मायेची फुंकर…

0
213

ऋतुजा नुकतीच इंजिनीअर झालेली आणि कैवल्यसोबत चतुर्भुज होऊन सासरी जायला निघालेली. काहीशी स्वप्नाळू वृत्तीची, प्रेमळ, थोडीशी अल्लड अशा माझ्या सोनुलीचं लग्न अगदी परवावर येऊन ठेवलं. त्या तिच्या बावरलेल्या मनावर घातलेली ही मायेची फुंकर!
उत्तररात्रीचा नि:स्तब्ध प्रहर! उमलत्या फुलांचा दरवळ. रोमांचित करणारा सुखद गारवा! पण, मी मात्र सारखी या कुशीवरून त्या कुशीवर होत होते. समोर बघितलं तर ऋतुजापण जागीच होती. तिच्या मनाची दोलायमान अवस्था माझ्या बापडीच्या दृष्टोपत्तीस आली.
आणि एकाही क्षणाचा विलंब न करता ती माझ्या कुशीत शिरली व तिच्या मूक रुदनाला वाट मोकळी करून दिली. मीही तिला जवळ घेतले, तिला थोडंसं शांत केलं. त्यावर ती सद्गदित कंठाने मला म्हणाली, ‘‘आई, मी खरंच का गं पोरकी झाले? मला वाटेल तेव्हा येता येणार नाही का गं? उद्या दादाची बायको येईल. तिला माझं येणं पटलं नाही तर?’’ असे असंख्य शंकाकुशंकांचे किल्मिष माझ्या समोर मांडले. यावर तिचे सांत्वन करीत मी म्हणाले, हे बघ वेडाबाई, मी तुझ्या तर्काशी अगदी विसंगत आहे. आधी तू हे मनातून काढून टाक बरे, की हे घर तुझे नाही. अन् दादाच्या बायकोचे काय गं? तीसुद्धा तुझ्यासारखी माहेर सोडून आलेलीच असेल. त्यामुळे आपण सगळ्या एका वृक्षाचे पक्षी!
अगं सोने, तू नुकतंच तारुण्यात पदार्पण केलंस, व्यवहाराची जाण अद्याप तुला नाही. आमच्या छत्राखाली तू वाढलीस, बहरलीस. आता तू सासरच्या उंबरठ्यावर पहिले पाऊल टाकत आहेस. पहिल्याच पावलावर अशी हळवेली आहेस, रडवेली कशी गं झालीस? आणि सासरच्या आव्हानांचं काय घेऊन बसलेस बाळा, नवविवाहितेला सासरच्या लोकांची मनं जिंकायची असतील, तर एक गोष्ट मनात अव्याहत जागृत ठेवली पाहिजे, ती म्हणजे जिभेवर खडीसाखर आणि ओठांवर जुईपुष्पांचे हसू!
होय बाळा, हसतमुख, मधुरभाषिणी प्रिया ही पुरुषांची फार मोठी गरज असते. आपल्या माणसाचं मत उमजलं की संसाराची अर्धी लढाई जिंकता येते. कधी कोणी टाकून बोलले, कुणी उणंदुणं काढतील, एक ना दोन छप्पन कटकटी निर्माण होतील, पण उलटून बोलू नकोस कुणाला; तशीच मुळूमुळू रडतही बसू नकोस आणि गुणानं उणी पडू नकोस.
सुरवातीलाच हसू पेरलं तर फुलं हाती येतील. शब्दांचे जहरी आघात करीत गेलीस तर काट्यांखेरीज काहीच पदरी पडणार नाही. तू म्हणशील, आई आपल्याला एवढी का असमंजस समजते? तसं नव्हे गं! पण, ही वेळच अशी असते त्यामुळे वेळीच तोल सांभाळायला हवा.
राणी! आयुष्य इतकं सुंदर, इतकं रम्य, इतकं देखणं, इतकं सहज नसतं मुली. नसावंच. गुळगुळीत आयुष्याला चव नसते. जी माणसं जाणीवपूर्वक जीवन जगतात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे कांगोरे कसे टोकदार असतात. ज्यांना आयुष्य ओढायचं असतं त्यांची गोष्टच निराळी. त्यांना अमावास्येची काळोखी आणि पौर्णिमेची चंदेरी बरसात सारखीच असते.
