बाळ दत्तक घेणार्‍या महिला कर्मचार्‍यांना वाढीव रजा

0
97

 १८० दिवसांची रजा मंजूर होणार
तभा वृत्तसेवा
नागपूर, १७ मार्च
राज्य शासनाने मान्यताप्राप्त भरती प्रक्रियेतून शासन सेवेत रुजू झालेल्या आणि अनाथ मूल दत्तक घेणार्‍या महिला कर्मचार्‍यांना विशेष वाढीव रजा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी, शासनाने काही अटी निश्‍चित केल्या असून अटींची पूर्तता करणार्‍या कर्मचार्‍यांना ही तरतूद लागू राहील.
वित्त विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार, दत्तक घेण्याच्या दिनांकास बाळाचे वय एक वर्षाच्या आत असेल तर महिला कर्मचार्‍याला १८० दिवसांची रजा मंजूर होणार आहे. बाळाचे वय एक ते तीन वर्षांदरम्यान असल्यास दत्तक घेण्याच्या दिनांकापासून ९० दिवसांची रजा मंजूर करण्यात येणार आहे. संस्थेकडून बाळ दत्तक घेतल्यास रजेचा लाभ दत्तकग्रहण पूर्व पोषण टप्प्यापासून तर इतर प्रकरणी कायदेशीर दत्तक प्रक्रियेनंतर ते लागू होतील. यासंदर्भात, १९९८ च्या शासन निर्णयानुसार ज्या कर्मचारी दत्तक मूल संगोपनाच्या ९० दिवसांच्या रजेवर आहेत, त्यांना सुधारित निर्णयानुसार, रजेचा कालावधी वाढवून देण्यात येईल, असे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. अशा कालावधीत रजेवर जाण्यापूर्वी तिला जेवढे वेतन मिळत असेल तेवढेच रजा वेतन देण्यात येईल. ही रजा खात्यात जमा केली जाणार नाही.
हा आदेश मान्यताप्राप्त व अनुदानित शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कृषी व बिगर कृषी विद्यापीठे तसेच त्यांना संलग्न असलेली महाविद्यालये याठिकाणी कार्यरत पूर्णकालीन शिक्षक व शिक्षकेतर महिला कर्मचार्‍यांना देखील लागू राहणार आहे. ही रजा घेण्यासाठी सेवा कालावधीची अट नसली तरी ज्या महिला कर्मचार्‍याची सेवा दोन वर्षांपेक्षा कमी झाली आहे, तिला सुटीसाठी अर्ज करताना बॉण्ड लिहून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. महिला व बाल विकास विभागाच्या सहमतीने, १५ मार्च रोजी हा आदेश निर्गमित झाला असून तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार, महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम १९८१ मध्ये आवश्यक ते बदल यथावकाश करण्यात येतील, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.