नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना गंडविले

0
109

तभा वृत्तसेवा
नागपूर, १७ मार्च
बेरोजगार अभियांत्रिकी युवकांना विदेशात नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना ३ लाख रुपयांनी गंडवून पळ काढणार्‍या एका भामट्याविरुद्ध बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अशोक जयंतीभाई मेहता (रा. अहमदाबाद, गुजरात) असे या भामट्याचे नाव आहे.
फसवणूक झालेले सर्व बेरोजगार तरुण हे अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेले आहेत. नोकरी नसल्याने त्यांनी जॉब प्लेसमेंट येथे आपले नाव नोंदविले होते. दरम्यान अशोक मेहताने या जॉब प्लेसमेंट कार्यालयाशी संपर्क साधून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या युवकांची यादी हस्तगत केली. त्यानंतर त्याने चार महिन्यांपूर्वी लक्ष्मीनगर येथे भाड्याने खोली घेऊन तेथे ग्लोबल ओवरेज या नावाने कार्यालय थाटले.
आकाशनगर, मानेवाडा येथील मुकेश मधुकर झलपुरे (३०) व त्याच्या अन्य ४ साथीदारांनी मेहताशी संपर्क साधला. मेहताने त्यांना कॅनडा येथे नोकरी लावून देतो अशी बतावणी केली. नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी साडेतीन लाख रुपये खर्च येईल असेही त्यांना सांगितले. व्हिसा आणि इतर कागदपत्रांसाठी सुरुवातीला त्याने या युवकांडून प्रत्येकी ६० हजार रुपये घेतले. पैसे घेऊन देखील त्याने नोकरी लावून दिली नाही. युवकांनी पैसे परत करण्यासाठी तगादा लावला असता कार्यालयाला कुलूप ठोकून त्याने पळ काढला. अशाप्रकारे त्याने या युवकांची ३ लाख रुपयांनी फसवणूक केली. याप्रकरणी मुकेशच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वी देखील मेहताने वाशी येथील मुलांची अशाचप्रकारे फसवणूक केल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे बजाजनगर पोलिस वाशी पोलिसांशी संपर्क साधणार आहेत.