ती ‘आई’ होती म्हणूनी…

0
308

महिला महाविद्यालयात एका कार्यक्रमाकरिता उद्घाटक म्हणून मला निमंत्रित केले होते. प्राचार्य मॅडमच्या कक्षात मी पोहोचले. छान स्वागत झाले. विषय निघाला पुन्हा महिलांवरील अत्याचारांचा… कक्षात उपस्थित एक प्राध्यापिका. प्राचार्या मॅडम म्हणाल्या, ‘‘मॅडम तुम्हाला कळलं का? आज सकाळीच आपल्याच या परिसरात एका महिलेचा खून झाला. सर्व परिसरात अशीच चर्चा आहे. ’’ मॅडम म्हणाल्या, ‘‘हो, कळले. पण कशाकरिता झाला? कोणी केला? हे नेमके कळले नाही.’’ पुन्हा एकदा अनेक जुन्या प्रकरणांवर चर्चा झाली. तेवढ्यात कार्यक्रमाची तयारी झाल्याची सूचना आली. आम्ही सार्‍या व्यासपीठाकडे जाण्यास निघालो. कार्यक्रम छान झाला. त्या दिवशीच माझं भाषणही छान झालं. कार्यक्रम संपला. मी परत निघाले| पण तरी, त्या महिलेचा खून का झाला असावा? हा प्रश्‍न संपूर्ण दिवसभर अस्वस्थ करीत राहिला. दुसर्‍या दिवशी सकाळी वृत्तपत्रांनी सारा खुलासा दिला होता. त्यानुसार जी गोष्ट पुढे आली ती काळीज चिरून टाकणारी होती. पुन्हा एकदा आईच्या मातृत्वाचा दारुण पराभव झाला होता. तिच्या स्त्री असण्याची शिक्षा तिला भोगावी लागली होती. पतीचा संशयी स्वभाव, दारूचे व्यसन, नाकर्तेपणा, सतत मारझोड, शिवीगाळ अन् तिच्या स्त्रीत्वाचा अपमान याच अन् याच कारणांकरिता सविता मागील दोन वर्षांपासून नवर्‍यापासून वेगळी राहात होती व तू काय करायचे ते कर, माझा मुलगा परत दे… या एकाच कारणाकरिता त्रास देणे सुरू होते. सविता मुलाला परत करत नाही, या रागाने व पुन्हा तिच्या आयुष्यात कुणी तरी आलंय् या संशयाने बेभान झाला. कधी काळी त्यानंही सवितावर प्रेम केलंच असेल, पण आज ती जागा पूर्ण द्वेषाने व्यापून घेत तिचा निर्घृणपणे खून केला होता. तिला कायमचे संपविले होते.
समाजाची सर्व स्तरावरून सर्वांगीण प्रगती होत असताना, विकासाचा आलेख झपाट्याने वर जात असताना अशा आणि अशाच कारणांकरिता स्त्रीत्वाला संपविण्याचे प्रमाण कमी होत नाही, तर उलट वाढतेच आहे, हा एक सामाजिक चिंतनाचा गंभीर विषय झालेला आहे.
या घटनेतील सविता, तिचा नवरा यांची छायाचित्रे दुसर्‍या दिवशी सर्व वृत्तपत्रांतून झळकली. इतकी सुंदर, देखणी, विचारी वाटणारी सविता सर्वांच्याच हळहळीचा विषय ठरली. तिचा नवरा म्हणून असणारा माणूस कोणत्याही बाजूने तिच्या लायकीचा नव्हता, हे फोटो पाहताच लक्षात येत होते. केवळ तडजोड म्हणूनच सविताने त्याच्यासोबत काही काळ काढला असावा. अगदी अशक्य झाले तेव्हाच ती वेगळी झाली असावी. असे कुणालाही वाटावे, असे सविताचे राहणीमान व स्वरूप होते. एकाकी झुंज देताना अखेर ती संपली. ज्याच्याकरिता ती सारं सोसत होती तो मुलगा पूर्णत: अनाथ झाला होता.
