वनयात्रा एक सुखद अनुभव

0
179

यायात्रेला जायचं म्हटलं की, सर्वांनाच आनंद होतो, पण आमची ही वेगळीच ‘वनयात्रा’, वनवासी कल्याण आश्रम संस्थेतर्फे आयोजित केलेली. पूर्वीच्या काळात अत्यंत प्रगत असा वनवासी समाज, परंतु मध्यंतरीच्या काळात प्रगतीच्या दूर फेकला गेलेला. नागरी जीवनापासून तुटलेल्या या समाजाला पुन्हा मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या सर्वांगीण कल्याणासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्वर्गीय बाळासाहेब देशपांडे व त्यांनी स्थापन केलेली ‘वनवासी कल्याण आश्रम’ ही संस्था. नुकतीच या संस्थेच्या कार्याची ओळख झाली नि लागलीच ४-५ दिवसांत या संस्थेचे कार्य कसे चालते, ते पाहण्याचा सुखद अनुभव वनयात्रेच्या निमित्ताने घेता आला.
दिनांक १ मार्च २०१७ रोजी वनवासी कल्याण आश्रमाची कुरखेडा, जि. गडचिरोली येथील छात्रावास शिवणक्लास प्रकल्प व जवळील ‘कटंगटोला’ या आदिवासी गावाला भेट असा ‘वनयात्रे’चा कार्यक्रम ठरला. मी व माझ्यासारख्या काही नवीन व काही जुन्या सदस्य, पदाधिकारी भगिनी व श्री. मोडक हे बंधू मिळून सकाळी ८ वाजता बसने निघून १२ च्या सुमारास कुरखेडा येथील छात्रावासाच्या गेटपाशी पोहोचलो. दाराशीच सौ. जास्वंदा दर्रो यांनी हसतमुख चेहर्‍याने स्वागत केले. त्यांच्या कार्याची माहिती, पुरस्कार यासंबंधी कळताच वनवासी समाजातून पुढे येऊन एक तरुणी विदर्भ प्रांताची प्रमुख महिला संघटकाची जबाबदारी सांभाळत आहे, स्वत: प्रगती करून इतरांसाठी झटते आहे, हे ऐकून कौतुक व अभिमान वाटला.
छात्रावासात प्रवेश करताच प्रथम लक्ष वेधले ते सुरेखशा रांगोळीकडे. घरातील उत्तम संस्कारांची ओळख होते ती अंगणातील रांगोळी व स्वच्छतेने!
इथे काम करणार्‍या नि:शुल्क शिवणक्लासच्या प्रशिक्षिका, शिक्षण घेणार्‍या मुलींची व आम्हा सर्व भगिनींचा परस्पर परिचय झाल्यानंतर मुलींनी शिवलेल्या कपड्यांचे कौतुक करून व पुढे याच व्यवसायात त्यांना अधिक काय करता येईल जसे प्लास्टिक बॅगला पर्यायी अशा कापडी पिशव्या यावर मार्गदर्शन करून आम्ही निघालो ते आदिवासी वस्तीच्या २५० लोकसंख्या असलेल्या कटंगलोटा या गावाला भेट देण्यासाठी.
बसमधून उतरताच गावकरी भगिनींनी पंचारती ओवाळून भव्य स्वागत केले. सुरेखशा रांगोळ्या, पताका, तोरणे, कल्याण आश्रमाच्या स्वागताचे बॅनर, स्वच्छ परिसर, बँडताशाच्या गजरात आदिवासी लोकनृत्य करणार्‍या स्त्रिया व पारंपरिक वेशभूषा करून त्यांना साथ देणारा बंधूवर्ग. सर्व भगिनींनी हा प्रसंग, ही मिरवणूक आपापल्या कॅमेर्‍यात बंदिस्त केली. शहरी लोकांसाठी असे स्वागत खरेच नवलाईचे होते. मिरवणूक स्टेजपर्यंत आल्यावर सर्वांना कल्पकतेने बनविलेल्या पळसाच्या फुलांचे बिल्ले लावण्यात आले नि अशाच वनफुलांपासून बनविलेले पुष्पगुच्छ देऊन पदाधिकार्‍यांचे स्वागत करण्यात आले. संस्थेतर्फे चालविल्या जाणार्‍या प्रकल्पांची माहिती दिली. शिस्तीत चाललेल्या या कार्यक्रमाची विशेष शोभा वाढवली ती कविता-शायरीची साथ देत निवेदन करणार्‍या निवेदकाने. गावातील भगिनी, सरपंच, बचत गटाच्या भगिनी व आमचा परस्पर परिचय होऊन त्यांच्याशी सुसंवाद साधून त्यांना शिक्षण, आरोग्य, क्रीडा, पाणी, स्वच्छता, रोजगार यासंबंधी मार्गदर्शन काही सदस्यांनी केले. त्यांचे प्रश्‍न, अडचणी समजून घेत त्यावर उपाययोजना सांगण्यात आल्या. संस्थेत महिला संघटनेवर विशेष भर दिला आहे. कारण घरातील एक स्त्री सुशिक्षित झाली तर संपूर्ण घरातच नव्हे, तर समाजात सुपरिवर्तन करू शकते.