तू त्यातली नाहीस. तू ‘जगणार्‍या’तली आहेस. आयुष्य घडविणार्‍यातली आहेस. ते घडवत असताना, त्याला आकार देत असताना हाताला चट्टे पडणार नाहीत, मनाला क्लेश होणार नाहीत असं मी कसं म्हणणार? पण, हे सहन करण्याइतपत मन खंबीर ठेव. मनाचा समतोल आणि जीवनाविषयीची श्रद्धा कधी ढळू देऊ नकोस. हार-जीत असल्याखेरीज आयुष्याला मौज नाही. रखरखीत उन्हाचे चटके बसल्याशिवाय हळुवार भावनांच्या श्रावणसरींची गोडी कशी गं कळावी?
पूर्णार्थानं जगणं अन् जगता जगता दुसर्‍याचं जीवन फुलवणं हीसुद्धा एक मोठी कलाच आहे. एकमेकांवर वार करून बळानं यशस्वी होणं, हे एकवेळ सोपे असतं ऋतुजा! पण, दुसर्‍यावर प्रेमाचा वर्षाव करून त्याला काबूत घेणं हे फार कठीण! जोडीदाराला झालेली जखम आसवांच्या मृदु स्पर्शानं पुसणं ही सहचारिणीची फार मोठी जबाबदारी आहे.
पत्नीच्या कर्तव्यात तू तसूभरही मागे पडणार नाहीस. बौद्धिक सहजीवन जगणं तुला मुळीच जड जाणार नाही, याची मला निश्‍चित कल्पना आहे. संसारात सुखाचा परिमल दरवळायला हवा असेल, तर स्त्रीला पुरुषाचं मन प्राजक्ताच्या फुलासारखं जपावं लागतं. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे, पतीला आपलंसं करताना त्याच्या मनाची वृत्ती आणि कल याची पत्नीनं जरूर जाणीव ठेवली पाहिजे.
आळसत, कंटाळत ‘दिलं एकदाचं देणं’ असं वागणारी पत्नी पुढे पुढे पतीला नकोशी वाटू लागते. अगं बेटा, स्त्री-हृदय हे फार सुंदर काव्य आहे. त्याच्या स्पंदनास्पंदनातून प्रीती, निष्ठा, त्याग, समर्पण, वात्सल्य याचाच चित्‌घोष ऐकू येतो ना? पण दु:ख हेच आहे की, या अप्रकाशित काव्यपंक्ती कुणी उच्चारताना गावतच नाही. कुणी या काव्याचा चरण गुणगुणलाच, तर तो फक्त शेवटचाच असतो. सुरवात अंधारातच राहते.
आणखी एक महत्त्वाचे सांगते, आज तो म्हणजे कैवल्य लहानाचा मोठा ज्या घरात झाला अन् ज्या माणसात म्हणजेच तुझ्या सासू-सासर्‍यांच्या सहवासात झाला त्याला तेथून तोडू नकोस. आपल्या अशा बेछूट वागण्याने दुसर्‍याचा किती विरस होतो याची कल्पना आपल्याला असावी!
अरे आता झोप बाळा! झोप कुठली आता तुला यायची. वैरीण झालेली तुझी छळवादी झोप केव्हाच पाखराचे पंख लावून आकाशात उडाली असेल- तुझ्या मनाची चोरलेली गुंज चांदण्यांना सांगायला! निळाईतली मखमली स्वप्नं तुझ्या पापण्यांच्या कडावर विसावली असतील. हळुवार फुंकरीनं तुला हाकारीत असतील…
ऋतुजा, मी जे बोलले ते तळमळीने बोलले एवढंच लक्षात ठेव. तुझ्या आईचे शब्द तुला कळले नाहीत तरी चालतील. त्यामागची माया समजून घे. त्या शब्दांमागे आईच्या हृदयाचा ओलावा तुला कळला, तरी मला सगळं सगळं पावलं बघ!
जयश्री हेमंत कविमंडन/७७९८७८९८८८