ताळेबंद

0
73

मेट्रोतल्या बायका
‘‘प्रभा, अगं हळू! सावकाश चढ जिना, धाप लागतेय तुला!’’ प्रकाशरावांनी टीव्हीचा आवाज कमी केला आणि बायकोची मदत करण्यासाठी ते तातडीनं जिन्याजवळ गेले. टीव्हीवर एवढा वेळ निवडणुकांच्या निकालाचं विश्‍लेषण बघण्यात ते गुंग झाले होते. प्रभाताईंनी दोनतीनदा त्यांना मदतीसाठी हाका मारल्या होत्या, त्यासुद्धा त्यांना ऐकू आल्या नव्हत्या.
‘‘अहो काही त्रास होत नाहीये मला! तुम्ही आपलं काम करा बघू!’’ प्रभाताईंनी नवर्‍याला म्हटलं. गुडघ्यावर हात ठेवून हळूहळू जिना चढत त्या वरच्या खोलीत गेल्या. त्या घरात खरं म्हणजे ते दोघंचं होते; पण कामांना तोटा नव्हता! मुलं लहान असताना होत नसेल एवढा पसारा आता होतोय! पूर्वी किती कामं असायची, मुलं लहान, सासूसासरे, आला-गेला, पण हातासरशी कसं व्यवस्थित होत होतं सगळं! आताच काय बिनसलंय कोण जाणे; तितक्या झपाट्यानं कामं होत नाहीत आपल्याच्यानी! वय वाढतंय म्हणून असावं बहुतेक! विचार करत करत त्या कपड्यांच्या घड्या करू लागल्या.
त्या दोघांना मुंबईतल्या आपल्या छोटेखानी बंगल्याचं कोण अप्रूप होतं. मुंबईत सरसकट सगळ्यांनी आपापले बंगले विकून टाकले होते. त्या जागी बिल्डर मंडळींनी टोलेजंग इमारती उभारल्या होत्या. पार्ल्यासारख्या ठिकाणी इतकी वर्षं गोखले दाम्पत्य आटोपशीर दुमजली बंगल्यात राहतंय, ही वेगवेगळ्या मंडळींसाठी कौतुकाची, असूयेची किंवा भविष्यात त्या जागी टोलेजंग इमारत उभारून फ्लॅट विकल्यावर किती नफा होईल यासाठी बांधायच्या आडाख्यांची बाब होती. अनेकांनी युक्ती-प्रयुक्तीनं त्यांच्यासमोर प्रस्तावपण ठेवले होते, पण गोखले दाम्पत्य आपल्या निर्णयावर ठाम होतं. आमच्या वडिलांनी घेऊन ठेवलेली जागा आहे ही. त्या वेळी काही मुंबईत एवढा आजच्यासारखा बुजबुजाट झाला नव्हता. सुसंस्कृत लोकांचं, कला-संस्कृतीचं माहेरघर म्हणून हे उपनगर ओळखलं जायचं! अर्थात त्यांनाही जागा घेण्यासाठी प्रचंड त्रास झाला, पै-पै वाचवून,आईचे दागिने मोडून त्यांनी जागा घेतली होती, मीही नोकरी लागताच कर्ज काढून, पै-पै वाचवून, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे दुमजली, आटोपशीर बंगला बांधला, त्यालाही आता बघता-बघता चाळीस वर्षं होतील! प्रकाशरावांनी आपल्या जवळच्या मंडळींजवळ हितगुज केलं होतं. घराचं कर्ज सगळं फिटलं, ही ईश्‍वराचीच कृपा! कमी हालअपेष्टा सहन केल्या नाहीत आपण! कितीदा तर घरातल्या सुट्या नाण्यांचापण आधार असायचा! प्रभाताईंनी प्रकाशरावांजवळ आपलं मन मोकळं केलं होतं. दोघांनी राबून छोटासा बगिचा केला होता, त्यात भरपूर गुलाब लावले होते. मुंबईसारख्या ठिकाणी त्यांनी फुलवलेले गुलाबांचे ताटवे नंतर वृत्तपत्रांच्याही बातम्यांचे विषय झाले होते. खरंच घराचं नंदनवन केलंस! आपल्या संसारात पूर्ण समाधानी आहे मी! प्रकाशरावांनी प्रशंसोद्गार काढले होते. अहो, तुम्ही प्रचंड मेहनत करता. काटे तुम्ही स्वतः वेचलेत आणि गुलाब आम्हाला दिलेत! ईश्‍वरा, जन्मोजन्मी हाच नवरा लाभू दे! प्रभाताईंनी जणू मनातल्या मनात वडाला प्रदक्षिणा घातल्या.
