त्यांचं खरंच काय चुकलं?

0
222

गेल्या आठवड्यात आम्ही दोघी मैत्रिणी असंच संध्याकाळी एका हॉटेलमध्ये गेलो होतो. फारशी गर्दी नव्हती, किंबहुना अजून गर्दी व्हायला अवकाश होता.
शेजारच्या टेबलला एक तरुण जोडपं, त्यांचा सहा ते सात वर्षांचा मुलगा आणि सोबत साधारण सत्तरीच्या आसपासचे एक गृहस्थ असे बसले होते. ते कदाचित त्या स्त्रीचे वडील असावे किंवा त्याचे. मात्र सोबत प्रौढ स्त्री नव्हती. कदाचित आली नसावी किंवा नसावीच.
आम्ही मैत्रिणी आमच्या गप्पांमध्ये रंगलो. खूप दिवसांनी भेटलो, त्यामुळे भरपूर गप्पा साठल्या होत्या.
ऑर्डर केलेलं सूप आणि स्टार्टर्स आले होते. त्याचा आस्वाद घेत आमचं गप्पाडणं सुरू होतं.
तेवढ्यात बाजूच्या त्या टेबलाकडून आवाज आला. आम्ही एकदम शांत झालो.
‘‘बाबा, कुठे लक्ष आहे तुमचं? ठेवा बघू तो हातातला मोबाईल आधी.’’
‘‘अगं हो, दोनच मिनिटं, ठेवतोच आहे. फूड यायला वेळ होता म्हणून तेवढ्या वेळात चॅटिंग करत होतो.’’ अपराधी, पडल्या चेहर्‍याने ते गृहस्थ बोलले.
‘‘बरं का रे, बाबांना न ऍडिक्शन झालंय् त्या मोबाईलचं. रिकाम्या वेळात सतत मोबाईलवर असतात. कधी कॉल्स, कधी फेसबुक, कधी व्हॉट्‌स ऍप! आई गेल्यापासून जास्तच.’’
‘‘बरं गं! आता घरी जाऊन बोलू. आधी जेऊन घेऊ इथे.’’
‘‘घ्या बाबा, जेवा आता! उगीच सगळ्यांचा मूड नका स्पॉईल करू.’’
आम्हा दोघींनाच कसंतरी वाटलं. त्यानंतर त्या आजोबांनी खालची मान वर न करता काहीतरी अन्न चिडवल्यासारखं केलं. नातू आजोबांच्या बाजूला बसून त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता. त्यांची जेवणं आवरली आणि ती लोकं निघाली.
‘‘तुम्ही निघा समोर, मी येतो जरा फिरत फिरत.’’ आजोबांनी खालमानेनीच सांगितलं.
‘‘लवकर याल घरी. नाही तर लावाल जिवाला घोर पुन्हा. निघाले रात्री परत शोधायला असं नको आणखी.’’ एवढं आपल्या वडिलांना बोलून बाई निघाली समोर. तिच्या मागे नवरा. नातवाला आजोबांसोबत जायचं होतं, पण आईने त्याला ओढतच सोबत घेतले. त्यांची वरात एकदाची गेली.
आम्ही दोघींनी सुटकेचा श्‍वास टाकला. आमचंही अन्न टेबलवर आलं होतं.
सहज मनात आलं आणि बाजूला बघत मी विचारलं, ‘‘काका येता का, व्हा जॉईन आम्हाला!’’
‘‘तुमची हरकत नसेल तर येतो. पण खाणार नाही काही. फक्त सोबत कुणी असलं तर बरं वाटतं. एक कप स्ट्रॉंग कॉफी मी माझी मागवेन. ओके?’’
आम्ही हो म्हणताच ते आमच्या टेबलाला आले. त्यांनी कॉफीची ऑर्डर दिली आणि आम्हाला म्हणाले, ‘‘तुम्ही सुरू करा बरं का जेवण. मी तोवर माझे काही मेसेजेस बघून रिप्लाय करून घेतले तर काही हरकत नाही न तुमची?’’
