आंबा

0
161

खाद्यपुराण

‘आंबा पिकितो रस गळीतो
कोकणचा राजा माझा झिम्मा खेळीतो॥
एप्रिल ते जून या दिवसांत खरंच काय मजा असते, नाही ? ऊन असतं, पण सगळ्यांनी मिळून केलेला आंब्याचा रस, ते एकत्र बसून आंबे माचवून खाण्याची मजा, घरभर आईने केलेल्या लोणच्याचा सुगंध. व्वा, व्वा ‘आंबा’ या फळाला ‘कोकणचा राजा’ असे म्हणतात. एप्रिल-जून हा या फळांचा मौसम आहे.
आंब्याचा उगम निश्‍चितपणे कुठे झाला, हे अज्ञात आहे. परंतु, दक्षिण आणि दक्षिण पूर्व आशियामधले मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील २५० ते ३०० लक्ष वर्षांचा जीवाष्मांचा इतिहास पाहता आंब्याचा उगम याच भागात झाला असावा, असे मानण्यात येते. दक्षिण आशियामध्ये हजारो वर्षांपासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे.
आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ तसेच बांगलादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाइन्समध्ये राष्ट्रचिन्ह आहे.
आम्रवृक्ष हे शुभ, पवित्र, मांगल्यदर्शक आणि आरोग्यदायी आहे. भारतीय संस्कृतीत आंब्याला धार्मिक कार्यातही खूप महत्त्व आहे. केाणत्याही शुभप्रसंगी, मंगलकार्यात आणि सणाच्या दिवशी आंब्याच्या पानांचे तोरण दाराला बांधतात. कलशपूजन हे भारतीय संस्कृतीचे अग्रगण्य प्रतीक आहे. कलशात नेहमी आंब्याची पाने ठेवतात.
आम्रवृक्ष हा सदाहरित, सदाबहार, विपुल फळे देणारा तसेच हा वृक्ष दीर्घायू असल्यामुळे देवपूजेत आणि मंगलकार्यात त्याला विशेष महत्त्व आहे.
आयुर्वेदाच्या दृष्टीने आंब्याला खूप महत्त्व आहे. आंब्याच्या विविध जाती आहेत. हापूस, पायरी, उत्तरी भारतातील लंगडा, दक्षिण भारतातील नीलम, तोतापुरी, बैंगनफल्ली… अशा अनेक जाती सांगता येतील. आपल्या देशात आंब्याच्या ६०० ते ८०० जाती आहेत. आंब्याचा मोहोर, कैरी, पिकलेला आंबा, आंब्याची पाने, झाडाची साल या सर्व गोष्टींची आयुर्वेदात वेगवेगळी उपयुक्तता आहे.
तसे आंब्याचा मोहोर थंड, रुची उत्पन्न करणारा असून अतिसार, रक्तदोष आणि कफ-पित्त दूर करणारा आहे.
कैरीमध्ये आम्लता आणि क्षाराचे प्रमाण खूप आहे. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो. या वेळी कैरीचे पन्हे उत्तम मानले जाते. पन्हे प्यायल्यामुळे उन्हाळ्याचा त्रास फार कमी होतो. कैरीचा कीस फडक्यात घालून डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांची दमणूक आणि ताण कमी होतो. कच्या कैरीचा गर अंगाला लावून अंघोळ केल्यास घामोळ्यांचा त्रास होत नाही. कैरीच्या बाठीचे चूर्ण हिरड्यांच्या तक्रारी कमी करण्यास उपयुक्त आहे; तसेच हे पूर्ण पाण्यात घालून आंघोळ केल्यानेदेखील घामोळ्यांचा त्रास कमी होतो. पिकलेला आंबा शक्तिवर्धक आणि अतिशय रुचकर असतो. आंब्याने शरीराची कांती सुधारते तसचे पोषणदेखील उत्तम होते. आंब्यात जीवनसत्त्व ‘अ’ आणि ‘क’ भरपूर प्रमाणात आहे. ‘अ’ जीवनसत्त्व जंतुनाशक, तर ‘क’ जीवनसत्त्व त्वचारोगहारक आहे. त्यामुळे आंबा उत्तम आरोग्य देणारा आहे. आंब्याची कोवळी पाने चावूनचावून नंतर टाकून द्यावीत. त्या रसाने आवाज सुधारतो, खेाकला कमी होतो आणि हिरड्यांचा पायोरियाही कमी होतो. आंब्याच्या पानांचा चीक टाचाच्या भेगांवर उपयुक्त आहे. आंब्याच्या गोंदाचा सांधेदुखीत खूप उपयोग होतो. आंब्याचा गोंद, एरंडेल तेल, लिंबाचा रस, हळद सम प्रमाणात घेऊन ते मिश्रण एकजीव करून शिजवून घ्यावे व हा लेप सांधा निखळणे, पाय मुरगळणे, लचकणे यासाठी गुणकारी आहे.
आंब्याला संस्कृत भाषेमध्ये ‘आम्र’, तर तामीळ भाषेत ‘माकन’ किंवा ‘मानगास’ म्हणतात. या दोन नावांवरून आंब्याशी ओळख झालेल्या परकीयांनी आपापल्या परीने त्याचे नामकरण केले. इंग्रजी भाषेत त्याला ‘मँगो’ म्हणतात, पोर्तुगीज भाषेत ‘मॅगुरा’ तर फ्रेंच भाषेत ‘मॅबुएर’ असे म्हणतात. यावरून शास्त्रीय भाषेत त्याला ‘मॅजिफेरा, इंडिका’ हे नाव मिळाले.
भारतात आंबा हा सर्वांचे आवडते फळ आहे. फळांचे ‘सम्राटपदही’ त्याला मिळाले असले तरीही त्याने सामान्यांना दूर केलेले नाही. लहान-थोर, गरीब-श्रीमंतांचा तो एकसारखाच लाडका ठरलेला आहे. म्हणूनच की काय हिंदी भाषेत त्याला ‘आम’ नाव मिळाले आहे. ‘आम’ म्हणजे सामान्य.
आंब्याचे पदार्थ