पुढचा कार्यक्रम होता तो सहभोजनाचा. अवघ्या दोन दिवसांत धान्य, पैसा एकत्र करून अगदी जय्यत तयारी गावकर्‍यांनी केली होती. त्यांना मार्गदर्शन होते ते सौ. जास्वंदी व त्यांचे पती श्री. पंढरीनाथ यांचे. जेवणापूर्वी स्टार्टर म्हणून दिलेले उकडलेेले कणीस व भाजलेला हरभरा सगळेच या रानमेव्याने खुश झाले. चारोळीच्या पानांच्या पत्रावळीवरील सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर गावकरी भगिनींचा निरोप घेताना त्यांचे आदरातिथ्य, स्वच्छता, संस्कार, परंपराजतन व मुख्य मनाची श्रीमंती आदी गुणांनी आम्ही खूप भारावून गेलो. पुन्हा येण्याचे आश्‍वासन देऊन परत छात्रावासात आलो. कारण तेथील २०-२५ नातवंडं वाट बघत होती ना! देशभक्तीपर गीत व सुरेख टाळांच्या साथीने भजन म्हणून त्यांनी आमची मने जिंकली. इथेही परस्पर परिचय व बरोबर नेलेल्या खाऊचे वाटप झाले. मुलांनी केलेली फुलबाग, भाजीपाला पाहून कौतुक वाटले. पाचवी ते दहावी इयत्तेतील मुलांची इथे राहण्याची व जेवणाची सोय केलेली आहे. उत्तम संस्कार त्यांच्यावर केले जातात. अंगणातील बोरांनी लडबडलेले झाड पाहून सर्वजणींनी वय विसरून बोरांचा आस्वाद घेतला. मुलांनी आणून दिलेल्या पळस फुलांचा स्वीकार करून परतीच्या प्रवासाला निघालो. बसपर्यंत आलेल्या मुलांचा हात हलवून निरोप घेतला तो पुन्हा येण्यासाठी.
जाताना अंताक्षरी खेळत तर येताना सायंस्तोत्र म्हणत परतीच्या प्रवासाला निघालो. मन मात्र विचार करीत होते ते नि:स्वार्थीपणे सरकारी मदतीशिवाय, लोकवर्गणीवर कार्य करणार्‍या या संस्थेविषयी. पूर्वीच्या काळात भौतिक, स्थापत्य, वनौषधी, धार्मिक या सर्व क्षेत्रात प्रगत असलेला हा समाज, काही काळापासून मुख्य समाजापासून काहीसा दूर गेलेला. सोयी-सुविधा, शिक्षण, आरोग्य यापासून वंचित अशा वनवासी समाजाच्या उत्कर्षासाठी तनमनधनाने कार्यरत असलेली ही संस्था. गौरवशाली इतिहास, अमूल्य संस्कृती असलेल्या वनवासी समाजाची संस्कृती नष्ट करण्याचे अनेक प्रयत्न होऊनही तग धरून असलेल्या या बांधवांचा स्वाभिमान, बोलीभाषा, श्रद्धा, संस्कृती, लोककला जपत त्यांना आधुनिक सोयी, शिक्षण, रोजगार देऊन सर्वांगीण विकास साधत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आधारवड बनलेल्या या संस्थेचे कार्य अगदी कौतुकास्पद आहे. आज गरज आहे ती सर्वांनीच अशा सेवाभावी संस्थेला तनमनधनाने मदत करून समाजऋण फेडण्याची. या कार्यात सहभागी होण्याचा शब्द देत आम्ही सर्वांनी या वनयात्रेचा आनंद मनापासून घेत एकमेकींचा निरोप घेतला, तो पुन्हा पुन्हा भेटण्यासाठी.
लता बापट,९६२३२१६३८२