‘‘नाही हो काका, तुमची कॉफी येईस्तोवर तुम्ही निवांतपणे बघून घ्या. आम्ही सुरू करतो आमचं.’’ मी उत्तरले.
जेवताना मी अधूनमधून काकांकडे नजर टाकत होते. ते मस्त गालातल्या गालात हासत मेसेजेस् वाचत होते, रिप्लाय करत होते. खुश दिसत होते. काकांची कॉफी आली आणि त्यांनी मोबाईल बंद करून समोर ठेवला.
‘‘काका खाणार थोडं? तुमचं काही मघाशी नीट जेवण झालं नाही.’’
‘‘नाही गं, रात्री तसंही फार कमी खातो मी. पण मघाशी जे घडलं, तसं झालं की इच्छाच मरून जाते जेवणाची. सॉरी, मी नको बोलायला न हे काही? पण…’’
‘‘नाही काका, बोला तुम्ही, काही हरकत नाही, मोकळं वाटणार असेल तर…’’
‘‘मुलींनो, सहाच महिने झाले हिला जाऊन. मी अमरावतीला चांगला होतो. तिथं स्वत:चं घर, इतके वर्षांचे परिचित, मित्रमंडळी, सगळे नातेवाईक तिथे. मी रमलो असतो तिथे छान माझ्या परीने हळूहळू. ही एकुलती एक मुलगी. मला जबरदस्ती आग्रह करून इथे आणलं या लोकांनी. मला काही या स्मार्टफोनची वगैरे सवय नव्हती. मी नको नको म्हणत असताना घेऊन दिला आणि वर हे ऐकवलं की, ‘‘बाबा, आता जरा जगासोबत चालण्याची सवय करा. उगाच मागासल्यासारखे नका राहू. उलट या मोबाईलमुळे तुम्ही तुमच्या सर्व लोकांच्या संपर्कात राहू शकाल. सगळं नवीन तंत्रज्ञान, नवीन गोष्टी यायलाच हव्यात.’’ मग काय, मीही सारं शिकून घेतलं. त्यात रमायला लागलो, लॅपटॉपपण ऑपरेट करू लागलो. कार चालवण्याची पुन्हा सवय करून घेतली. नातवाला शाळेत सोडायला-आणायला जातो दुपारी. जेवायला वाढतो, झोपवतो, संध्याकाळी फिरायला नेतो. आता याशिवाय जो वेळ राहतो, त्यात मी माझ्या मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग केलं, नातेवाईकांना कॉल केले तर काही चुकतो का? आता एकटा उरलो म्हणून…
जावईमाणसाचा संकोच वाटतो. मुलगी स्वत:ची, पण फार बोलते कधी, ताळतंत्र सोडून…’’ एवढं बोलून काकांनी कॉफीचा शेवटचा घोट घेतला. आमच्यासाठी आमचं न ऐकता आग्रहानं आईस्क्रीम मागवलं.
खरं तर सारं ऐकून काकांची कीवच येत होती. त्यांची नजर किंचित उदास भासली. पण, काकांशी प्रेमानं गप्पा मारत आम्ही आईस्क्रीम संपवलं. गंमत म्हणजे आमचं सारं बिल काकांनी दिलं. म्हणाले, ‘‘काका म्हणताय् न मला? मग मला काकासारखं वागू देत आणि तुम्ही पुतण्यांसारख्या राहा.’’
आम्हीही मग जास्त आढेवेढे घेतले नाही. मात्र काकांना, पायी फिरत न जाता आमच्या कारनं सोडू, असं सांगितलं. तेही तयार झाले. ‘‘तेवढ्यात अजून गप्पा होतील.’’ ते म्हणाले.
मग आम्ही काकांना सोडायला गेलो. दहा मिनिटांच्या अंतरावरच तर घर होते. मोबाईल नंबर्सची देवाणघेवाण झाली. अधूनमधून भेटायची कबुली झाली. व्हॉट्‌स ऍपवर चॅटिंग करायचे ठरले. काका एकदम खुश होते.
