स्त्री : नाजूक की कणखर?

0
93

‘‘काय मुलींसारखा रडतोस… मजबूत हो!’’ लहानपणापासूनच हे वाक्य आपण सगळ्यांनी बरेच वेळा ऐकलंय्. याचा सरळ अर्थ असाच घेतला जातो आणि हे वाक्य अशा समजुतीने म्हटले जाते की, स्त्री ही कमकुवत आणि दुबळी असते.
सतत वर्तमानपत्रात येणार्‍या स्त्रीवरच्या अत्याचारांबद्दलही आपण वाचतोच. प्रत्येक बातमीला स्त्री दुर्बल आणि हतबल असल्याची खुली किंवा छुपी हमी असतेच. आणि अशा बातम्यांचा आधार घेऊन स्त्री दुबळी असल्याच्या कहाणीला समाज बळकट करत चालला आहे. परंतु, हे कितपत खरे आहे?
माझ्या मते, आता आत्मपरीक्षणाची वेळ आलेली आहे. पूर्वी स्त्रीचा वावर घरात आणि शेजारीच असल्याने, ती दुबळी आणि तिची रक्षा करणारा आणि तिला समाजापासून वाचवणारा पुरुष हा कणखर, असा समज होता आणि त्या समजातून तयार होणारी एक समाज पद्धती व्यवस्थित चालत होती. परंतु, आज स्त्रीच्या वावरण्याचे क्षेत्र खुलले आहे. ती जितकी घरात आहे तितकीच रस्त्यांवर, ऑफिसात, देशात आणि विदेशातही आहे आणि तिची ती स्वतंत्र आहे. आज स्त्री आणि पुरुष दोघांनीही परिस्थितीचा मान राखून आत्मपरीक्षण करायला हवे.
एक आत्मपरीक्षण पुरुषाने करायला हवे की, तो कुठल्या अर्थाने आणि कुठल्या आशयाने स्त्रीला दुबळी आणि कमकुवत समजतो. माझ्या परिचयातील पुरुष मंडळी खालील कारणांमधील एकतरी कारणामध्ये तंतोतंत बसतात :
१. साधारण समज की स्त्री दुबळी असते.
२. माझी स्त्री दुबळी आहे आणि मी तिचा कर्ताधर्ता आहे, हा विचार त्यांना सुखावतो.
३. स्त्री पुरुषांपेक्षा खालील दर्जाची असते, असा समज पुरुषांना श्रेष्ठत्वाची भावना देतो.
४. स्त्री रडते आणि पुरुषाला भावनिक आधार मागते म्हणून ती त्याला कमजोर भासते.
तुमचे कारण कुठले? मला वाटतं आपण सगळ्यांनीच प्रत्यक्ष व्यवहारातील जीवन थोडं लक्ष देऊन पाहायला हवे. आपल्याला दिसेल की, पुरुष रडत नाही किंवा आपली भावनिक गरज व्यक्त करत नाही, तरीही त्याला तसं करायचं नाही असं नाही. बहुतेक वेळा तो समाजाला घाबरतो. कारण समाज म्हणतो आपल्या भावना व्यक्त करणे हे दुर्बलतेचे लक्षण आहे. परंतु, अधिकतर पुरुष जे स्वतःच्या भावना व्यक्त करण्यात असमर्थ असतात त्यांचा मनातल्या मनात कोंडमारा होत असतो आणि हमखासच तो कोंडमारा वेळोवेळी रागाच्या रूपात घरच्यांवर निघत असतो. कारण नसताना घरच्यांवर रागावणे, मारहाण करणे आणि आपल्या इशार्‍यावर नाचायला लावणे, हे कसले पौरुष्य आणि त्यात कसलं सामर्थ्य?
गंमत म्हणजे, अशाच परिस्थितींमध्ये मनाविरुद्ध आयुष्य जगत असतानाही अधिकतर स्त्रिया रडून घेतात, बोलून व्यक्त करतात आणि परत सगळ्यांची काळजी घ्यायला सज्ज होतात. मग स्त्री कमजोर कशी?
अधिकतर पुरुषांना एकानेही मनाविरुद्ध बोललेलं किंवा वागलेलं सहन होत नाही आणि प्रत्येक स्त्री आयुष्यात कितीतरी अपमान पचवून जाते आणि तरीही आनंदाने नाती जोपासत राहते. पण, केवळ ती मनाला लागलं म्हणून रडते आणि दुबळी ठरवली जाते.
स्त्री शारीरिक रीत्या दुबळी आहे, असं म्हंटलं तर तेही खरं नाही. प्रत्येक स्त्री घरचं आणि बाहेरचं मिळून अधिकतर पुरुषांपेक्षा दुप्पट शारीरिक काम करते. त्यात जर ती नोकरी करणारी असेल तर तिप्पट. आणि तरीही घरी आल्यावर मुलांशी खेळते, घर आवरते, सर्वांची दुसर्‍या दिवशीची तयारी करून ठेवते आणि कुणालाही काही कमी पडू नये अशी काळजी घेते. मग ती दुबळी कशी?
माझ्या मते, एकच कारण स्त्रीला मागे खेचतं- स्त्रीची शरीररचना तिला असुरक्षित बनवते. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला जाऊ शकतो आणि म्हणून ती असुरक्षित असते आणि या एका कारणासाठी तिने स्वतःची काळजी नक्कीच घ्यायला हवी. परंतु, तेवढ्यासाठी प्रत्येक क्षेत्रात तिला दुबळं ठरवणं कितपत बरोबर आहे? ज्या घरात ती २४ तास राबते आणि घराला घरपण देते तिथेही तिला फक्त दोन अश्रूंमुळे दुर्बळ लेखले जाते.
स्त्रीचे अश्रू, तिची संवेदनशीलता तिची शक्ती आहे. ज्या दिवशी स्त्री पुरुषांसारखी वागायला लागेल, त्या दिवशी खूप अधिक त्रास तिला आणि तिच्या आसपासच्या लोकांना होणार, हे नक्की. पुरुष सहज आजारी होऊन स्वतःची सेवा करवून घेऊ शकतो. परंतु, साधारणत: स्त्रीला आजारी पडून आराम करायचीही मुभा नसते. प्रसवपिडा ती सहन करते, कितीतरी रात्री मुलाला कडेवर घेऊन काढल्यावरही सकाळी तीच सर्वप्रथम उठते, मुलांना रागावते, वळण लावते, प्रेम देते, तरी त्यांच्या रागाची पात्र तीच असते आणि त्यांच्या अपयशयाचे खापरही तिच्याच माथ्यावर फोडले जाते. तो अपमान आणि त्रासही तीच सहन करते, परंतु तिलाच दुबळी आहे म्हणून हिणवले जाते.
प्रत्येक पुरुषाने विचार करावा की, एक साधारण स्त्री जे जन्मभर सहन करूनही प्रेम देते ती दुबळी कशी असू शकते? आणि स्त्रीने विचार करावा की, कुणी मला कितीही हिणवलं तरी मी दुबळी नाही, कारण मी प्रसवपिडा सहन करू शकते. आणि दोघांनीही मिळून हा विचार करावा की, या ज्ञानाचा उपयोग मी आपल्या आणि आपल्या कुटुंबाकरिता मानसिक आणि भावनिक उत्थापनासाठी कसा करू शकते…
पुरुषालाही बरीच आव्हाने आहेत आणि स्त्री ही शारीरिक रीत्या असुरक्षित आहे, परंतु स्त्री दुबळी नक्कीच नाही.
डॉ. सपना शर्मा,९१७५९४९००१