‘‘प्रभा, आपण घराचं रिनोव्हेशन करायचं का? तुला जिना चढायला त्रास होतो, तर आपण हॅण्डरेल लावून घेऊ या. आपलं घर जुन्या पद्धतीचं आहे, त्यात नव्या सोयी करून घेऊ या! मलाही सेवानिवृत्त होऊन आता दोन वर्षं पूर्ण होतील. गाठीशी थोडे पैसेही आहेत. नंतर काही वर्षांनी थोडीच आपल्याला दगदग झेपणार आहे?’’ प्रभाताईंची संमती मिळताच लगोलग त्यांनी बंगल्याच्या रिनोव्हेशनचं काम मनावर घेतलं. तरुण आर्किटेक्टला आधुनिक गोष्टी माहीत असतील म्हणून त्यांनी एक नव्या दमाचा आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टर शोधला.
‘‘मी अनेक बँक्वे हॉल, स्पा, कमर्शियल स्पेसेस डिझाईन केल्या आहेत! मी मुंबईतल्या टॉपच्या कॉलेजमधून आर्किटेक्टची डिग्री घेतलीये, माझं पोस्टग्रॅज्युएशन प्रोजेक्ट प्लॅनिंगमध्ये आहे आणि मला आता फॉरेनला पीएच. डी.ला ऍडमिशन मिळालीये!’’ आर्किटेक्टनं सलामी दिली. एवढा उच्चविद्याविभूषित आर्किटेक्ट मिळाला, काम चांगलं करेल, या आशेनं गोखले दाम्पत्यानं सुटकेचा निःश्‍वास टाकला.
‘‘हम यूपीसे हूं! मेरे साथ काम करनेवाले मेरे कारागीर भी सब यूपीवाले हैं. मुंबईमें हाऊसिंग का काम बहुत किया हूं. कलसे काम शुरू करेंगे! दो लाख रुपये ऍडवान्स दे दीजीए! कॉन्ट्रॅक्टरनं महिन्याभरात काम पूर्ण करण्याची हमी देत प्रकाशरावांनी दिलेला चेक खिशात घातला.
‘‘समोरच्यांचं दाराचं डिझाईन आडवं आहे ना, आपलं तसंच, पण उभं असणार आहे!’’ आर्किटेक्टनं, गोखले दाम्पत्यांनी अनेकवार म्हटल्यावर सेफ्टी दरवाजाचं डिझाईन दिलं आणि आपलं टीव्ही युनिट हे इथे असं असणार आहे. आर्किटेक्टनं हवेतल्या हवेत हातांनी डिझाईन काढलं.
अहो पण शेजार्‍यांसारखं दार आम्हाला नको! आणि आर्किटेक्ट्ची भाषा ड्रॉईंगची असते! आपलं दार, टीव्ही युनिट वगैरे कसं असेल ते ड्रॉईंगनी सांगा ना! त्रासून प्रकाशरावांनी त्याला म्हटलं.
या रडतराऊतांचं सगळं प्रतीकात्मकच दिसतंय! सगळं हवेतल्या हवेत! ढ मुलगा आहे तो! त्याला आर्किटेक्चरचा असुद्धा येत नाही की प्रोजेक्ट प्लॅनिंगचा प्र! उद्वेगानं प्रभाताई प्रकाशरावांना म्हणाल्या. तो फॉरेनला पीएच. डी.साठी जातोय म्हणतोय; मला तर याच्या बेसिक डिग्रीबद्दलच साशंकता आहे! शिवाय चार महिने उलटून गेले तरी घराचं काम काही पूर्ण होत नाहीये!