तेव्हापासून आम्ही दोघी मैत्रिणी काकांशी अधूनमधून फोनवर बोलू लागलो. व्हॉट्‌स ऍपला गुड मॉर्निंग, गुडनाईटव्यतिरिक्त चांगल्या कविता, किस्से एकमेकांना पाठवू लागलो. काकांनाही बरं वाटायचं. क्वचित कधी भेटही व्हायची. कधी एखाद् वेळी हलकी उदासी झळकायची नरजेत त्यांच्या, पण पूर्वीइतकी नाही.
आता हा दुसरा किस्सा, अगदी दोनच दिवसांपूर्वीचा. नेहमीसारखी मी सकाळी फिरून येत होते. येताना जवळच्याच पार्कमध्ये जरा थांबले. तिथल्या बेंचवर बसून इतरांच्या हालचाली बघत बसले. कुणाचं भराभर चालणं, कुणाचं धावणं, कुणाचं योगा, कुणाचं व्यायाम करणं, कुठे हास्य क्लब सभासद, कुठे ध्वज उभारून शाखा सुरू होती.
तेवढ्यात माझ्या बाजूला एक स्त्री येऊन बसली. चांगली सधन घरची, दिसायला छान, आधुनिक राहणीची. पण, चेहर्‍यावर जरा नाराज, डोळ्यांत मळभ दाटलेलं. मी एकदा तिच्याकडे नजर टाकली. ती जराशी हसली. मीपण प्रतिसाद दिला किंचित हासून आणि पुन्हा इतरत्र बघू लागले.
तेवढ्यात बाजूनं एक अस्फुट, अस्पष्ट हुंदका ऐकू आला म्हणून मी पुन्हा तिच्याकडे वळून बघितले, तर हातात जपाची माळ घेऊन ती जप करीत होती, ओठ घट्ट बंद होते. त्या बंद ओठांतूनच हुंदका निसटला होता, डोळ्यांना धारा लागल्या होत्या. माझ्याकडे लक्ष जाताच डोळे पुसून ती म्हणाली.
‘‘काही नाही… असंच आपलं….’’ आणि जपाची माळ पर्समध्ये ठेवली.
‘‘नेहमी येता इथे तुम्ही सकाळी?’’ तिने विचारले.
‘‘फिरायला रोजच जाते, इथे अधूनमधून येते. पण, तरी बरेचदा. तुम्ही येता रोज?’’
मीही विचारून घेतलं.
‘‘कसलं काय, आतापर्यंत सारं नियमित होतं माझं हो! पण, आता काही खरं नाही. तुम्ही म्हणाल, काय आताच पहिल्यांदा भेटलो आणि मी आपली काहीबाही बोलत सुटले.’’
‘‘नाही हो, असं काही नाही, आज मलाही जरा वेळ आहे. बोला न तुम्ही.’’ मी असं म्हटल्यावर ती स्त्री आणखी मोकळी होत बोलू लागली.
‘‘मी तुला ए, तू असं बोलले तर चालेल न?’’