सवितासारखंच सतीचं वाण घेऊन आज कितीतरी स्त्रिया जगत आहेत. ज्यामध्ये गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित अशा सर्वांचाच समावेश आहे. तिची पातळी फक्त एकच व ती म्हणजे तिचे ‘आई’ असणे. एका विशिष्ट वळणानंतर ती जगते फक्त ‘आईपणा’करिता. सारं सोसते लेकरांकरिता. सारा दाह पचविते फक्त लेकरांकरिता. तिचे ‘आईपण’च पुढे तिला जगविते. आतल्या आत तर ती केव्हाच मृत झालेली असते. समजात वावरत असते फक्त एक जिवंत लाश होऊन…
चार चार पदव्या असलेली, एका मान्यवर संस्थेत पाच अंकी पगार कमावणारी, अतिशय संयमी, सोज्ज्वळ आणि नम्र स्वभावाची अशी सर्वांना भावणारी माझी मैत्रीण शोभना. तिच्याही नशिबी असेच भोग आलेत. शोभनाचा नवरा उच्चशिक्षित, चांगली नोकरी असलेला. पण, त्यालाही पूर्णत: संशयाने ग्रासलेले. संसारात नित्य नवी वादळे उभी करणे हे रोजचेचं. त्याच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून एकदा मुलांना घेऊन ती माहेरी निघून गेली. शोभनाचे भाऊ, बाबा व इतर माहेरच्या लोकांना शोभनाबाबत सारेच ठाऊक होते. तिच्या बाबांनी शोभनाच्या नवर्‍यास हात जोडून म्हटले, जावईबापू, तुम्ही महान आहात. माझी लेक व आम्ही तुमच्या लायकीचे सिद्ध होऊ शकलो नाही. तुम्ही तिला सोडून द्या. तुम्हीही सुखाने जगा व तिलाही जगू द्या. शोभनाचं माहेर असं तिच्या पाठीशी उभं राहील, याची त्याला कल्पनाच नव्हती. त्याने आपले म्हणणे मांडले, ठीक आहे. तुम्ही ठेवा तुमच्या मुलीला, पण माझी मुलं मला परत द्या. याच मुद्यावरून त्याने इतका गोंधळ घातला की, शोभनाने त्याचे सारे गुन्हे पोटात घालत त्याच्याच घरी परतणे स्वीकारले. अशी असते ‘आई!’ त्याचे पुन्हा तेच ये रे माझ्या मागल्या! वागणे सुरू. मी याला सोडून दिले तर याचा त्रास नेहमीच सुरू राहणार- माझी मुलं परत दे. जी मला द्यायचीचं नाहीत आणि माझ्या आयुष्यात जर कोणी दुसरा पुरुष अर्थात माझ्या माहेरच्यांनी माझ्या दुसर्‍या लग्नाचा विचार केला, तर हा पुढच्या संपूर्ण आयुष्यात शत्रू म्हणूनच त्रास देणार, हे निश्‍चित! सतत, माझ्या मुलांना घेऊन जाईल का, त्या पुरुषासह मला मारून टाकेन का, ही भीती. या सर्व भयानकतेच्या टांगत्या तलवारीमध्ये जगण्यापेक्षा आहे तोच नित्याचा त्रास सहन करणे ठीक. जे आता अंगवळणीच पडलेले आहे. असा विचार करते.
शोभना आणि सवितासारख्या कितीतरी महिला आजही या आगीत होरपळत आहेत. खरं तर प्रत्येकाला जगण्यासाठी प्रेम हवे आहे. त्यालाही मुलं आणि मुलांचं प्रेम हवं असतं. असं सारं असताना अशी माणसं पत्नीला सन्मानाचा दर्जा देऊन तिच्यावर अपार प्रेम उधळून घरात नंदनवन का निर्माण करीत नाहीत? जगताना प्रत्येकाच्याच वाटेवर अगणित अडथळे व प्रश्‍न असतात, पण म्हणून कुणी जगणं सोडून देतं का? नाही ना? मग कसंही सैरभैर जगावं का? याचंही उत्तर नाही. तर ते उत्तर असावं की माणसानं नात्यांचे मखमली पदर उलगडण्यासाठी जगावं. जीवन कोडे असेल तर ते सोडवण्यासाठी जगावं… जीवनाचे सुंदर सुंदर पैलू उलडताना कोणी प्रेमानं साद घातली, तर हुंकारण्यासाठी जगावे… अर्थात हे सहजीवन दोघांवरही अवलंबून आहे… पण एक मात्र नक्की की, कोणतीही स्त्री सहजासहजी अविचाराने वाईट मार्गाकडे वळत नाही, तिलाही प्रेम हवं असतं. जन्माचा जोडीदार इतका त्रास देतो,असह्य छळ करतो, या वेदना ती कुठेतरी बोलते. त्या वेदनेत ती कायम जळत असते. हवालदिल झालेली असते. अशा वेळी तिच्या वेदनांवर फुंकर घालणारं कुणीतरी भेटलं तर ती व्यक्ती तिच्या जगण्यात आनंद निर्माण करते. कधीकधी तिची ऊर्जा बनते. ती व्यक्ती कधी स्त्री असेल किंवा कधी पुरुष असेल, पण हे जगावेगळं मैत्रीचं नातं जगाच्या नियमांच्या चौकटीत बसत नाही आणि आईपणाचं शिवधनुष्य पेलताना एका वळणावर तिचा ‘खून’ होतो. जीर्ण जीर्ण झालेलं हे नात्यांचं वस्त्र कितीदा शिवलं तरी उसवतच जातं अन् उसवणं संपल की मग फाटूनच जातं.
‘जीर्ण जीर्ण वस्त्र ते, कितीदा कसे शिवायचे
उसवलेल्या नात्यांना सांगा पुन्हा कसे कसे जपायचे?’
न संपणार्‍या प्रश्‍नांच्या रांगेत ती कायमच उभी असते उत्तराकरिता… आजही बंद दारामागे ‘आई’पण सांभाळणार्‍या माझ्या कितीतरी सख्या अगतिकपणे सारं सोसत, त्याचाच उंबरा सांभाळत जगत असतात. एकाच आशेकरिता की तिच्या लेकरानं या घराचं अंगण सोडून, रिंगण तोडून उंच गगनझेप घ्यावी- अवघ्या जगाच्या नजरेत भरणारी… पण, सवितासारखीचं स्वप्न मोडीत निघतं. कारण- ती आई होती म्हणूनी…!
प्रा. विजया मारोतकर/९८२३७०६५९०