चार महिन्यांनी आर्किटेक्टनं स्टीलची हॅण्डरेल पन्नास हजारांची आणि ओढून बंद करायची लोखंडी जाळीची ग्रिल पस्तीस हजारांची म्हणून प्रभाताईंना बिलं दिली, तेव्हा गोखले दाम्पत्याचा विश्‍वास बसेना! ते जातीनं मार्केट सर्व्हे करून आले! मार्केटच्या हिशेबाने ती हॅण्डरेल सोळा हजारांची आणि लोखंडी ग्रिल साडेसात हजाराची होती!
नाही, एसएसची हॅण्डरेल चौदाशे याच भावानं आहे! आम्ही बँकांमध्ये पण असंच लावतो! आर्किटेक्टनं प्रभाताईंना सांगितलं. तरीच! हॅण्डरेल लावण्याच्या खर्चासकट त्याचा भाव साडेचारशे असताना कुणी चौदाशे लावला, तर बँकेत ठेवीरूपाने ठेवलेले लोकांचे पैसे बुडतात, ते नवल नाही! संबंधितांना याचा जाबही विचारला जायला हवा! मनातल्या मनात प्रभाताई त्याच्यावर संतापल्या.
अखेरीस पाच महिन्यांनी काम झाल्यावर, प्रचंड मनस्ताप, खर्च आणि शारीरिक दगदग सहन केल्यावर प्रभाताईंनी ताळेबंद मांडला, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्याविरुद्ध दाद मागण्याची कुठलीही सक्षम यंत्रणा मुंबईतच काय, पण देशातसुद्धा नाहीये आणि त्यांनी अवाच्यासवा बिल आकारूनसुद्धा केलेल्या कामाचा दर्जा मुळीच समाधानकारक नाहीये.
चला प्रभाताई, वरच्या मजल्यावर कामं वाट पाहताहेत आपली! कपडे वाळवायचेत, वाळलेल्या कपड्यांना इस्त्री करायचीय! प्रभाताई स्वतःशीच पुटपुटत जिना चढू लागल्या.
थांब, मीपण आलोच तुझ्या मदतीला! पाच महिन्यांनंतर पहिल्यांदाच घरात गवंडी, प्लम्बर, इलेक्ट्रिशियन, सुतार यांच्यापैकी कुणी नव्हतं. प्रकाशरावांनी प्रभाताईंना आधार दिला आणि दोघं हॅण्डरेलला न धरता जिना चढू लागले.
*
आई चल ना, उशीर होतोय! स्कूटरवर मागच्या सीटवर बसलेल्या लेकीनं गीताला दुसर्‍या-तिसर्‍यांदा म्हटलं, तरी गीता शांतपणे समोरच्या गाड्या वाटेतून बाजूला होण्याची वाट बघत आपल्या स्कूटरवर बसली राहिली. मुंबईसारख्या शहरात रस्त्यावर घाई दाखवून काही उपयोग नसतो, त्यापेक्षा हातात अधिक वेळ ठेवून घरातून निघायचं, रस्त्यावर वाहनांची गर्दी असली, तरी शांतपणे समोरच्या गाड्या पुढे निघण्याची वाट बघायची, आपलं घोडं पुढे दामटायचं नाही, हेच सूत्र तिनं कायम अनुसरलं होतं.
हो बेटा! आज उशीर नाही होणार, आणखी पंधरा मिनिटं आहेत आपल्याजवळ! आणि शाळेचा रस्तापण आपल्याला पाठ झालाय ना! मागच्या वेळसारखा रस्ता चुकणार नाही. आपल्याला पाच मिनिटं लागतील शाळेत पोहोचायला. पाठीमागे बसून चुळबुळणार्‍या लेकीला गीतानं आश्‍वस्त केलं.
मला नाही आवडली मुंबई! लेकीनं पुन्हा कुरकुरत नाराजी व्यक्त केली.
आज डब्ब्यात काय मस्त पदार्थ दिले आहेत माहिती आहे का?मला माहितीये, आज सुट्टीच्या आधीच डब्बा संपणार आहे, म्हणून दोन डब्बे दिलेत! गीतानं लेकीचं लक्ष दुसरीकडे वळवायचा प्रयत्न केला. तिची आज पहिल्याच तासात आठवडी परीक्षा होती आणि मोठ्या अनिच्छेनं तिनं रटाळवाण्या वाटणार्‍या त्या विषयाचा अभ्यास केला होता. आपण उलटे पाढे म्हणायचे का? शंभर, नव्व्याण्णव, अठ्‌ठ्याण्णव,सत्त्याण्णव… गीताच्या त्या युक्तीवर लेक हसू लागली.
