऊन कॉंग्रेस, राष्ट्रवादी धुडगूस घालत आहेत. यात भाजपा संपणार नाही तर शिवसेनेला फटका बसेल, हे निश्‍चित!
शेतकरी, कष्टकरी यांच्याबद्दल शिवसेनेला इतका कळवळा आहे, तर याच शिवसेनेने मुंबईतील मराठी माणसाचे, गिरणी कामगारांचे संरक्षण का केले नाही? गिरणी कामगारांना बेघर करून तयार झालेल्या मॉलला विरोध का केला नाही? मुंबईतील गिरणी कामगार १९८० च्या दशकापासून देशोधडीला लागत असताना, शिवसेना गप्प का बसली? गिरणी कामगार हे खर्‍या अर्थाने शेतकर्‍यांचे बांधव होते. एक भाऊ गावात शेती करत होता, तर एक गिरणीत. अशा गिरणी कामगारांचे रक्षण शिवसेनेने का केले नाही? गिरणी कामगारांचे पुनर्वसन अगोदर करावे. सामान्य माणसांना एक रुपयात झुणका-भाकर देणार, ही घोषणा हवेत विरून गेली. झुणका-भाकर केंद्राच्या नावावर जागोजागी मिळवलेल्या जागांचे काय झाले, याचा हिशोब अगोदर करावा. महाराष्ट्राचे भले शिवसेनेच्या अशा चुकीच्या धोरणाने नाही होणार, तर सभागृहाचे कामकाज सुरू ठेवून होणार आहे, हे शिवसेनेने लक्षात घेतले पाहिजे. शिवसेना हा जो खड्‌डा करत आहे, तो स्वत:साठी आहे, हे लक्षात घ्यावे.
प्रफुल्ल फडके,८१०८४५४५५५