मँगो स्मूदी
साहित्य : पिकलेले आंबे ४ (बारीक फोडी करून घ्या.) ४ कप थंड दूध, ६ टे.स्पू. मलाईचे दही, ८ ते १० टे.स्पू. साखर, १ कप बर्फाचा चुरा.
कृती : मिक्सरच्या जारमध्ये आंब्याच्या फोडी, साखर, दूध, दही घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. ग्लासमध्ये बर्फाचा चुरा घालून स्मूदी सर्व्ह करा.
पमँगो टॅगो
साहित्य : १/२ कप आंब्याचा रस, १/३ कप ऑरेंज ज्युस, ५० मि.लि. पाणी,
१ स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम, क्रश केलेला बर्फ, ऑरेंज स्लाईस सजविण्याकरिता.
कृती : मिक्सरच्या जारमध्ये आंब्याचा रस, ऑरेंज ज्युस, फ्रेश क्रीम, पाणी, आईस्क्रीम, बर्फ इ. सर्व साहित्य एकत्र करून फिरवून घ्या आणि थंडगार सर्व्ह करा.
पकैरीचे पन्हे
साहित्य : १ किलो कैर्‍या, १ किलो साखर, वेलची पूड, १ टी. स्पून मीठ.
कृती : सर्वप्रथम कैर्‍या उकडून घ्याव्यात आणि त्याचा गर काढून घ्यावा. या गरात मीठ, साखर, वेलची पूड घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि बरणीत भरून फ्रिजमध्ये ठेेवा. सर्व्ह करते वेळी थोडा गर ग्लासमध्ये घेऊन त्यात थंड पाणी आणि बर्फ घालून सर्व्ह करा.
नीता अंजनकर/९४२२८३५३७५