गीता आणि तिचं कुटुंब पंधरा-सोळा वर्षांनी पुन्हा मुंबईला बदली होऊन आलं होतं. पहिल्यांदा गीता जेव्हा मुंबई नामक महानगरात आली होती, तेव्हा तिनं एवढं त्या शहराबद्दल ऐकलं होतं, त्यातलं एकही तिला प्रत्यक्षात आढळलं नव्हतं. गर्दीचे लोंढे, वस्तूंच्या अवाच्यासवा किमती, महाग भाज्या… रोजचं जगणंसुद्धा इतर ठिकाणांपेक्षा कितीतरी कठीण! मला नाही आवडली मुंबई! तिनं तीव्रपणे नवर्‍याजवळ नाराजी व्यक्त केली होती. संधी मिळाली की इथून बाहेर पडू या आपण! तिनं अजिजीनं, मुंबईच्या प्रेमात पडलेल्या त्याला विनवलं होतं. योगायोगानं मुंबईत त्याला प्लॉट मिळाला आणि तिला न जुमानता त्यानं घर बांधलं. इथून तुला कुणी घर खाली करा म्हणणार नाही दर अकरा महिन्यांनी! आपला हक्काचा निवारा हवाच! पाठोपाठ बदली होऊन दोघं मुंबईबाहेर गेले, तेव्हा एकटेच असणारे ते पुन्हा मुंबईला परतले, तेव्हा उशिरानं झालेली त्यांची लेक शाळेत होती. शेजार्‍यापाजार्‍यांनी सर्वत्र अनधिकृत बांधकामं करून त्यांच्याही घरात आपापल्या मर्जीनुसार अतिक्रमणं केलेली होती. आधीच अरुंद असलेल्या बोळीत लोकांनी घरातच हवी तशी दुकानं थाटून त्या रेसिडेन्शियल एरियाला कमर्शियल करून टाकलं होतं. त्या दुकानांना सामान पोहोवणार्‍या टेम्पो आणि गाड्यांमुळे त्या परिसरात कायम वाहतूक अडलेली असायची. मुंबईतल्या संबंधित यंत्रणांना लोकांनी आपापल्या बंगल्यात केलेली अनधिकृत बांधकामं, रहिवाशी क्षेत्रांत अनधिकृतपणे उघडलेली दुकानं कशी दिसत नाहीत देव जाणे! बहुधा संबंधित मंडळी गाठीला बर्‍यापैकी पाप आणि पैसे जोडून एव्हाना कफ परेड, पाली हिल किंवा गेला बाजार बीकेसीसारख्या ठिकाणी राहायला गेली असतील, तर त्यांना कशाला आपल्या एरियातलं अतिक्रमण दिसणार आहे? तिच्या मनात आलं.
एव्हाना इतर वाहनचालकांनी कर्कश हॉर्न वाजवायला सुरुवात केली होती. त्या अरुंद बोळीत आलेल्या टेम्पो, मिनी ट्रक, ऑटोरिक्षा यांनी रस्ता साफ बंद झालाच होता, त्यात वेड्यावाकड्या लावलेल्या लोकांच्या बाईक्सनी गोंधळात आणखी भर घातली होती. अखेरीस रोजचाच फार्स, वाहनचालकांची आपसांत भांडणं वगैरे होऊन मोकळ्या झालेल्या रस्त्यावरून लेकीला शाळेत सोडायला शांतपणे गीता निघाली, तेव्हा तिच्या हातात जेमतेम पाच मिनिटं होती आणि लेकीचा बिनसलेला नूर तिला परत नीट करायचा होता.
महानगर आपल्या गतीनं धावत होतं. लोकांच्या सुखदु:खाशी त्या महानगराला काही देणंघेणं नव्हतं. या महानगरात काय खरं आणि काय खोटं, कोण खरं आणि कोण खोटं याचा ताळेबंद ज्याचा त्यानी मांडायचा होता.
रश्मी घटवाई,९८७१२४९०४७