मी परवानगी देताच त्या सांगू लागल्या,
‘‘अगं बघ न, चांगली बँकेत नोकरी करत होते मी. गेल्याच वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. मुलगा नाही, दोन मुलीच मला, जुळ्या. दोघींची लग्नं करून दिलीत आणि मी व्हीआरएस घेतलं. चार वर्षांपूर्वी हे रिटायर्ड झाले. आता आपलं जीवन जरा शांतपणे मनाप्रमाणे जगू, असा विचार होता. पण, लगेच हार्टफेल होऊन हे गेले. आता काय? दोघी मुली परदेशात. मला न विचारता त्यांनी आपसात ठरवून माझी वाटणी करून घेतली. एकीने म्हटलं की तिथे जायचं, दुसरीने म्हटलं की तिथे. नाही गं करमत फार तिकडे. आपलं सगळं आयुष्य इथे गेलं. आपल्या ठिकाणी बरं वाटतं. तिथे कोणी आपली माणसं नाही, कोणी बोलायला नाही, जायला यायला नाही. दिवसभर सारी कामं घरीच करायची. नातवंडं सांभाळायची. चेहरा नेहमी हसतमुख ठेवायचा. थकायचं नाही. आजारी पडायचं नाही. सगळ्या आधुनिक गोष्टी शिकल्या तरी मी ‘बॅकवर्ड’च. बरं, फावल्या वेळात मोबाईलवर व्हॉट्‌स ऍप वा फेसबुक बघत असले की,
‘‘काय हा फॅडिस्टपणा आई?’’ असं मुली टोकतात तर,
‘‘अरे, आपली मोबाईल आजी काय करतेय बघ, फेसबुकला आहे की व्हॉट्स ऍपला?’’ असं म्हणून जावई टिंगल करतात.
मला नाटक, सिनेमा, शॉपिंग, प्रवास असं सारं आवडतं. आम्ही ठरवलंही होतं तसं, पण यांच्या जाण्यानं सारं चित्रच पालटलं. कधीतरी निवांतपण हवंसं वाटतं गं. का कोणीच समजून घेत नाही? आपल्याच लोकात, पण किती परक्यासारखं वाटतं?’’
पुन्हा त्यांच्या डोळ्यांना धारा लागल्या. काय बोलावं मलाही काही समजेना, जरा वेळ. मी किंचित त्यांच्याजवळ सरकून त्यांच्या खांद्यावर थोपटल्यासारखं करीत म्हटलं, ‘‘मावशी, अशा नका न निराश होऊ तुम्ही. जरा ठामपणे, पण प्रेमानं पटवून सांगा मुलींना. तुम्ही एक स्वतंत्र व्यक्ती आहात न? तुम्हाला तुमचं निराळं अस्तित्व आहे. आता तुमचं आयुष्य थोडं तुम्ही तुमच्यासाठीच जगा. भरपूर प्रवास करा, छान तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जात येत जा आणि मोबाईल्समुळे तर एक चांगली सोय झालीय, की जगाच्या कोपर्‍यातल्या कोणत्याही व्यक्तीशी आपण आता संपर्क साधू शकतो. गप्पा मारू शकतो, हो न?’’
मी असं बोलल्यावर त्या बर्‍याच सावरल्या. काहीतरी पटून गेल्यासारख्या म्हणाल्या, ‘‘हो, आता बघतेच सांगून जरा ठामपणे, फार गृहीत धरतात नाही तर!’’ ‘‘मावशी, मी तुम्हाला सांगितलं, कारण त्या जागी मी स्वत:ला ठेवून बघितलं. फार अवघड वाटलं मला ते सारं.’’ चला भेटू या? माझा मोबाईल नंबर त्यांना दिला आणि आम्ही उठलो. त्या उगाच दहादा माझे आभार मानत होत्या. दुसर्‍याच दिवशी मावशींचा संध्याकाळी फोन आला.
‘‘अगं बेटा माझे सध्याचे सगळे टूर्स कॅन्सल बरं का! सध्या मी इथेच राहणार, निवांतपणे जगणार, मनासारखी. मुलीबाळीच येणार वर्षातून माहेरपणाला. पटवून सांगितलं बघ दोघींना. आता तूही ये माहेरी, मावशी म्हणतेच न मला?’’ आनंद ओथंबला होता त्यांच्या आवाजात नुसता. त्यांना मनापासून होकार देऊन दिला. नकळताच माझ्याही मनाला समाधान वाटलं.
मनात मात्र रोज एकदा तरी त्या काकांची आणि मावशींची आठवण होते. तसं बघितलं तर त्यांच कुठे काय चुकलं होतं…?
मीनाक्षी मोहरील/९९२३०२०३३४